भूजल पातळीत मोठी घट; वाशिम उपविभागात विहिरी, बोअरवेल खोदण्यावर बंदी!

SHARE:

वाशिम, रिसोड, मालेगाव तालुक्यांत पाणीटंचाईचे संकट गडद; जलप्रकल्पांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव

 

वाशिम : यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने वाशिम उपविभागातील भूजल पातळीत लक्षणीय घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्याने आगामी उन्हाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे. उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी ६ ऑक्टोबर २०२६ पासून वाशिम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यांत नवीन विहिरी व बोअरवेल खोदण्यावर तसेच जलप्रकल्पांमधून व्यावसायिक कारणांसाठी पाणी उपशावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

सार्वजनिक जलस्रोतांपासून ५०० मीटर परिसरात बंदी

उपविभागातील शहरी व ग्रामीण भागांत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून ५०० मीटरच्या परिघात खाजगी किंवा व्यावसायिक वापरासाठी नवीन विहीर अथवा कूपनलिका खोदण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाची किंवा संबंधित भूवैज्ञानिकांची पूर्वपरवानगी नसताना खोदकाम करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित यंत्रसामग्री व साहित्य जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

जलप्रकल्पांतील पाणी पिण्यासाठीच राखीव

वाशिम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यांतील लहान, मध्यम व मोठे शासकीय जलप्रकल्प, नद्या, नाले, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आणि अन्य सार्वजनिक जलसाठ्यांमधून उद्योग व व्यावसायिक कारणांसाठी पाणी उपशास तातडीने बंदी घालण्यात आली आहे. या जलसाठ्यांतील पाणी टँकर भरणे आणि प्रादेशिक नळ योजनांद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

नियमभंग केल्यास फौजदारी कारवाई

प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा कंत्राटदारांविरुद्ध महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम, २००९ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अनधिकृत पाणी उपशासाठी वापरण्यात येणारी साधने जप्त करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

आगामी उन्हाळ्याची चिंता वाढली

यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरणावर परिणाम झाला आहे. परिणामी, पाणी उपलब्ध असण्याची अपेक्षा असलेल्या ऑक्टोबर महिन्यातच विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावू लागली आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध लागू केले असले, तरी जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही नागरिकांचीही जबाबदारी आहे. उपलब्ध पाणीसाठ्यांचा जपून वापर केल्यास आगामी काळातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते.

कुटुंबावरील हल्ले आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे शेख जाकीर यांचा आमरण उपोषण!

देऊळगाव राजा हायस्कूलच्या सात खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड!

आईचे आजारपणामुळे निधन अन् ती  चार महिन्यांची गर्भवती..

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Comment