अवैध वीट भट्ट्या बंद करण्याची मागणी

SHARE:

बुलढाणा: जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळाचे संकट गडद झाले असून, आगामी काळात पाणीटंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात असताना मोताळा आणि मलकापूर तालुक्यांत अवैध वीट भट्ट्या सुरू होऊ देऊ नये व नियम डावलून अवैध वीट भट्ट्या सुरू करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बुलडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर रजा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 निवेदनात म्हटल्याप्रमाणे, शाकीर रजा यांनी मोताळा तालुक्यात सुमारे ७० ते ८० आणि मलकापूर तालुक्यात ६० ते ७० वीट भट्ट्या पर्यावरण मंडळाची आवश्यक परवानगी न घेता चालवल्या जात असल्याचा आरोप केला आहे. तरी वीट भट्ट्यांची संख्या आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधन संपत्तीबाबत प्रशासनाने प्रत्यक्ष तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात गौण खनिजाच्या उत्खनन बाबतही गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. केवळ १०० ब्रास मातीची रॉयल्टी भरून हजारो ब्रास मातीचे उत्खनन केले जात असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे. अशा प्रकारांमुळे शासनाच्या कोट्यवधीच्या महसुलाची चोरी होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. संबंधित वीट भट्ट्यांची रॉयल्टी, उत्खननाची परवानगी आणि प्रत्यक्षात काढण्यात आलेल्या मातीचे प्रमाण यांची तपासणी करण्याची गरज आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Comment