शेगाव – तालुक्यातील पहुरजिरा शेतशिवारात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत महावितरणच्या लघुदाब वाहिनीच्या अल्युमिनिअम तारा लांबवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 19 ऑक्टोबर च्या मध्यरात्री सुमारे 2 ते 3 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी तब्बल 2,640 मीटर लांबीच्या तारांवर हातसाफ केला. चोरी झालेल्या या तारांची एकूण किंमत सुमारे 95 हजार 40 रुपये इतकी आहे.
या प्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानेश्वर रामेश्वर हीरळकर (35) रा. माटरगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून 23 ऑक्टोबर रोजी जलंब पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध विद्युत कायद्याच्या कलम 136 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन कामाच्या वेळी विद्युत तारांची चोरी झाल्याने महावितरणसह स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून पोलिसांनी या चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. जलंब ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका राजेश हिवाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


