अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा आरोप; १९ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

SHARE:

बुलढाणा जिल्हा रुग्णालयातील तपासणीत अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न; धामणगाव बढे पोलिसांकडून तपास सुरू

धामणगाव बढे | प्रतिनिधी

मोताळा तालुक्यातील एका गावातील साडेपंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सारोळापीर येथील १९ वर्षीय युवकाविरुद्ध धामणगाव बढे पोलिस ठाण्यात २३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीला उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मुलीचा जबाब नोंदवून पोलिसांनी पुढील कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सारोळापीर येथील संदेश समाधान तायडे (वय १९) याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये दूरध्वनी आणि संदेशांच्या माध्यमातून संपर्क सुरू होता. १० जुलै ते २५ जुलै २०२६ या कालावधीत आरोपीने मुलीशी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून मुलीला ताप आणि उलट्यांचा त्रास होत होता. १८ ऑक्टोबर रोजी तिचा त्रास वाढल्याने नातेवाइकांनी तिला बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पुढे आली.

पीडित मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर धामणगाव बढे पोलिसांनी २३ ऑक्टोबर रोजी संदेश तायडे याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यासह अन्य संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Comment