बुलढाणा न्यूज

बुलढाण्यातील ऐतिहासिक धम्म परिषदेची जय्यत तयारी

मूकनायक फाऊंडेशन व वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांचा पुढाकार

        बुलढाणा न्यूज – जिल्ह्यातील बौद्धबांधवांना एक नवी दिशा देणारी आणि ऐतिहासिक, अभूतपूर्व अशी जागतिक धम्म परिषद बुलढाणा येथे शनिवार, दि.9 मार्च रोजी पार पडत आहे. या परिषदेची जय्यत तयारी सुरू असून, ही परिषद न भूतो न भविष्यती अशी करण्यासाठी जिल्हाभरातील धम्मबांधव अहोरात्र मेहनत घेताना दिसत आहेत. मूकनायक फाऊंडेशन व वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या पुढाकारातून, संयोजनातून आणि मागदर्शनाखाली धम्म परिषदेचे बारकाईने नियोजन करण्यात आले आहे. बुलढाणा येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर होणार्‍या जागतिक धम्म परिषदेसाठी विशाल मंडप उभारण्यात आला आहे.
        या परिषदेत सहभागी होणार्‍या धम्मबांधवांसाठी विविध सोयी, सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. सकाळी साडेआठ वाजता उद्घाटन झाल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत परिषदेतील विविध कार्यक्रम पार पडतील.

महत्त्वपूर्ण ठराव करणार संमत

बुद्धांनी दिलेल्या धम्मानुसार धम्मबांधवांसाठी काही महत्त्वपूर्ण ठराव या परिषदेत घेतले जाणार आहेत. बौद्ध धर्मात सामाजिकदृष्ट्या हे ठराव एक चांगली शिकवण देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

उद्घाटन सोहळ्याला यांची राहणार उपस्थिती

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सकाळी 11 वाजता धम्म परिषदेत बंदरे व गृह मंत्रालयाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, पुणे उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे, ज्येष्ठ साहित्यिक नारायणराव जाधव येळगावकर, डॉ. पंजाब हिरे, असिस्टंट कमांडट मोनिका साळवे, उद्योजक डॉ. अर्चित हिरोळे यांना मूकनायक बुलढाणा हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

बौद्ध धम्मगुरुंची विशेष उपस्थिती

जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरु भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांचे धम्म प्रवचन होणार आहे. त्याचप्रमाणे भन्ते ज्ञानरक्षित थेरो (संभाजीनगर) आणि श्रीलंकेहून भन्ते शांतचित्त थेरो, भन्ते यश, भन्ते गुणानंद व भन्ते पुन्न यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. हे भन्ते धम्मदेसना देणार आहेत. भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन आणि बळकटीकरण, युवकांसाठी बौद्ध धर्मावरील विशेष सत्र, ध्यान साधना, धम्माची शिकवणूक, महापरित्राणपाठ, पुण्यानुमोदन असे सत्र पार पडतील.

Leave a Comment

और पढ़ें