बुलढाणा न्यूज

होळी म्हणजेच वसंतोत्सव

          प्राचीन भारतात होळीचा हा मनमोहक उत्सव वसंतोत्सवाच्या रुपाने साजरा होत असतो. वसंत ऋतुच्या आगमनाप्रसंगी निसर्गाने अधिकच साजश्रृंगार केलेला असतो. फुललेल्या फुलाला कोमलतेचा बहार आलेला असतो. झाडं पाना-फुलांनी नववधुगत बावरुन गेलेली असतात आणि पक्षाचं आकाशात झुलायचं स्वप्नही साकार झालेलं असतं. निसर्गाच्या तारुण्याचे हिरवेपण पाहून माणसाचं मन बहरुन आनंदून आलेलं असतं. वसंतोत्सव हा कालांतराने होळी दहनाच्या रुपाने साजरा होऊ लागला. उत्सवाचं स्वरुप जरी बदललं तरी उद्देश धोरण तोच आहे. प्रसन्नता, आनंद, मस्ती या दिवसात मन उचंबळून आलेलं असतं.
       
     ‘काम’ विषयाला अधिकच ओंगळ नि अश्लील स्वरुप देऊन त्याचे गुण-गाण लोकांसमोर उभे करुन त्याच्याविषयी घृणा वाटावी हा उद्देश होळी या सणात मुख्य करुन आहे. वात्सायनाने या सणाच्या उत्सवाला ‘सुवसंतक’ असं म्हटलं आहे तर कवि भासाने ‘कामदेवानुयान’ असं नामकरण केलं आहे.

होळी एक वैचारिक भाष्य

हिंदू धर्मात माणसांना जात असते इतकेच नव्हे तर देव, पशुपक्षी आणि सण यांना सुध्दा जात असते. तसा होळीचा सण हा जातीने शुद्र आहे, असं काकासाहेब कालेलकरांनी आपल्या ‘गुलामांचा सण’ या लेखात सांगून पुढे म्हणतात – होळीचा सण जातीने शुद्र आहे एवढयाचसाठी होळीचा कार्यक्रम कोणत्या तरी काळाच्या बिघडलेल्या शुद्रांनी तयार केला आणि त्यांचा हक्क सांभाळण्यासाठी इतर वर्णांनी त्याचा स्विकार केला ? होळीच्या दिवशी अंत्यज्यांना शिवावे असा एक नियम पुराणात आहे. त्याचा उद्देश काय असावा ? द्विज लोक जेवढे संस्कारी म्हणजे संयमी आणि शुद्र तेवढे स्वच्छंदी असे समजूनच होळीमध्ये इतका स्वच्छंद ठेवला आहे काय? होळीच्या दिवशी राजा आणि प्रजा एक होऊन एकमेकंावर रंग उडवितात ते काय निदान वर्षाचे चार-पाच दिवस तरी समानतेचे तत्व अनुभवण्यासाठी? आणि दुसज्या एका ठिकाणी ते म्हणतात, ‘होळी म्हणजे कामदहन’ वैराग्याची साधना. या विषयाला काव्याचे मोहक स्वरुप दिल्याने तो वाढतो. त्यालाच विभत्स स्वरुप देवून त्याला नागडा-उघडा करुन त्याचे खरे स्वरुप समाजापुढे उभे करुन विषयाविषयी शिशारी उत्पन्न करण्याचा उद्देश तर यात नसेल ? संबंध हिवाळाभर ज्याच्या मोहात आपण सापडलो त्याची फजिती करुन त्याला जाळून टाकुन पश्चातापाची विभूती शरीराला चर्चून वौराग्य धारण करण्याचा उद्देश यात असेल काय? प्राचीन काळाच्या लिंगपूजेची विडंबना तर यात नसेल ?

राज्यातील होळी 

      होळी-धुळीवंदन सणाला महाराष्ट्रात धामधुम, युवकांचा जल्लोष, मादक द्रव्यांचा सर्रास वापर व आहारी जात या सणाची सणसण समाजात पसरवितांना दिसतात. होळी-धुळीवंदन वसंतऋतुच्या आगमनाचा व कृषी संस्कृतीचे जतन करणारा सण आहे. मानवी आरोग्यावर होणारे ऋतुचे परिणाम याचा संकेत देणारा सण आहे, निसर्ग आनंदाचा सण आहे.
      भारताच्या निरनिराळया राज्यात निरनिराळया प्रकारे होळी करतांना दिसतात. परंतू होळी पेटविण्याचा प्रकार सर्वच ठिकाणी सारखाच होत असतो. महाराष्ट्रात शेणाच्या गोवऱ्यांची किंवा लाकडांची होळी करण्याची प्रथा आहे. कोकणपट्टीत सुपारीचे झाड, आंब्याचे किंवा इतर कुठल्याही झाडांचा सोट देवळापूढे रोवून त्यांच्या तळाशी लहान-लहान लाकडे व गवत जाळतात. भारतात इतर प्रदेशाच्या मानाने महाराष्ट्रातील कोकणपट्टीत या सणाला बरेच महत्व आहे. गोव्यात काही ठिकाणी वायंगणी शिमगा म्हणजे चैत्र शुक्ल पक्षात देखील घुमट (एक प्रकारचे मडक्याचे वाद्य) वाजविले जावून जल्लोशात होळी सण साजरा करतांना आढळतात.
        राजस्थानच्या पश्चिमी सीमावर्ती बाडमेर नगरात होळीचा उत्सव दगडांची फेकाफेक करुन साजरा केला जात असे. परंतू बदलत्या परिस्थितीनुसार नि समाज रचनेनुसार रंग उडविण्याची प्रथा चालू आहे. सुमारे साठ-सत्तर वर्षापूर्वी होळीचा हा रंगीबेरंगी उत्सव बाडमेर नगरात आपलं वैमनस्याने व दुष्मनी दूर ठेवून दगडांच्या फेकाफेकीने सण साजरा केला जातो. दोन गल्लीत नि दलात होणारी दगडफेक प्रेमाची असते. ‘बंगालमध्ये डोलकाला’ म्हणून हा सण साजरा केला जातो. तर हिंदी भाषीत प्रांतात रंग-गुलाल, टिंगल-टवाळी, थट्टा-मस्करी, विनोद इतर अफलातून गोष्टी या सणात समाविष्ट असतात. नागपूरकर भोसल्यांच्या वाडयात व तसेच पेशवाईत खेळली जाणारी होळी आणि रंगपंचमी तर महाराष्ट्राच्या इतिहासात सुप्रसिध्द आहे. स्वतंत्र भारतात होळीची प्रथा पं. जवाहरलाल नेहरुंनी पण जोपासली व जपली.
          होळीचा जन्म हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद यांच्या संघर्षातून झाला, अशी एक आख्यायिका आहे. श्रीकृष्णाने पूतना नावाच्या राक्षणीचा वध केला तेव्हा पासुनच होळीची प्रथा सुरु झाली असावी, असे म्हटले तर अतिश्योक्ती होणार नाही.
        पुराणात होळीच्या उत्सवाचे वर्णन आढळते. बुध्दधर्माचा प्रसिध्द ग्रंथ ‘धम्मपद’ मध्ये होळीचा उल्लेख ‘मुर्खाची जत्रा’ असं केलेलं आहे. ‘जौमीनीची पूर्वमिमांसा’ या ग्रंथातही एक संपूर्ण अध्याय होळीला वाहिलेला असून हा सण कसा साजरा करावा याचे सविस्तर वर्णन आणि कारणमिमांसा देण्यात आली आहे. महर्षि वात्सयनाने आपल्या ‘कामसुत्र’ या ग्रंथात सुगंधित द्रव्याच्या संदर्भात होळीचा विचार प्रामुख्याने केला आहे. 
भारताचा सांस्कृतिक सण म्हणजे होळी! रंग गुलालाची उघळण करणारा. रंगोन्मादानं भारतीय मातीत अंर्तबाहय मस्ती भरणारा. प्रांत, भाषा व धर्माच्या विभिन्न रंगांच्या सरितांना राष्ट्रीय रंगस्थळीच्या त्रिवेणीत एकात्मतेच्या रंगानं प्रवाहित करणारा हा राष्ट्रीय सण. एकमेकांना गुलालानी माखुन आलींगन देवून हा स्नेह द्विगुणीत करण्याची प्रथा आहे.
प्रभाकर सोमकुवर
नागपूर
मो. क्र. 9595255952

Leave a Comment

और पढ़ें