बुलढाणा न्यूज

8 नोव्हेंबर रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आले निर्णय

अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य
निवड मंडळामार्फत भरणार

      बुलडाणा न्यूज – अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरण्याचा निर्णय आज बुधवार दि.8 नोव्हेंबर 2023 झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

       त्यानुसार अतिरिक्त मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण अध्यक्षस्थानी असतील तर आयुष संचालनालयाचे संचालक, महाराष्ट्र आरोग्य  विज्ञान विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलगुरु, सह सचिव दर्जापेक्षा कमी  नसलेले सामाजिक न्याय व सामान्य प्रशासन विभागातील प्रतिनिधी, संबंधित  क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुदानित खासगी आयुर्वेद व युनानी संस्थांचे  व्यवस्थापन किंवा महाविद्यालयाचे नामनिर्देशित व्यक्ती हे या निवड
मंडळाचे सदस्य असतील.

 आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची 282 पदे भरणार

 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञानात पारंगत करण्यासाठी शिक्षकांची 282 पदे भरण्याचा  निर्णय आज आज बुधवार, दि.8 नोव्हेंबर 2023  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी येणार्‍या 30 कोटी खर्चास देखील आज मान्यता देण्यात आली.

इतर मागास व बहुजन कल्याण विभागामार्फत 141 कला व विज्ञान तसेच 7 कला व  वाणिज्य अशी 148 उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत.  उच्चस्तरीय सचिव समितीने  गणित आणि विज्ञान विषयांकरिता पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार ही पदे निर्माण करण्यात येतील.

आश्रमशाळेतील विद्यार्थी 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्थापत्य अशा व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश  घेतात.  त्यांना गणित आणि विज्ञानावर आधारित नीट आणि सीईटी सारख्या  परिक्षांना सामोरे जावे लागते. आर्थिक परिस्थितीमुळे खासगी ट्यूशन आणि  क्लासेस न मिळाल्याने हे विद्यार्थी स्पर्धेत टिकत नाहीत त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार

 एक पशुवैद्यकीय अधिकारी आणि एक पशु वैद्यकीय अधिकारी मदतनीस अशी 2 पदे

निर्माण करण्यात येणार पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मौजे गोजुबावी येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता  देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सध्या पुणे येथे श्वान प्रशिक्षण केंद्र असून त्याचे बांधकाम मोडकळीस  आलेले आहे.  तसेच या ठिकाणी प्रशिक्षणासाठी सुविधा नाही.  सध्या श्वान पथकात 102 गुन्हे शोधक, 74 बॉम्ब शोधक, 45 अंमली पदार्थ शोधक, 5 गार्ड  ड्युटी, 4 पेट्रोलिंग आणि बीडीडीएस पथकातील 120 असे 350 श्वान असून पुणे येथे केवळ 20 श्वान व हस्तकांना प्रशिक्षण देण्यात येते.  नवीन  प्रस्तावित श्वान प्रशिक्षण केंद्रात एकाच वेळी 50 श्वानाना प्रशिक्षण
देण्याची सुविधा आहे.  हे केंद्र सुमारे 7 हेक्टर जागेवर उभारण्यात येणार असून भविष्यात वन विभाग, उत्पादन शुल्क, कारागृह, एसडीआरएफ अशा संस्था  देखील त्यांच्या श्वानाना प्रशिक्षण देऊ शकतात.  या ठिकाणी श्वान
ब्रिडींग सेंटर सुरु होऊ शकते. या प्रशिक्षण केंद्राकरिता एक पशुवैद्यकीय अधिकारी आणि एक पशु वैद्यकीय
अधिकारी मदतनीस अशी 2 पदे देखील निर्माण करण्यात येतील.  या केंद्राकरिता
56 कोटी 76 लाख 16 हजार 440 एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

Leave a Comment

और पढ़ें