बुलढाणा न्यूज

तूर पिकावरील अळी व रोगाचे नियंत्रण बाबत उपाययोजना

            बुलढाणा न्यूज – सद्यस्थिती बुलढाणा जिल्ह्यातील सर्वेक्षणानुसार शेतकरी बंधूंना ऑक्टोबर महिन्यात तूर पिकातील कीड रोग नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना. तूर पिकातील शेंगा पोखरणार्‍या अळीच्या वाढीस पोषक हवामान व अशा वातावरणामुळे तुर पिकाला शेंगा पोखरणार्‍या अळ्यांपासून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवश्यक ठरते. शेंगा पोखरणार्‍या अळ्यांमध्ये खालील प्रकारच्या अळ्यांचा समावेश असतो.

        शेंगा पोखरणारी अळी : या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात पूर्ण वाढ झालेली अळी 30-40 मिमी. लांब विविध रंगछटात दिसून येते जसे की पोपटी, फिकट गुलाबी व करड्या रंगाची असून तिच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे उकरून खातात.

          शेंगमाशी : या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढर्‍या रंगाची असून तिला पाय नसतात तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो ही अळी शेंगाच्या आत राहून शिंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते. पिसारी पतंग : या पतंगाची अळी 12.5 मि.मी. लांब हिरवट तपकिरी रंगाची असते तिच्या अंगावर सूक्ष्म काटे व केस असतात आणि शेंगेवरील साल खरडून छिद्र करते व बाहेरून राहून दाणे पोखरते. एकात्मिक व्यवस्थापन या तिन्ही किडी कळ्या फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापना करिता जवळजवळ सारखेच उपाय योजावे लागतात. प्रति हेक्टर 20 पक्षी थांबे शेतात उभारावी त्यामुळे पक्षी किडींच्या अळ्या खाऊन फस्त करतात.

          पहिली फवारणी : पिक 50 टक्के फुलोराव असताना निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझाडेरेक्तिन 300 पीपीएम 50 मिली किंवा अझाडेरेक्तीन 1500 पीपीएम 25 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

             दुसरी फवारणी : पहिल्या फवारणी नंतर 15 दिवसांनी इमामेक्तीन बेंझोएट 5 एस.जी. 3 ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रानीप्रोल 5 टक्के एस.सी.2.5 मिली. पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील व त्या गोळ्या करून नष्ट कराव्यात.

       तुर पिकावर खोड करपा, मर रोगाचा प्रादुर्भाव यावर्षी काही ठिकाणी पेरणी झाल्यानंतर पीक रोपावस्थेत असताना आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाच्या मोठा खंडानंतर काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडल्यामुळे बहुतांश शेतामध्ये तुरीचे पीक वाळत आहे. त्यामुळे पिकावर खोडावरील करपा व मर या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. तुर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा येईपर्यंत होतो. हा रोग फ्युजारियम उडम या जमिनीत वास्तव्य करणार्‍या बुरशीमुळे होतो. जमिनीचे तापमान 25 ते 28 अंश सेल्सिअस व ओलावा 20 ते 25 टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. शेंगा पक्व होण्याच्या कालावधीत प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते. मर रोगाची लक्षणे : पानाच्या शिरा पिवळ्या होतात व पाने पिवळी पडतात. झाडाचे शेंडे मलूल होतात व कोमेजतात. झाडे हिरव्या स्थितीत वाळतात. जमिनीलगतच्या खोडाचा भाग काळ्या रंगाचा बनतो. मूळ उभे चिरले असता मुळाचा मध्य भाग काळा दिसतो. यात बुरशीची वाढ झालेली दिसते. कधी कधी खोडावर पांढरी बुरशीसुद्धा आढळते. वाळलेल्या झाडाची पाने गळत नाहीत, तसेच रोगाची तीव्रता पीक फुलोरा तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत जास्त असते. अंशतः मर हेसुद्धा मर रोगाचे लक्षण आहे. मर रोगाचे व्यवस्थापन : मध्यम व उशिरा परिपक्व होणार्‍या वाणांमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. सलग तुरीच्या पिकापेक्षा तुरीसोबत ज्वारीचे आंतरपीक घेतल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो. पाणी साचणार्‍या व पाण्याचा निचरा होणार्‍या जमिनीत तुरीचे पीक घेऊ नये. ज्या शेतामध्ये पूर्वी मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल अशा शेतात या पिकाची लागवड चार-पाच वर्षापर्यंत करू नये. तूर लागवडीच्या क्षेत्रात तृणधान्यासारखी फेरपालटीची पिके घ्यावीत. शेतामध्ये मर रोगाची रोगट झाडे दिसतात त्वरित उपटून टाकावी. मर रोगग्रस्त शेतात 2 किलो ट्रायकोर्डमा चांगल्या कुजलेल्या 200 किलो शेणखतात मिसळून पिकात द्यावा. करपा रोगाची लक्षणे या रोगामुळे पानावर ओलसर चट्टे तसेच खोडावर तपकिरी चट्टे जमिनीलगत किंवा जमिनीपासून काही इंच अंतरावर आढळतात. नंतर हे चट्टे वाढत जाऊन खोडासभोवती खोलगट भाग तयार होतो व काही वेळा खोडावर गाठी तयार होतात. या चट्ट्यांवर अनुकूल वातावरणात पांढरट गुलाबी रंगाची बुरशी वाढलेली दिसून येते. हे चट्टे वाढत जाऊन झाडाच्या मुख्य बुंध्याला वेढतात. त्यामुळे झाड कमकुवत होऊन त्या ठिकाणी चटकन तुटते. या खोडाच्या चट्ट्याचा उभा छेद घेतल्यास खोडाचा आतील भाग तपकिरी काळा पडल्याचे दिसते. करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन : पाऊस जास्त पडल्यास शेतात चर खोदून अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. रोगग्रस्त शेतात ट्रायकोर्डमा 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. रोग दिसताच मेटालॉकझीन 4 टक्के मन्कॉझेब 64% डब्ल्यू पी बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून खोडावर व फांद्यावरही फवारणी करावी. वरील प्रमाणे तूर या पिकात अळी किंवा रोगाचे लक्षण आढळून आल्यास त्वरित उपाय योजना करण्यात याव्यात असे आवाहन कृषि विभाग बुलढाणा यांनी केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें