बुलढाणा न्यूज

भारताला मिळालेलं कणखर नेतृत्व – लाल बहादुर शास्त्री

Lal Bahadur Shastri

महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जशी जन्मतारीख एक आहे, तरीही त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 साली उत्तरप्रदेशातील मुगलसराई या गावी झाला. तसे दोघे ही समविचारी, विचारात कुठेही फारकत नव्हती. महात्मा गांधींच्या विचारांचा भारदस्त पगडा शास्त्रींच्या खोलवर मनावर रुजला होता. महात्मा गांधी प्रमाणेच शास्त्री जेवढे मृदु होते, तेवढेच निश्चयी देखील होते. महात्मा गांधीचे नांव ऐकले होते, परंतू प्रत्यक्षात बघण्याचा योग शास्त्रींजीना 1916 साली झाला. त्यावेळी ते आफ्रिकेतून नुकतेच भारतात परत आले होते.
                   1930 मध्ये, महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली. स्वातंत्र्याच्या या संग्रामाने ते अधिक परिपक्व झाले. लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढयात रुची निर्माण झाली. भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणार्‍या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळेते अत्यंत प्रभावित झाले. तेव्हा पासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली. महात्मा गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न असफल ठरले. लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता. त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहित होते की एकदा निर्णय घेतला की ते तो कधीही बदलणार नाहीत, कारण बाहेरुन मृदू वाटणारे शास्त्री आतून एखादया खडका सारखे कणखर होते.
ब्रिटीश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले. येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव शास्त्री होते. मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले.
                स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली, त्यापूर्वीच राष्ट्रीय संग्रामातील नेत्यांना नम्र आणि विनित लाल बहादूर शास्त्री यांचे महत्त्व लक्षात आले होते. 1946 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले, तेव्हा या छोटया डायनॅमो ला देशाच्या कारभारात रचनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी सांगण्यातआले. त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्री पदावर आरुढ झाले. त्यांची कठोर मेहनत करण्याची क्षमता आणि त्यांची कार्यक्षमता उत्तरप्रदेशात एक लोकोक्ती बनली. 1951 मध्ये ते नवी दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वेमंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिन खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांची प्रतिष्ठा निरंतर वाढतच होती.
                 रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी असतांना त्यांच्या कारकीर्दीत रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी या घटनेबाबत संसदेत बोलताना लाल बहादूर शास्त्री यांची इमानदारवृत्ती आणि उच्च आदर्श मूल्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की शास्त्री यांचा राजीनामा मी स्वीकारत आहे, कारण यामुळे घटनात्मक मर्यादे मध्ये एक उदाहरण कायम राहील. जे काही घडले त्याला शास्त्री जबाबदार नाहीत. रेल्वे अपघातावरील दीर्घ चर्चेला उत्तर देतांना लाल बहादूर शास्त्री म्हणाले कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच नम्र असल्यामुळे लोकांना वाटत असावं की कणखर होऊ शकत नाही. जरी मी शारीरिक दृष्टया धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवत ही नाही.
              आपल्या मंत्रालयीन कामकाजा दरम्यान, काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यवहाराकडे ही त्यांनी लक्ष दिले आणि त्यात भरीव योगदानही दिले. 1952, 1957 आणि 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील पक्षाच्या निर्णायक आणि जबरदस्त यशामध्ये त्यांचे संघटनात्मक कौशल्य आणि एखाद्या गोष्टीची जवळून पारखण्याची त्यांची क्षमता यांचे मोठे योगदान होते. तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवे दरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खर्‍या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शीवृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. आपले गुरु महात्मा गांधीच्या शैलीत ते एकदा म्हणाले. कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले.
लाल बहादूर शास्त्रींनी आपल्या कार्यकाळात अभ्यास दौरा समजून अनेक देशांना भेटी देवून दूरावा असलेल्या देशात सामंजस्य निर्माण केलं. ते ज्या ठिकाणी जात त्या त्या ठिकाणी आपल्या मृदूपण निश्चयी शब्दांनी ते आपली छाप पाडत आणि आपल्या देशात कोणत्या उणीवा आहेत आणि त्या देशापासून आपल्याला काय शिकण्या सारखे आहे. त्याचा आढावा घेवूनच ते स्वदेश परतल्यावर कामाला लागले. 27 मे 1964 ला जवाहरलाल नेहरुंचे निधन झाल्यानंतर पंतप्रधानाची सुत्रे हाती घेतल्या बरोबर देशाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी लालबहादूर शास्त्री यांचेवर आली. माणसाचे शील आणि निश्चय किती प्रभावशाली असू शकतो हे शास्त्रींनी स्वकर्तृत्वातून देशाला दाखवून दिले.
इतक्या अल्पावधीत शास्त्री जातील असे कोणाच्याही मनी विचारआला नव्हता. त्यामुळे सर्व गर्भगळीत झालेत, शास्त्री गेलेत आणि देश पोरका झाला. एकाग्रतेचे भान ठेवूनच कोणताही एखादा निर्णय घेते वेळी ते कठोर भुमीका घ्यायचे. परंतू तेवढाच त्यांचा स्वभाव शांत, धीर, गंभीर म्हणूनच त्यांना शांती पुरुष नांवाने संबोधण्यात येत होते. शास्त्रींचे संपुर्ण जीवन हिच एक आदर्श आचारसंहिता होय. शास्त्रींच्या अंगी अनेक गुणांचा प्रत्यय आजपर्यंत अनेकवेळा आला असला तरी यावा मनमुर्तीने जे अतुल धैर्यशाली, विलोभनीय सामर्थ्यानिशी मार्गदर्शन भारताला केले त्याने सारे जग स्तिमित झाले होते. भारताची शान आणि मान जगात ताठरमानेने उंचावली.
                  सन् 1965 ला पाकिस्तानने भारत सिमेवर आक्रमण केले. त्यावेळी त्यांनी धैर्याने व तेवढयाच ताकदीने युध्दाला सामोर गेले आणि सीमेवर लढणार्‍या सौनिकांना सिमेवर स्वत: जावून त्यांनी प्रोत्साहन देण्याकरीता ‘जय जवान, जय किसान’ नारा देवून विजयपताका देशावर फडकावली. युनोने युध्दबंदीचा आदेश दिला, रशियाचे पंतप्रधान कोसिजीन यांनी शास्त्रींजींना आणि अयुबखानना वाटाघाटीसाठी ताश्कंदला बोलावले. तेथे वाटाघाटी, चर्चा होऊन 10 जानेवारी, 1966 ला शास्त्री आणि आयुबखान यांनी कोसिजीनना साक्षी ठेवून करारावर सहया केल्या. तेंव्हाच दोन्ही देशात समन्वय साधण्याकरीता दिलजमाई म्हणून आंतराष्ट्रीय कीर्तीचा न भूतो, न भविष्य असा तो ‘ताश्कंद करार’ करण्यात आला. दुसर्‍याच दिवशी रेडीओ वरुन बातमी प्रसारीत झाली की, लाल बहादुर शास्त्री यांचे निधन अचानक झाल्याने देश हादरुन गेला.
                देशातला सर्वोच्य पुरस्कार भारतरत्न शास्त्रीजींना प्रथमत: मरणोपरांत 1966 ला देण्यात आला. ‘विजयघाट’ याठिकाणी अंतिमसंस्काराने शास्त्रीजींना शेवटची सलामी देण्यात आली. अशा या महान देशभक्ताला ज्यांनी या देशावर शेवटच्या क्षणापर्यंत जिवापाड प्रेम केले त्यांच्या जन्मदिनी भावपूर्ण अभिवादन !


प्रविण बागडे
नागपूर, भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल : pravinbagdegmail.com

Leave a Comment

और पढ़ें