बुलढाणा जिल्हा परिषदेत लाचखोरीचा आरोप; दोन वरिष्ठ सहाय्यकांना अटक

SHARE:

सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्रासाठी ४ हजारांची मागणी; एसीबीची कारवाई

बुलढाणा : सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदाराचे नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जिल्हा परिषदेतील दोन वरिष्ठ सहाय्यकांविरुद्ध कारवाई केली आहे. सुधीर महादेव तांदुळकर (वय ४२) आणि विजय प्रल्हाद खर्चे (वय ५२) अशी आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही कार्यालयातून ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.

प्रमाणपत्रासाठी लाचेची मागणी

या प्रकरणातील २३ वर्षीय खासगी अभियंता तक्रारदाराने सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे रीतसर अर्ज केला होता. हे प्रमाणपत्र देण्यासाठी वरिष्ठ सहाय्यक विजय खर्चे यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार १ एप्रिल २०२६ रोजी एसीबीकडे करण्यात आली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने त्याच दिवशी दुपारी १.१३ ते २.०८ या वेळेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान विजय खर्चे यांनी त्यांच्या केबिनमध्ये ५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. तसेच वरिष्ठ सहाय्यक सुधीर तांदुळकर यांनी तडजोडीनंतर ४ हजार रुपयांची रक्कम खर्चे यांच्यासाठी मागितल्याचे आणि तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे एसीबीच्या तपासात समोर आले.

दोन वेळा सापळा; मात्र लाच स्वीकारली नाही

१ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.४६ ते ५.३६ या वेळेत एसीबीने सापळा रचला. मात्र, विजय खर्चे कार्यालयात उपस्थित नसल्याने तांदुळकर यांनी फोनवर बोलण्यास टाळाटाळ केली. संशय निर्माण झाल्याने त्यांनी नोंदणी प्रमाणपत्र कार्यालयाबाहेर आणून दिले आणि काम पूर्ण झाल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही.

यानंतर २ जून २०२६ रोजी पुन्हा सापळा रचण्यात आला. त्यावेळी विजय खर्चे यांनी आपल्याकडे तक्रारदाराची कोणतीही फाईल नसल्याचे सांगून आपण बाहेर असल्याचे कारण दिले आणि भेट टाळली. दोन्ही कर्मचाऱ्यांनी संपर्क टाळल्याने लाच स्वीकारण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती एसीबीच्या कारवाईसंदर्भात देण्यात आली.

१६ ऑक्टोबरला गुन्हा दाखल

या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०२३/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ आणि १२ अंतर्गत १६ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोन्ही आरोपींना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करण्यात आली.

ही कारवाई एसीबी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि अपर पोलीस अधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे आणि पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

या पथकात पोलीस हवालदार प्रवीण बैरागी, अमोल झिने, दीपक जाधव, जगदीश पवार, तसेच पोलीस कर्मचारी लक्ष्मीकांत इंगळे, रतन गिरी, गजानन गाल्डे, शैलेश सोनवणे, पंढरी शेळके, रजिंत व्यवहारे, प्रफुल्ल आमले आणि चापोहेकॉ अर्शद शेख यांचा समावेश होता.

 

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Comment