क्रीडा क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी : अविनाश पुंड
खेळाडूंना मार्गदर्शन करताना उपसंचालक अविनाश पुंड यांनी शासनाकडून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना व सुविधा राबविण्यात येत असल्याचे सांगितले. खेळाडूंना शिष्यवृत्ती, शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी पाच टक्के आरक्षण तसेच पात्रतेनुसार थेट नियुक्तीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे खेळाडूंनी क्रीडा क्षेत्राकडे करिअरचा पर्याय म्हणून पाहावे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी उपलब्ध क्रीडा सुविधांचा लाभ घेऊन अधिकाधिक स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवावे आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे सांगितले. डॉ. अरविंद कोलते आणि प्रा. डॉ. कैलास पवार यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले.
बुलढाणा : खेळाडूंनी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याला प्राधान्य देत सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर आपले कौशल्य विकसित करावे. स्पर्धेतील सहभाग हा यशाच्या दिशेने टाकलेला पहिला महत्त्वाचा टप्पा आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन व सॉफ्ट टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन, मलकापूर आणि सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन, बुलढाणा यांच्या तांत्रिक सहकार्याने होत असलेल्या या स्पर्धा २३ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जनता कला व वाणिज्य महाविद्यालय आणि तालुका क्रीडा संकुल, मलकापूर येथे पार पडत आहेत. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नूतन इंग्लिश स्कूल, मलकापूर येथे उत्साहात झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभागाचे उपसंचालक अविनाश पुंड होते. यावेळी लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
क्रीडा ज्योत आणि पथसंचलनाने सोहळ्याला रंगत
उद्घाटनप्रसंगी विविध विभागांतील खेळाडूंनी पथसंचलनातून मान्यवरांना मानवंदना दिली. आंतरराष्ट्रीय सॉफ्ट टेनिस खेळाडू सोनल खर्चे व अन्य खेळाडूंनी प्रज्वलित केलेली क्रीडा ज्योत मान्यवरांकडे सुपूर्द करण्यात आली. दीपप्रज्वलन तसेच स्व. खाशाबा जाधव आणि मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या पंचाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची माहिती दिली.
राज्यभरातील १४ वर्षांखालील खेळाडूंचा सहभाग
या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील विविध विभागांतील १४ वर्षांखालील मुले व मुली सहभागी झाले आहेत. बॅडमिंटन आणि सॉफ्ट टेनिस या दोन्ही खेळांच्या प्रत्येक विभागातून प्रत्येकी ४० मुले व ४० मुली सहभागी झाल्या आहेत. स्पर्धेच्या आयोजनासाठी संघ व्यवस्थापक, पंचाधिकारी, स्वयंसेवक आणि निरीक्षकही योगदान देत आहेत.
आंतरराष्ट्रीय सॉफ्ट टेनिस खेळाडू सोनल खर्चे यांनी उपस्थित खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. कार्यक्रमाला विविध क्रीडा अधिकारी, मार्गदर्शक, शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भुजबळ यांनी केले, तर तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी आभार मानले.


