मुंबईतील राष्ट्रीय गझल संमेलनात ३० वर्षांच्या गझलसेवेचा सन्मान; बुलढाण्याच्या साहित्यविश्वाचा गौरव

रविकिरण टाकळकर स्टुडिओ रविकिरण छायाचित्रण, बुलढाणा
बुलढाणा : उर्दू-हिंदी शायर डॉ. गणेश गायकवाड, बुलढाणा यांना त्यांच्या तीन दशकांच्या गझलसेवेबद्दल ‘फख्र-ए-गझल’ (गझल गौरव सन्मान) या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी मुस्लिम विचारवंत, तत्त्वज्ञ आणि शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी सर सय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील मेयर हॉलमध्ये आयोजित राष्ट्रीय गझल संमेलनात हा गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे बुलढाण्याच्या साहित्यविश्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
इंकलाब या उर्दू दैनिकाचे मुख्य संपादक शाहिद लतीफ, मुंबईतील आयपीएस अधिकारी व प्रख्यात शायर कैसर खालिद, अक्स अदब फाउंडेशनचे सत्यनारायण सत्या आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष, उस्ताद शायर शमीम अब्बास यांच्या हस्ते डॉ. गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भाषा आत्मसात करणे म्हणजे तिची संस्कृती समजून घेणे!
डॉ. गणेश गायकवाड यांच्या साहित्यिक योगदानाचे कौतुक करताना शाहिद लतीफ म्हणाले की, एखादी भाषा शिकणे म्हणजे केवळ तिची मुळाक्षरे किंवा व्याकरण आत्मसात करणे नव्हे. त्या भाषेची तहजीब, परंपरा, साहित्यिक योगदान तसेच सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील तिचे स्थान समजून घेणे, हे खऱ्या अर्थाने भाषा आत्मसात करण्याचे लक्षण आहे. डॉ. गणेश गायकवाड यांनी या सर्व बाबी आत्मसात केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवीन भाषा शिकण्यासाठी वेळ देणे आणि संयम राखणे या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगत त्यांनी उपस्थित भाषा अभ्यासकांना या गुणांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
मानवी मूल्यांची पेरणी करणारी गझल
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शायर शमीम अब्बास यांनी डॉ. गणेश गायकवाड यांच्या गझललेखनाचे विशेष कौतुक केले. त्यांच्या गझलांमधून मानवी मूल्यांची पेरणी होत असल्याने त्यांचे साहित्य काळाच्या कसोटीवर टिकून राहिले आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी डॉ. गायकवाड यांच्या एका अर्थपूर्ण शेरचा उल्लेख केला.
दिलों को जोड़ते हैं जो वो रस्ते कैसे बनते हैं
बड़ों से मैंने सीखा है कि छोटे कैसे बनते हैं।
हा शेर कुटुंबव्यवस्थेचा पाया अधोरेखित करणारा असून, नातेसंबंधांमधील जिव्हाळा, नम्रता आणि संस्कार यांचे महत्त्व प्रभावीपणे व्यक्त करतो, असे शमीम अब्बास यांनी नमूद केले.
१५ शायरांच्या गझलांनी रंगली मैफल
या राष्ट्रीय गझल संमेलनात १५ शायरांनी आपल्या गझल सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे आयोजन बज्म एल्गारचे युसूफ एल्गार आणि युसुफ दीवान यांनी केले होते. साहित्य, भाषा आणि गझल यांच्या माध्यमातून मानवी मूल्यांचा जागर घडविणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरला.
पुरस्कार उस्तादांना आणि बुलढाण्यातील रसिकांना समर्पित
‘फख्र-ए-गझल’ पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना डॉ. गणेश गायकवाड यांनी हा सन्मान आपले उस्ताद डॉ. मेहबूब राही यांच्या कठोर मार्गदर्शनामुळे मिळाल्याचे सांगितले. तसेच, गेल्या ३० वर्षांपासून गझललेखनासाठी वेळोवेळी प्रेरणा देणाऱ्या आणि आपल्या रचनांना मनापासून दाद देणाऱ्या बुलढाणा शहरातील रसिकांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तीन दशकांच्या सातत्यपूर्ण साहित्यसेवेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याने डॉ. गणेश गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या विजयाची चावी बुलढाण्याच्या हाती!
देऊळगाव राजाजवळ भीषण अपघात; उच्चशिक्षित वैष्णवी घुगेचा मृत्यू






