मुंबई – बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून सहभागी झालेल्या ३५ विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांनी ‘सुपर ६०’मध्ये स्थान मिळविले, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रद्धा रमेश लोंढे हिने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत विशेष सुवर्णपदकाचा मान मिळविला. या यशाबद्दल शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी श्रद्धासह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वैज्ञानिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि समाजोपयोगी नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित बारावी राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धा १२ ते १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडली. या स्पर्धेत देशभरातील सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील २०२३-२४ आणि २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील ३५ विद्यार्थ्यांनी विज्ञानाधारित प्रकल्प सादर केले.
प्रकल्पांचे नावीन्य, सामाजिक उपयुक्तता, वापरण्याची सुलभता आणि दैनंदिन जीवनातील उपयोगिता या निकषांवर देशभरातील उत्कृष्ट ६० प्रकल्पांची ‘सुपर ६०’ गटासाठी निवड करण्यात आली. या प्रतिष्ठित गटात महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांनी स्थान मिळवून राज्याचा गौरव वाढविला.
श्रद्धा लोंढेच्या एआय प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक
अहिल्यानगर जिल्ह्यातील चांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी श्रद्धा रमेश लोंढे हिने ‘एआय बेस्ड टीचर असिस्टंट फॉर ब्लाइंड्स’ हा प्रोटोटाइप सादर केला होता. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने दृष्टिबाधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरणारी ही संकल्पना विशेष ठरली. या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला असून श्रद्धाला विशेष सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते श्रद्धाला सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि लॅपटॉप प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रातील सात विद्यार्थी ‘सुपर ६०’मध्ये
श्रद्धा लोंढे हिच्यासह राज्यातील पुढील सहा विद्यार्थ्यांनीही ‘सुपर ६०’मध्ये स्थान मिळविले आहे.
- राजवर्धन प्रदीप काळे – जिल्हा परिषद स्कूल, लक्ष्मीवाडी, सांगली.
- देविका सुहास ताड – एम. ई. एस. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पुणे.
- अर्णव भुसारी – सिटी प्राइड स्कूल, पुणे.
- गीता गणपत धनवडे – डी. ई. एस. माधव सदाशिव गोलवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय, पुणे.
- शांभवी रामनप्पा अजगुंडे – के. एल. ई. मंगरुळे हायस्कूल, अक्कलकोट, सोलापूर.
- विराज संदीप शिंदे – पोदार इंटरनॅशनल स्कूल, वाशिम.
या सातही विद्यार्थ्यांना डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
वैज्ञानिक कल्पकतेला राज्य शासनाचे प्रोत्साहन
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शाळांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक जिज्ञासा आणि संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत आहे.
‘विद्यार्थी विज्ञान वारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनांच्या माध्यमातून नासा (NASA) भेटीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नमूद केले.
तसेच, राज्य विज्ञान शिक्षण संस्था तथा प्रादेशिक विद्या प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेतील ‘सुपर ६०’मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना साकुरा विज्ञान विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत जपान भेटीची संधी मिळू शकणार आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळविलेले हे यश राज्याच्या विज्ञान शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद असून, नवकल्पना आणि संशोधनाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे.







