बुलढाण्यात ३० ऑक्टोबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव; विविध स्पर्धांचे आयोजन

SHARE:

बुलढाणा : युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बुलढाणा येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये हा महोत्सव पार पडणार आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा आणि ‘मेरा युवा भारत’ कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केला जातो. जानेवारी २०२७ मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ ही महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

विविध कलागुणांना मिळणार व्यासपीठ

युवकांच्या कलात्मक कौशल्यांना वाव देण्यासाठी महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

१५ ते २९ वयोगटातील युवकांना सहभागाची संधी

या महोत्सवात १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या संस्थेच्या लेटरहेडवर प्रवेशिका तयार करून आवश्यक माहिती भरावी. पूर्ण भरलेल्या प्रवेशिका क्रीडा मार्गदर्शक श्रीमती उज्वला लांडगे यांच्याकडे जमा कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे सादरीकरण करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे आणि ‘मेरा युवा भारत’च्या समन्वयक दीक्षा पोयाम यांनी केले आहे.

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Comment