best news portal development company in india

जागतिकीकरणाच्या युगात सांस्कृतिक परंपरांचा जागर : राहुल बोंद्रे

SHARE:

अनुराधा नगरीतील श्री महाकांलेश्वर महादेव मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप

बुलढाणा न्यूज  https://buldhananews.com

३१ ट्रॅक्टरवर आकर्षक व संदेशप्रधान सांस्कृतिक देखावे..
कावड यात्रेदरम्यान विद्यार्थ्यांनी सुमारे ३१ ट्रॅक्टरवर आकर्षक व संदेशप्रधान सांस्कृतिक देखावे सादर केले. या देखाव्यांमध्ये भगवान शिव-पार्वती विवाह, अर्धनारीनटेश्वर, कैलास पर्वत, शिव तांडवनृत्य, जय मल्हार आदी विविध धार्मिक प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे कावड यात्रेला अधिक भव्य व आकर्षक स्वरूप प्राप्त झाले.

          चिखली : जागतिकीकरणाच्या युगात आपल्या सांस्कृतिक परंपरा टिकवून ठेवणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. कावड यात्रा सारखे उत्सव आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवतात. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम हे केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून सामाजिक एकात्मतेचे व्यासपीठ आहेत. अशा उपक्रमांतून समाजात बंधुभाव, शिस्त आणि मूल्यांची जपणूक होते. परंपरा जपत असताना आधुनिक विचारांची सांगड घालणे आवश्यक आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहातही आपली ओळख, संस्कृती आणि सामाजिक जबाबदारी जपणारा समाजच खर्‍या अर्थाने प्रगत ठरतो, असे मत   महाकांलेश्वर महादेव मंदिर येथे कावडयात्रेच्या समारोप प्रसंगी बोलताना राहुल बोंद्रे यांनी केले.


चिखली शहरात ॐ नमः शिवाय व  हर हर महादेवच्या जयघोषात करत, श्वेत वस्त्र परिधान केलेल्या शेकडो कावडधार्‍यांचे शहरात ठिकठिकाणी रांगोळी, पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. जवळपास दोन ते तीन तास कावडधारी शिवभक्त व महिलांनी पंचाक्षरी मंत्राचा जप करत सजविलेल्या कावडींसह पायी प्रवास केला. मार्गावर विविध संस्था व नागरिकांनी रांगोळी, पुष्पवृष्टी व आतीषबाजीद्वारे स्वागत केले. चहा, पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी महाशिवरात्रीनिमित्त अनुराधा परिवाराच्या वतीने आयोजित कावड यात्रेला चिखली शहर व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हर हर महादेव आणि  ॐ नमः शिवायच्या जयघोषाने अवघी नगरी भक्तिमय वातावरणात दुमदुमली. अनुराधा नगरीतील श्री महाकांलेश्वर महादेव मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त पुरातन पंचमुखी महादेव मंदिर येथून कावडीतून आणलेल्या पवित्र जलाने अनुराधा नगरस्थित महाकांलेश्वर मंदिरात शिवलिंगाचा जलाभिषेक करण्यात आला. परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राहुल बोंद्रे व हिरकणी उत्कर्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अ‍ॅड. सौ. वृषाली बोंद्रे, मुंगसाजी महाराज सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र बोंद्रे,  विश्वस्त सौ.भारती बोंद्रे यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली.

 

अनुराधा परिवाराचे जनक कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही कावड यात्रा गेल्या २० वर्षांपासून सातत्याने आयोजित केली जात आहे. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि सामाजिक जागर निर्माण करण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत असतो. या वेळी अनुराधा परिवारातील विविध शैक्षणिक संस्था, सुतगिरणी, बँका व सहकारी संस्था तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेल्या महिला व पुरुष चिखलीकरांचीही लक्षणीय उपस्थिती पाहावयास मिळाली.  श्री महाकांलेश्वर महादेव मंदिर परिसरात कावड यात्रेसोबत आयोजित धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. भजन, शिवनामाचा गजर झाल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळेस मोठ्या धार्मिक सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संगम अनुभवत चिखली नगरीने यंदाची महाशिवरात्री उत्साहात साजरी केली.

 

Leave a Comment

best news portal development company in india
और देखें