अमरावती शिक्षक मतदारसंघ : बुलढाण्यात ९,८१० मतदार, सुरेश देवकरांच्या विजयाचा विश्वास
सुरेश देवकरांच्या सांगता सभेत कपिल पाटील यांचा विश्वास; शिक्षकांच्या हक्कांसाठी परिवर्तनाचा निर्धार
बुलढाणा : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बुलढाणा जिल्हा निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिक्षक भारतीने जिल्ह्यात तब्बल ९ हजार ८१० शिक्षक मतदारांची नोंदणी केली असून, या मतदारांच्या भूमिकेवर निवडणुकीचे गणित अवलंबून असल्याचा विश्वास शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांनी व्यक्त केला. शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर यांच्या नेतृत्वातून शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळेल आणि अमरावती विभागात नवा इतिहास घडेल, असा दावाही त्यांनी केला.
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातील शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर यांच्या प्रचारार्थ रविवार, १८ ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर सभागृहात सांगता सभा पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कपिल पाटील बोलत होते. व्यासपीठावर उमेदवार तथा शिक्षक भारतीचे अमरावती विभागीय अध्यक्ष सुरेश देवकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर आणि शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे उपस्थित होते.

शिक्षकांच्या हक्कांसाठी देवकर सक्षम नेतृत्व : कपिल पाटील
अमरावती शिक्षक मतदारसंघाला परिवर्तनाची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख आणि शिक्षणतज्ज्ञ व शिक्षक नेते बी. टी. देशमुख यांनी या विभागाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी सुरेश देवकर समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
देवकर यांच्याकडे शिक्षकांचे प्रश्न समजून घेण्याची क्षमता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक परिवर्तनाची जाणीव आहे. त्यांनी शिक्षण घेतलेल्या संस्थेसाठी वसतिगृह उभारण्यासारखे काम केले असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठीही लाखो रुपयांची मदत केली आहे. आमदार म्हणून संधी मिळाल्यास शिक्षकांचा सन्मान, त्यांचे हक्क आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी ते पुढाकार घेतील, असे पाटील म्हणाले.
बुलढाणा जिल्हा हा समाजसुधारकांच्या विचारांचा वारसा जपणारा जिल्हा आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार मांडणाऱ्या क्रांतिकारक लेखिका ताराबाई शिंदे यांच्या कार्याचा गौरव व्हावा, यासाठी देवकर स्मारक उभारण्याचा प्रयत्न करतील, असेही त्यांनी नमूद केले.
९ हजार ८१० मतदारांमुळे बुलढाण्याचे महत्त्व वाढले
बुलढाणा जिल्ह्यात शिक्षक भारतीने ९ हजार ८१० शिक्षक मतदारांची नोंदणी केल्याचा उल्लेख करत सुरेश देवकर यांनी ही निवडणूक शिक्षकांनी स्वतःच्या हातात घेतल्याचे सांगितले. जिल्ह्यातील शिक्षकांच्या भावना आणि त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतरच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. शिक्षकांची अनेक वर्षांपासूनची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, विजयाची किल्ली जिल्ह्यातील शिक्षकांच्या हातात असल्याचे देवकर म्हणाले.
प्रचारसभेपेक्षा वैचारिक मंथनावर भर
सभेच्या प्रारंभी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्ञानज्योती फातिमा शेख, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतमातेच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सुभाष मोरे आणि सौरभ खेडेकर यांच्या भाषणांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला.
सभागृहाबाहेर आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनातून सुरेश देवकर यांच्या वैचारिक भूमिकेची ओळख उपस्थितांना झाली. त्यामुळे ही सभा केवळ निवडणूक प्रचारापुरती मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तन, शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर विचारमंथन करणारी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल रिंढे यांनी केले, तर जिल्हाध्यक्ष अशोक खोरखेडे यांनी आभार मानले.
अमरावती शिक्षक मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी; बंडखोरीमुळे निवडणुकीत चुरस वाढली
– प्रचार अंतिम टप्प्यात: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे.
– महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी: दोन्ही प्रमुख राजकीय आघाड्यांमध्ये बंडखोरी उफाळल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस अधिक तीव्र झाली आहे.
– भावनिक आवाहनांवर भर: पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांद्वारे विजयाचा कोटा गाठण्याचे आव्हान लक्षात घेऊन उमेदवारांकडून शिक्षक मतदारांना भावनिक साद घातली जात आहे.
– पेन्शन न घेण्याच्या घोषणा: काही उमेदवारांनी ‘मी कधीही पेन्शन घेणार नाही’, तर काहींनी मानधन किंवा इतर भत्ते स्वीकारणार नसल्याच्या घोषणा करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
– जुन्या पेन्शनवरून आरोप-प्रत्यारोप: जुनी पेन्शन योजना रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून माजी आणि विद्यमान शिक्षक आमदारांना लक्ष्य केले जात आहे. शिक्षकांच्या हक्काच्या पेन्शनसाठी लोकप्रतिनिधींनी काय भूमिका घेतली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अन्य अपक्ष उमेदवारांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.
– मतविभाजन टाळण्यासाठी प्रयत्न: प्रमुख पक्षांतील अंतर्गत मतभेद आणि बंडखोर उमेदवारांमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवार आणि त्यांचे समर्थक मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत.
– शिक्षकांचे प्रश्न चर्चेत: जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शाळांचे प्रश्न, शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण आणि प्रलंबित मागण्या हे निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे ठरत आहेत.
– आश्वासनांमुळे मतदार संभ्रमात: शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नांवरील ठोस उपाययोजनांपेक्षा विविध आश्वासने आणि भावनिक आवाहनांवर भर दिला जात असल्याने शिक्षक मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
– निकालाकडे सर्वांचे लक्ष: बंडखोरी, मतांचे संभाव्य विभाजन आणि उमेदवारांमधील वाढती चुरस या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील शिक्षक मतदार कोणाला पसंती देतात आणि विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
‘मिशन परिवर्तन’अंतर्गत शेगाव ग्रामीण हद्दीत गांजा तस्करीवर कारवाई






