‘मिशन परिवर्तन’अंतर्गत शेगाव ग्रामीण हद्दीत गांजा तस्करीवर कारवाई

SHARE:

२० किलो ५६० ग्रॅम गांजासह १० लाख ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक

शेगाव : बुलढाणा जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन परिवर्तन’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली. शेगाव-खामगाव मार्गावरील सवर्णा शिवारातील यश ढाब्याजवळ गांजा बाळगणाऱ्या दोघांना पकडण्यात आले. या कारवाईत २० किलो ५६० ग्रॅम गांजासह एकूण १० लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून बुलढाणा जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात ‘मिशन परिवर्तन’ राबविण्यात येत आहे. गांजा व इतर अंमली पदार्थांची अवैध वाहतूक, साठवणूक, उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात येत होते.

दरम्यान, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेगाव-खामगाव मार्गावरील सवर्णा शिवारात काही व्यक्ती गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगून असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यश ढाब्याजवळ पंचांच्या उपस्थितीत कारवाई केली. यावेळी दोन संशयितांकडे गांजा आढळून आला.

दोन आरोपींकडून मुद्देमाल जप्त

या प्रकरणात हुसेन खान युसूफ खान (वय २५, रा. वार्ड क्रमांक १२, शेगाव) आणि आसिफ खान एजान खान (वय २९, रा. ईदगाह प्लॉट, शेगाव, ता. शेगाव, जि. बुलढाणा) यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी त्यांच्याकडून २० किलो ५६० ग्रॅम गांजा, अंदाजे किंमत १० लाख २६ हजार रुपये, एक अॅक्सिस मोपेड (क्रमांक एमएच २८ बीवाय ३१६९) किंमत २५ हजार रुपये, एक बॉक्सर दुचाकी (क्रमांक एमएच ३० के ९८८४) किंमत २५ हजार रुपये आणि दोन मोबाईल फोन किंमत २० हजार रुपये असा एकूण १० लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

दोन्ही आरोपींविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) आणि अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोलीस हवालदार राजेंद्र टेकाळ, अनुपकुमार मेहेर, विजय वारुळे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश सनगाळे, अमोल वनारे, मनोज खरडे, सतीश नाटेकर, चालक विकास देशमुख, समाधान टेकाळे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल कैलास ठोंबरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Comment