बुलढाणा न्यूज

अंधश्रध्दा माणसाला दैववादी बनविते – संत गाडगेबाबा

गाडगेबाबा एक महान संत होते, परंतु संताची पारंपारिक बिरुदे त्यांनी कधी मिरवली नाहीत. अगदी साध्या आणि सोप्या शब्दात त्यांनी आपल्या सामान्य माणसाला भजन किर्तनातून जागे केले. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघडया नागडयांना वस्त्र, गरीब मुला-मुलींना शिक्षण, बेघरांना आसरा, रोग्यांना औषोधोपचार, गावठाण स्वच्छ ठेवायचे, बेकारांना रोजगार, पशु-पक्षांना अभय, गरीब तरुण-तरुणीचे लग्न, दु:खी व निराशांना समाजाने हिम्मत द्यावी, असा बाबांचा आयुष्यभर ध्यास होता आणि ते शहरा-शहरातून, खेडया-पाडयातून भजन किर्तनातून लोकांना चेतविण्याचे काम करीत असत. अंधश्रध्दा ही माणसाला दैववादी बनविते आणि दैववाद हा नेहमी घातक असतो.

त्यादिवशी रत्नागिरी जिल्हयातल्या खारेपाटण या गावी बाबांचे किर्तन होते, गोपालाच्या गजरातुन किर्तनाला सुरुवात झाली, वातावरण भरुन गेले. देहभान विसरुन जनता नाचू लागली. त्याच क्षणी तार घेऊन पोस्टमन आला. बाबांना आलेली ती तार गोविंदाच्या बाबांच्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची होती. किर्तनातून तारेतील बातमी कशी सांगावी याचा विचार करीत तो उभाच राहिला. तेवढयात बाबा त्याला ओरडले, अरे उभा का आहेस ? बसखाली ! या संधीचा फायदा घेऊन पोस्टमनने बाबांना सांगितले. बाबा, आपला “गोविंदा वारला हो ! ही तार आलीय ! गोविंदा वारला ! हे शब्द ऐकुन बाबा क्षणभर शांतपणे उभे राहिले. एकक्षण झाला नि एकदम निर्विकार मुद्रेने ते मोठयाने म्हणाले, “एैसे किती गेले कोटयाने, कां रडु एकासाठी” ? पण 6 डिसेंबर 1956 रोजी जेव्हा डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले, तेव्हा गाडगेबाबा सतत 14 दिवस दु:खी राहले व अन्न पाण्याचा त्याग केला. 15 व्या दिवशी म्हणजे 20 डिसेंबर 1956 रोजी त्यांचेही निर्वाण झाले. गाडगे महाराजांसारखा पुन्हा संत होणे नाही.

ते आपल्या काही टाळकऱ्यां समवेत गावोगाव जाऊ लागले आणि देवापुढे बकरे व कोंबडे बळी देणे किंवा त्यांना दारुचे नैवेद्य दाखवून मग ती दारु स्वत: पिणे, अस्पृश्यता मानणे, कर्ज काढून थाटात लग्न करणे, शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे अशा गोष्टींवर आपल्या वारकरी पध्दतीच्या किर्तनातून कडक टिका करु लागले. असा कसा तुमचा देव। कोंबडयांचा घेतो जीव।। अशा तऱ्हेचे अंधरुढींवर प्रहार करणारे अभंग-चरणगात, बघूनच श्रोत्यांना खोचक प्रश्न विचारुन त्यांची स्वत:च उत्तरे देत अधून मधून गोपाला गोपाल देवकीनंदन गोपाला, असा गजर करीत. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर गुजरात व कर्नाटकातील भोळया-भाळया लोकांना सन्मार्ग दाखविला. आज हुंडा विरोधी चळवळ फार जोरात चालू आहे, पण त्याकाळात बाबांनी या घातक पध्दतीचा किर्तनातून चांगलाच खरपुन समाचार घेतला. लग्नात हुंडा देण्या-घेण्याने लोक कर्ज बाजारी होतात. मग कर्ज फेडता-फेडता त्यांचा नाकी नऊ येऊन कित्येक संसार उद्ध्वस्त होतात, म्हणून दु:खात आयुष्य घालविण्यापेक्षा झुणका-भाकरी व लग्ने लावल्यास दोन्ही पक्षांना व नवरा-नवरीला सुखाचे दिवस घालविता येतील, असा संदेश ते लोकांना देत असत.
संत गाडगेबाबा यांच्या बाबतीत बोलायचं झाले तर गाडगेबाबा हे शिकलेले नव्हते, परंतु त्यांनी देशाला शिकविले. देशाला समता, बंधुता, प्रेम व सत्कर्माचा मार्ग दाखविला आहे. हे करतांना मात्र अंधश्रद्धा, पाखंड, विषमता, भेदभाव, कर्मकांड यावर प्रबोधन करून समाजाला जागृत केले व शिक्षणाचा संदेश आपल्या किर्तनामधुन संत गाडगेबाबा यांनी दिला. संत गाडगेबाबा अडाणी असुनही आज आम्हाला वंदनीय कां आहेत, तर गाडगेबाबा यांनी समाजासाठी जे काही केले ते निस्वार्थ भावनेने व लोककल्याणासाठी केले. अडाणी असले तरीही भल्याभल्यांना लाजवेल, अशी कामे त्यांनी केली. वेगवेगळ्या ठिकाणी धर्मशाळा बांधून लोकांना आश्रय निर्माण करून दिला. धर्मशाळेमध्ये भोजन व निवास व्यवस्था करून दिली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे धर्मशाळेची जबाबदारी देतांना ते खुप विचार करत होते. सर्वांसाठी जेवन एकच असले पाहिजे, धर्मशाळा सांभाळणारे वा तेथे काम करणारे इमानदार असले पाहिजे, ते व्यसनी नसावे, त्यांचे नातेवाईक नेहमी धर्मशाळेत येता कामा नये. एखाद्या वेळी आलेच तर फक्त एका वेळची जेवनाची सोय तेथे होईल, बाकी त्यांना त्यांची सोय बाहेर करावी लागेल. आजचा विचार केला तर याउलट परिस्थिती आहे, राजकीय लोकांचे काम गाडगेबाबा यांच्या विचाराविरोधात आहेत. गाडगेबाबा यांनी लोकवर्गणीतून एवढ्या धर्मशाळा बांधल्या परंतु त्याचा एकही रुपया स्वतः साठी खर्च केला नाही ही आजच्या व्यवस्थेला भ्रष्ट सरकारला चपराक आहे.

कोटीच्या धर्मशाळा। बांधल्या लोकांसाठी।
झोपडी नशिबी नाही। कुंताबाईच्या।
काढीले अन्नछत्र।भुकेले होती तृप्त।
वाट्याला माझ्या। नाही अन्नशित।

लोकांच्या पोटापाण्याची आणि राहण्याची सोय करून देणाऱ्या गाडगेबाबा यांच्या पत्नीला मात्र गरीबीतच जिवन जगावे लागले, कारण गाडगेबाबा करोडो रुपयांच्या धर्मशाळा व अन्नछत्र बांधत असले, तरी तो पैसा लोकांचा आहे. म्हणून वैयक्तिक खर्च करणार नाही, एवढे प्रामाणिक व समाजाप्रती संवेदनशील गाडगेबाबा होते. आजचे लोक तर लोकांच्या पैशावर अगोदर स्वतः चे घर भरतात, बेईमानी करतात, स्वतःला महाराज समजणारे लोक गोरगरीब लोकांकडून पैसा उकळून स्वतः चे घर भरतात व समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवतात. गाडगेबाबा यांनी अंधश्रद्धा व कर्मकांड यावर समाजात भरपूर प्रबोधन करून समाजाला विज्ञानवादी बनविण्याचा भरकस प्रयत्न केला. तिर्थ कर्मकांड हे पैशाचा नाश करणारे आहेत, ते पोट भरण्याचे साधने आहेत. देवाच्या नावाखाली लोकांची होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूक यामुळे गाडगेबाबा यांचे मन उदास होत होते, म्हणून गाडगेबाबा म्हणायचे :

देव देव करता शिणले माझे मन
पाणी आणि पाषान जिथे तिथे

दगडामध्ये व तिर्थामध्ये देव नसतो, तिथे तर फक्त पाणी आणि दगड असतात. देव बघायचा असेल तर माणसात बघा आणि त्याची सेवा करा असा उपदेश गाडगेबाबा करत असत. परंतु हा उपदेश आजही काही लोकांच्या जिव्हारी लागतो, कारण लोकांची दिशाभुल करून लोकांचे पैसे हडपण्याचे कार्य आजच्या स्वयंघोषित महाराजांकडून तर लोकांच्या हक्काचे पैसे गिळंकृत करण्याचे काम राजकीय नेत्यांकडून केले जात आहेत. आजही लोकांना दगडातील देवासाठी भक्ती करायला लावली जात आहे आणि त्यामुळे मंदीराबाहेर भिकाऱ्यांची संख्या मात्र वाढत आहे, हिच खरी भारताची शोकांतिका आहे. आज देशात तेच घडत आहे, जे गाडगेबाबांनी फार वर्षापूर्वी सांगितले होते. म्हणुन ते म्हणत शिक्षित बना, विज्ञानवादी बना, देवालयात जाऊ नका, अंधश्रध्देला भीक घालू नका !

शिक्षणाचे उदाहरण पटवून देतांना आणि लोकांना समजेल असे एकमेव उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकले म्हणून त्यांनी देशाची घटना लिहली, त्यांचा इतका शिक्षित देशात कुणी नव्हताच. म्हणुनच त्यांना घटना लिहण्याची विनंती करण्यात आली. जर ते शिकलेच नसते तर घटना लिहु शकले नसते, म्हणून परिस्थितीला आड आणुन मुलांना शिक्षणापासून दुर ठेऊ नका, अंगावर लुगडं कमी भावाचं घाला, भाकरी हातावर घेऊन खा, पण मुलांना शाळा शिकवा, शिक्षणामुळे कुळाचा उध्दार होऊ शकतो, असेही ते किर्तनात पटवून देत असत. ही शिकवण म्हणजे आजही समाजाला दिशा देणारी आहे. पंढरपूर येथे बांधलेली धर्मशाळा त्यांनी ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द करून दिली.

आपले विचार साध्या भोळया लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगाचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळया माणसा पासून ते शहरी नास्तिका पर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या किर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्वज्ञान पटवून देत. त्यांच्या किर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदी बाहेरचे काम आहे’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
गाडगे महाराज यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’ असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगे बाबांबद्दल काढले आहेत. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन ‘संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ’ असे नामकरण करण्यात आलेले आहे.

शिक्षण ही काळाची गरज आहे. दु:खावरील जालीम औषध आहे. शिक्षण समाज प्रबोधनाचा मार्ग आहे, शिक्षण हे समाज सुधारक याची गुरुकिल्ली आहे, हे सर्वविधीत आहे. तिथे सामान्यांच्या मुलांसाठी शाळा, महाविद्यालय उघडली. शिक्षणक्षेत्रात काम करणारे समकालीन संत तुकडोजी महाराज, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे प्रोत्साहन दिले आणि शिक्षणाचे महत्व गिरविले. आपल्या भजन किर्तनातून माणसांना शिक्षणाचे महत्व सामान्य लोकांना पटवून दिले आणि शिक्षणाचे द्वारे लोकांकरीता खुले केले. आपल्या व्यक्तिक अनुभवावरुन समाजशिक्षण अभावी किती लंगडा आहे, हे त्यांनी जाणले होते. त्यासाठी त्यांनी धर्मशाळा, घाट, मंदिरे स्थापनेपेक्षा शिक्षण मंदिराकडे आपला मोर्चा वळविला. त्यांनी आपल्या जीवनात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात अनेक शिक्षण संस्था उभ्या केल्या. अनाथाश्रम, आश्रमशाळा, वस्तीगृहे या सारख्या संस्था निर्माण करुन गोरगरीब मुलांची राहण्याची व शिक्षणाची सोय अख्या महाराष्ट्रात व बाहेर केल्याचे आपणास दिसून येते. त्यांच्या या अथक परिश्रमातून हेवा वाटावा असे त्यांनी कर्म केले आहे. त्यांच्या  जन्मदिनी शतश: अभिवादन !

प्रविण बागडे नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल : pravinbagde@gmail.com

Leave a Comment

और पढ़ें