बुलढाणा न्यूज

भगवान बुध्दाचा धम्म मानवतेकडे Lord Buddha’s Dhamma to Humanity

        बुलढाणा न्यूज www.buldhananews.com      भोग आणि क्लेश ही जीवनाची आत्यंतिक दोन टोके टाळून या मधला सुलभ, सरळ ज्ञानाचा सन्मार्ग म्हणजे तथागतांचा मध्यममार्ग होय. या मध्यममार्गाचा तथागतांनी केलेल्या शिकवणीचा उपदेश म्हणजे धम्म. डॉ. बाबासाहेबांनी सर्वार्थाने आपला मानला तो अवैदिक, निरीश्वरवादी, अनात्मवादी, भौतिकवादी, तत्वज्ञ-आदिम, साम्यवादी गणसंस्थेशी जीवंत नाते सांगणारा शाक्य गौतम, करुणाघन, मध्यममार्गी, समतावादी, विश्वबंधुत्व, समानता व मानवी स्वातंत्र्य, एकमेकांविषयी प्रेम भावना, करुणेची भावना इत्यादि मानवाच्या कल्याणासाठी हितकारक गुणतत्वे जोपासणार्‍या विज्ञाननिष्ठ, तर्कशुध्द, निर्भेड व विशुध्द जीवन मार्गावर आधारित अलौकिक अशा पवित्र धम्माची स्थापना करणारे जगातील पहिले क्रांतीकारी महामानव म्हणजेच धर्म संस्थापक महात्मा तथागत भगवान गौतम बुध्द !

            सिध्दार्थ गौतमाने रोहिणी नदीच्या वादातून गृहत्याग केला व परिव्रजा घेतली. कपिलवस्तुहून राजगृहास आले असता मगधधिपती राजा बिंबीसार यांनी त्याची भेट घेतली. राजा बिंबीसार यांनी सिध्दार्थ गौतमास ऐहीक सुखोपभोगाबाबत उपदेश केला आपण पुन्हा कपिलवस्तुत परतुन राज्योपभोग घ्यावा, तेथे जाणे उचित वाटत नसल्यास मी माझे अर्धे राज्य आपणांस देतो तेथे आपण राज्य करावे अशी विनंती केली, परंतू संन्यासाचा जीवन मार्ग अवलंबू नये. तद्प्रसंगी सिध्दार्थाने राजा बिंबीसारला विचारपुर्वक गांभीर्याने खणखणीत उत्तर दिले सुख म्हणजे उपभोग, असे सर्वसाधारण मानले जाते. कसोटीला लागल्यास त्यापैकी एकही उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही. तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, तसेच भुक शमविण्यासाठी अन्न हवे असते आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी वार्‍यापासून संरक्षण करण्यासाठी कपडयांची आवश्यकता असते, झेापेची गुंगी घालविण्यासाठी बिछाना असतो, प्रवासाचा शीण होवू नये म्हणून वाहन असते उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते. तसेच शरीराची शुध्दी, आरोग्यासाठी स्नान एक साधन असते. फक्त बाहय वस्तु म्हणजेच मानवाच्या दु:ख निवारण्याची साधने नव्हती. म्हणून अन्न-वस्त्र-निवारा इत्यादी मुलभुत गरजांना प्राधान्य न देता मानवी कल्याणाचा सुखाचा शोध घेण्यासाठी ज्ञान अर्थात शिक्षण महत्वाचे असते. मिळविलेल्या ज्ञान चितंनातून मानवाच्या कल्याणासाठी खास जीवन मार्ग शोधला ज्ञानाने व्यक्तीचा सर्वागीण विकास घडविण्यास मदत होते. हा संदेश संपुर्ण विश्वाला तथागताने दिला.
व्यक्ति विकासासाठी मानवास शिक्षणाचे-ज्ञानाचे महत्व किती आहे, हे आपल्या देशातील अनेक महामानवाने जाणले. मानवाचे कल्याण त्याचे सुख कशात आहे. याचा शोध घेता महामानवांना आढळले की, प्रथम प्रत्येक व्यक्ति ही शिक्षित-ज्ञानी झाली पाहिजेत. शिक्षण ज्ञान मानवाच्या कल्याणाचे, सुखाचे प्रमुख अंग आहे. त्याचा विकासच राजमार्ग आहे, हा राजमार्ग सर्वप्रथम जगाला दाखविला महाकारुणिक गौतम बुध्दाने. भगवान बुध्दांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू आहेत. त्यांच्या विविध पैलूंचा अभ्यास विविध अंगानी व विविध दृष्टीकोणातून होणे आज आवश्यक आहे. तथागत बुध्दाच्या व्यक्तीमत्वामध्ये ज्या प्रमाणे चुंबकीय तत्व होते, त्याचप्रमाणे त्यांचे तत्वज्ञानामध्ये असे चुंबकीय तत्व होते की, ज्यामुळे असंख्य लोक त्यांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित झालेले होतेच. परंतू त्याही पेक्षा किती तरी पटीने त्यांच्या तत्वज्ञानाने, त्यांच्या तत्वज्ञानातील सभ्यतेने प्रभावित होऊन त्यांनी त्याचे अनुयायीत्व स्विकारलेले होते.

           दलित तरुण (आंबेडकरवादी) हा अधिक पुरोगामी व विज्ञाननिष्ठ बनतो आहे, याचे कारण धर्मांतर आहे. याला राजकिय स्वार्थासाठी गेली 40 वर्षे जाति-धर्माच्या जाळयात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न होत असला तरीही बंधने झुगारुन देणारी वृत्ती दलित तरुणांमध्ये वेगाने वाढत आहे. याला साक्ष म्हणजे 1972 नंतरची केवळ दलित तरुणांची आंदोलने आहेत.

       भगवान बुध्दांच्या व्यक्तिमत्वाची छाप व त्यांच्या तत्वज्ञानाची पकड इतकी मजबुत आहे की, भारत भुमीच्या या महापुत्राने केवळ भारताचाच नव्हे तर संपुर्ण विश्वालाच प्रभावित केलेले आहे. भारताच्या इतिहासामध्ये एवढा प्रतिभा संपन्न, प्रखर बुध्दीवादी, ध्येयवादी व मानवतावादी अजून कधी झालेला नाही. यापुढे देखील होणे नाही ज्याला संपुर्ण जग सन्मान पुर्वक विनम्र होत असते.  बुध्द हा अशा स्वयं प्रज्ञेचा माणुस होता की, ज्याने जगाला पहिल्यांदा प्रखर बुध्दीवादाची व ध्येयवादाची शिकवण दिली. भगवान बुध्द म्हणतात, अत्त-दिपो-भव, अत्त-विरहत, अत्त-सरणा अर्थात हे मानव प्राण्यांनो स्वत:चे दिप व्हा, स्वयं प्रकाशित व्हा आणि स्वत:ला शरण जावून स्वत:चच विचरण करा, दुस-या कुणालाही शरण जावू नका, दुसरा कुणीही तुम्हाला शरण जाण्या योग्य नाही तुम्ही स्वत:च स्वत:चे  शरणस्थान आहात, यामध्ये जगाच्या सभ्यतेचा व संस्कृतीच्या इतिहासामध्ये भगवान बुध्दाने पहिल्यांदा मनुष्याला परा प्रवृत्ती, दैव, ईश्वर, आत्मा परमात्मा संकल्पना पासून मुक्त होण्याचा महामंत्र दिला व  तो जोपासून ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे.
लॉकडाऊनच्या काळात ज्यांचे हातावरील पोट आहेत, अशा गरजू लोकांच्या भोजनाची व्यवस्था करतांना अनेक लोक किंवा संस्था दिसत होत्या. अनेक लोक अडचणीत सापडले असतांना, त्यांना सर्व प्रकारची मदत करतांना दिसत होते. ही मदत करतांना कुणीही जात, धर्म विचारला नाही, फक्त माणूसकी धर्म पाळत होते. धार्मिक श्रध्दा व विश्वास हा मिथ्या आहे, विज्ञान व मानवतावाद आणि माणूसकी सत्य आहे हेच सिध्द होते. म्हणूनच माणसाने माणसाशी कसे वागावे याचा आदर्श घालून देणारा बुध्दांचा धम्म श्रेष्ठ आहे आणि तोच जगात शिल्लक राहील. The Buddha’s Dhamma is the best and will remain in the world
         

       बुध्दाचे चरित्र आणि चारित्र्य निर्मळ पाण्याच्या प्रवाहा सारखे होते. तो करुणेचा महासागर होता, रंजल्या गांजल्यांचा तो कैवारी, सखा, मित्र आणि मार्गदर्शक होता. जगाच्या इतिहासात अशी माणसे अपवादात्मक असतात अशा सम्यक सम्बुध्दाला अनुसरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या पुढे सर्जनशील आदर्श निर्माण केला. बुध्द-बाबासाहेब हे आमच्या सर्वकष मुक्तीचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी आम्हाला सन्मार्ग उपलब्ध् करुन दिला आहे. मार्गक्रमण आम्हाला करावयाचे आहे. त्यासाठी स्वयं प्रकाशित होवून आम्ही बुध्द-धम्म व संघ यांच्या प्रती एकनिष्ठ राहून धम्मचक्र प्रवर्तनाची सम्यक क्रांती गतीमान ठेवली पाहीजे. The right revolution of Dhamma Chakra implementation should be kept in motion. 67 व्या धम्मक्रांतीच्या समस्त जनतेला मन:पूर्वक शुभेच्छा !


प्रविण बागडे नागपूर – 14
भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल :  pravinbagde@gmail.com

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाने डॉ.वामनदादा कर्डक यांना मानद डॉक्टयरेट प्रदान करून फुले-आंबेडकरी चळवळीचा सन्मान केला आहे

Leave a Comment

और पढ़ें