बुलढाणा न्यूज

श्रमप्रतिष्ठा मुल्यांची शिकवण देणारे – कर्मवीर भाऊराव पाटील

बुलढाणा न्यूज

श्रमप्रतिष्ठा मुल्यांची शिकवण देणारे – कर्मवीर भाऊराव पाटील
नहि ज्ञानेन सदृश पवित्र इह विद्यते या संस्कृत सुभाषितात ज्ञानाचे महत्व सांगितले आहे. हे ज्ञान मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या अनेकांना अडचणींना तोंड द्यावे लागते. दुर असलेल्या खेडयापाडयातील मुलांना तर आपल्या गावात काही इयत्ता शिकविल्यावर, पुढच्या इयत्तांचे शिक्षण घेण्यासाठी गावसोडून दूरच्या ठिकाणी जावे लागते. पण राहण्याची व्यवस्था, शिक्षणाचा खर्च अशा अडचणीमुळे ते शक्य होत नाही. या अडचणींची जाणीव झालेल्या भाऊराव पाटील या कर्मवीरांना झाली आणि त्यासाठी केलेले महत्त कार्य महत्वाचे म्हणायला हरकत नाही.
बहुजन समाजाच्या अडीअडचणी, शिक्षणविषयक मागासलेपण या विचारांनी त्यांचे मन भारावून गेले. समाजातल्या दीन-दारिद्री मजुर शेतकरी आणि समाजाने अस्पृश्य मानलेल्या दलितांविषयी त्यांच्या मनात करुणा निर्माण झाली. त्या सर्वांना माणूसकीच्या भावनेने काय आणि कशी मदत करता येईल याचा ते विचार करु लागले. नंतर सत्यशोधक समाजाचे प्रचारक म्हणून त्यांनी त्या कार्याला वाहून घेतले.
पुढे बहुजन समाजाच्या उध्दारासाठी निर्माण झालेल्या चळवळीला जेव्हा धार्मीक, जातीय आणि राजकीय स्वरुप येऊ लागले तेव्हा भाऊरावांनी शिक्षण प्रसार हेच जीवन कार्य निवडले, सातारा येथे त्यांनी आपल्या कार्याचा आरंभ केला. अज्ञानी जनतेला सज्ञान करायचे तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही हेओळखून त्यांनी रयत शिक्षण संस्थे ची स्थापना केली. सर्वच ध्येयवादी सहकारी मिळवले. त्यांनी खेडोपाडी जाऊन मुलांच्या शिक्षणविषयक अडचणी समजून घेतल्या आणि त्या मुलांची प्राथमिक गरज लक्षात घेतली. त्यासाठी प्रथम वसतिगृहांची आणि मोफत शिक्षणाची सोय त्यांनी केली. उपरोक्त संस्थेत स्वावलंबनाला महत्व दिले जाऊन, शिकणार्‍या मुलांना श्रम करुन शिका हा मंत्र भाऊरावांनी दिला. त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी वसतिगृहे आणि शाळा यांचे जाळे निर्माण केले, जे आजही सातत्याने अविरत सुरु आहेत.
त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना झळ न लागू देता मुलांना शिक्षण देण्याला महत्व होते. मुलांच्या कष्टाने शेती-बागायती, वसतिगृहे-शाळा यांचे बांधकाम अशा विविध कामात विद्यार्थ्यांचा सहभाग असल्यामुळे चवाचणारा पैसा मुलांच्याच शिक्षणासाठी वापरला जावा, ही त्यांची आंतरीक ईच्छा. सामुदायिक श्रम आणि सहशिक्षण याचे संस्थेने केलेली योजना यशस्वी ठरली, गावोगावी संस्थेचे कार्य पसरले. त्यांचा आपणहून या कार्यात सहभाग होऊ लागला, पैसा जमा होऊ लागला, सहकार्य मिळू लागले. त्यामुळे संस्था स्थिर आणि फोफावत गेली.
सांगली जिल्हयातील कुंभोज नावाच्या छोटयाशा खेडयात 22 सप्टेंबर 1887 रोजी भाऊरावांचा जन्म झाला. त्याच ठिकाणी वास्तव्यात असतांना जीवनातील अडचणींशी परिचित भाऊराव एका विशिष्ट ध्येयाने ज्ञान प्रसाराचे कार्य करीत राहिले. कराड जवळच्या काले या गावात त्यांनी 1919 मध्ये पहिले वसतीगृह काढले नंतर सातारा येथे 1924 मध्ये अस्पृश्यांसह सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश असलेले वस्तीगृह निर्माण केले. भाऊराव पाटील यांनी निरलसपणे जी जनतेची सेवा प्रारंभापासून केली आणि गोरगरीब कुटुंबातील हुशार मुलांना ज्ञानाची दारे उघडी करुन दिली. 1937 मध्ये महात्मा गांधींनी सातार्‍याच्या शाहू बोर्डिग वसतिगृहाला भेट दिली आणि कर्मवीर भाऊराव पाटील करीत असलेल्या कार्याची प्रशंसा केली.
या संस्थेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यापैकी काही जणांना तर परदेशात पाठवून उच्चशिक्षण घेण्याची संधी ही उपलब्ध करुन देण्यात आली. बॅ. पी.जी. पाटील हे पुढे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु झाले. त्यांच्या मनातली कर्मवीरांविषयी आदराची आणि कृतज्ञेची भावना अनेकदा ते बोलून दाखवितात. असेच आणखी कितीतरी विद्यार्थी संस्थेच्या आणि कर्मवीरांच्या प्रयत्नाने उच्चशिक्षण घेऊ शकले, त्यातल्या काहींनी संस्थेच्या कार्यालाच वाहून घेतले.
शिक्षणाविषयी मूलभूत विचार केलेले आणि समाजहितासाठी ज्ञानाची द्वारे दीन दलितांसाठी उघडे करणारे थोर क्रियाशिल विचारवंत अशी त्यांची प्रतिमा समाजाच्या मनात आहे. एकप्रकारे महात्मा फुले आणि महर्षी शाहू महाराज यांची बहूजन समाजाला सुशिक्षित करण्याची इच्छा कर्मवीरांनी प्रत्यक्षात आणली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. संस्थेने वटवृक्ष हे बोधचिन्ह निवडले आणि खरोखरच या वृक्षाच्या सावलीत अनेकांना शिक्षणाची सावली देऊन समाधान मिळविले. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे घ्येय या संस्थेच्या बोध वाक्याप्रमाणे विद्यार्थ्यांना श्रम प्रतिष्ठेचे उपासक बनविले.
त्यांचे व्यक्तिमत्त्व जातीभेदाच्या पलीकडे होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वसतिगृहात विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत, ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरित्या स्वयंपाक करत आणि एकत्रच जेवण करत.
कोल्हापूरला असतांना कोल्हापूर संस्थानचे राजे राजर्षी शाहू दलितांना महाराज होते. भविष्यकाळाचा विचार करणारा राजा होता, त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा लावला. सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले. समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये एक सुधारक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 1932 मध्ये महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला.
या ऐक्याच्या स्मरणार्थ युनियन बोर्डींगची स्थापना भाऊरावांनी पुणे येथे केली. हे ऐक्य व्हावे या विषयीची तळमळ महर्षी शिंदे आणि भाऊराव पाटील यांना होती. पृथकतावादाने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत तर ते वाढतील असे त्यांचे मत होते. 1935 मध्ये महात्मा फुले अध्यापक विद्यालय त्यांनी सुरू केले. या मागे त्यांचा उद्देश शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचविणे त्यासाठी योग्य शिक्षक घडवणे हे होते.
पावसाळ्याचे दिवस होते, हवेत गारवा होता, सर्व मुले वर्गात बसलेली होती आणि एक मुलगा बाहेर कुडकुडत बसला होता. गुरुजींना विचारल्यानंतर तो इतर जातीचा असल्याने बाहेर बसवल्याचे कर्मवीरांना समजले. ते त्या मुलाला घरी घेऊन आले आणि जेऊ घातले नंतर कोल्हापूरला नेऊन मिस क्लार्क होस्टेल ला दाखल केले, तो पुढे तो विधीमंडळाचा सभासद झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या ङ्गमूकनायकफ वर्तमानपत्राचा तो काही काळ संपादक होता. पुढे कर्मवीरांच्या शैक्षणिक कामाला समतेची गोड फळे मिळाली.
दुधगावात दुधगाव शिक्षण मंडळ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला. भाऊराव हे समाजसुधारक व शिक्षण प्रसारक होते. महाराष्ट्रात 4 जिल्यात व कर्नाटक राज्यात मिळून 657 शाखा आहेत. त्यामध्ये 20 पूर्वप्राथमिक, 27 प्राथमिक, 438 माध्यमिक, 8 आश्रमशाळा, 8 अध्यापक विद्यालय, 2 आय.टी.आय. व 41 महाविद्यालयांचा समावेश आहे. अशा या शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टो. 1919 रोजी केली. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुलेंना गुरु मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे ते सक्रीय सदस्य देखील होते. प्रत्येक गावात शाळा बहुजन समाजातील शिक्षक व शिक्षक प्रशिक्षण या सुत्राचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अजोड कर्तृत्वाची पावती म्हणून विद्यापीठाने त्यांना डी.लिट ही सन्मानजनक पदवी बहाल केली. भारत सरकारने 1959 साली कर्मवीरांना पदमभूषण सर्वोच्च नागरी सन्मान देऊन विभूषित केले. महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते शिक्षणतज्ञ प्रेरणादायी शिक्षणयात्री म्हणुन ते ओळखले जाऊ लागले. तेव्हा जनतेने त्यांना कर्मवीर (कृतींचा राजा) ही उपाधी देऊन सन्मानित केले. भारत सरकारने 1988 मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिट प्रकाशित करुन भाऊराव पाटलांचा सन्मान केला. तव स्मरण आम्हा स्फू्र्तीदायी ठरो एवढेच मनोगत व्यक्त करुन त्यांचे कार्य पुढे चालू ठेवणे हीच कर्मवीरांना खरी श्रध्दांजली. त्यांच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन !


प्रविण बागडे, नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919

Leave a Comment

और पढ़ें