बॉम्बे मार्केटच्या विकासाला विरोध नाही; मात्र पारदर्शकता आवश्यक
बॉम्बे मार्केटच्या विकासाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत आधुनिक, प्रशस्त आणि सुरक्षित बाजारपेठ, अग्निसुरक्षा, पार्किंग, रुंद रस्ते आणि व्यापाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण व्हाव्यात, अशी भूमिका विरोधी नगरसेवकांनी मांडली. मात्र शहराच्या मालकीच्या महत्त्वपूर्ण सार्वजनिक मालमत्तेबाबत सर्व नगरसेवकांना विश्वासात न घेता आणि प्रकल्पाची संपूर्ण माहिती सार्वजनिक न करता घाईघाईने निर्णय घेणे मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकल्पाबाबत सध्याच्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढील प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली.
चिखली / प्रतिनिधी
बॉम्बे मार्केट प्रकल्पाचा अधिकृत खर्च किती, सध्याच्या मालमत्तेचे मूल्यांकन किती, विकासकाची निवड कोणत्या प्रक्रियेद्वारे होणार, BOT करार किती वर्षांचा असेल आणि या प्रकल्पातून नगरपरिषदेला नेमका किती आर्थिक लाभ मिळणार, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. विकासकाला कोणत्या अटींवर आर्थिक लाभ मिळणार, तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मालकी हक्क आणि नियंत्रण कोणाकडे राहणार, याची स्पष्ट माहिती जनतेसमोर मांडण्याची मागणी करण्यात आली.
पत्रकार परिषदेत नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. शहराच्या विकासाशी, आर्थिक व्यवहारांशी आणि सार्वजनिक मालमत्तेशी संबंधित २१ विषयांवर अवघ्या पाच मिनिटांत निर्णय कसा घेण्यात आला, असा सवाल करण्यात आला. तसेच सभेचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग, अधिकृत इतिवृत्त, उपस्थिती नोंद आणि प्रत्येक विषयावरील चर्चा व मतदानाची नोंद सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली.
चिखली नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील कामकाज आणि बॉम्बे मार्केटच्या प्रस्तावित BOT प्रकल्पावर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. अवघ्या पाच मिनिटांत अजेंड्यावरील २१ विषय मंजूर झाल्याचे घोषित करण्यात आले; मात्र विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना आपली बाजू मांडण्याची, हरकती नोंदविण्याची आणि विषयांवर चर्चा करण्याची संधी देण्यात आली नाही, असा आरोप करण्यात आला. या प्रकरणी १८ नोव्हेंबर रोजी सभेच्या दिवशीच जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केल्याची माहिती विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आज इंदिरा नागरी सभागृह, चिखली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ९२(१) व ९२(२) चा संदर्भ देत स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी आवश्यक शासनमान्यता आणि नगरपरिषदेच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान दोन-तृतीयांश बहुमताने ठराव मंजूर होण्याच्या कायदेशीर तरतुदींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. BOT तत्त्वावरील विकासासंदर्भात शासनाच्या लागू नियमांनुसार आवश्यक मान्यता आणि प्रक्रियेची पूर्तता झाली आहे का, याची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली.
दोन-तृतीयांश बहुमताची अट पूर्ण झाली नसल्यास बॉम्बे मार्केटचा ठराव मंजूर झाल्याचे घोषित करण्याचा आधार काय, असा सवाल विरोधी नगरसेवकांनी उपस्थित केला.
या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते डॉ. मोहम्मद इसरार, गटनेते गावंडे, शहराध्यक्ष गोपाल देव्हडे, डॉ. अमोल लहाने, जकाउल्ला खान, उबेद अली खान, रत्नदीप शिनगारे, संतोष देशमुख, पी. एस. वायाळ सर, गोकुळ शिंगणे, प्रशांत भटकर आणि आनंद बोंद्रे उपस्थित होते.






