सुलतानपूर : उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे पूर्वांचल द्रुतगती मार्गावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ताफ्यातील वाहनांची टक्कर झाल्याची घटना घडली. अतिवेगामुळे हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले असून, राहुल गांधी सुरक्षित असल्याची माहिती आहे.
राहुल गांधी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संबंधित मानहानीच्या खटल्याप्रकरणी सुलतानपूर येथील खासदार-आमदार न्यायालयात हजर राहण्यासाठी जात होते. 26 ऑक्टोबर रोजी ते चौथ्यांदा न्यायालयात हजर झाले. या प्रकरणात न्यायालयाकडून आज निकाल दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राहुल गांधी दिल्लीहून लखनौ येथे पोहोचले. विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद न साधता ते सुलतानपूरच्या दिशेने रवाना झाले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
भाजप नेते आणि जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. 8 मे 2018 रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंगळूरु येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
राहुल गांधी यांनी भाजपच्या अध्यक्षांवर हत्येचा आरोप असल्याचा उल्लेख करत, प्रामाणिकपणा आणि शुद्धतेबाबत बोलणाऱ्या पक्षावर टीका केली होती. हे विधान 2005 मधील सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणाच्या संदर्भात करण्यात आले होते.
या प्रकरणात अमित शाह यांची 2014 मध्ये निर्दोष मुक्तता झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्यावरील आरोपांची पुन्हा चौकशी करण्याची मागणी फेटाळून लावली होती.
न्यायालयीन प्रक्रियेत आतापर्यंत काय घडले?
राहुल गांधी यांच्या विधानानंतर दाखल झालेल्या तक्रारीवर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना 27 नोव्हेंबर 2023 रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्यानुसार राहुल गांधी न्यायालयात उपस्थित राहिले आणि त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
यानंतर विजय मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्या आवाजाचा नमुना तपासून त्याची पडताळणी करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली पुनरीक्षण याचिकाही सत्र न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालय आणि सत्र न्यायालयाच्या आदेशांना आव्हान देणारी याचिका फेटाळली.
राहुल गांधींच्या निर्दोष मुक्ततेचा वकिलांना विश्वास
या प्रकरणात राहुल गांधी यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील काशी प्रसाद शुक्ला यांनी न्यायालयातील सुनावणीबाबत प्रतिक्रिया दिली. खासदार-आमदार न्यायालयात हे प्रकरण निर्णयासाठी प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.
दीर्घ प्रतीक्षेनंतर निर्णयाची वेळ आली असून, राहुल गांधी यांना न्याय मिळेल आणि त्यांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता होईल, असा विश्वास शुक्ला यांनी व्यक्त केला.
आता या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देते, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.






