हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या
बुलढाणा / प्रतिनिधी
यंदाच्या पावसाळ्यात बुलढाणा जिल्ह्यातील ९२ पैकी ७१ मंडळे अतिवृष्टीग्रस्त झाली. म्हणजेच जिल्ह्याच्या ७७ टक्के महसूल मंडळात पाऊसाने कहर केला आहे. ५५ मंडळात एक ते तीन वेळा अतिवृष्टी, १२ मंडळ चार ते पाच वेळा, तर चार मंडळात तब्बल सहा वेळा ढगफुटी सदृश पाऊस कोसळला. एकंदरीत या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे, अतिवृष्टीची जिल्ह्यात सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी बुलढाणा मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्यात व जिल्ह्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे बळीराजा कोलमडून पडला आहे. सप्टेंबर महिन्यात तर बुलढाणा जिल्ह्यात पाऊसाने धुमाकूळ घातला आहे. तब्बल ३२२ गावे अतिवृष्टीग्रस्त घोषित झाली असून ६४ हजार ४७३ हेक्टर शेतावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांचे हे नुकसान कधीही भरून निघणारे नसून सरकारने तात्काळ कर्जमाफी करावी, तसेच अतिवृष्टीची जिल्ह्यात सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी बुलढाणा मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी केली आहे.
अमोल रिंढे पाटील यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अतिवृष्टी आणि हुमणी अळीच्या दुहेरी आल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, तूर ,मका कापूस, यासह फळबागा आणि भाजीपालावर्गीय पिके पावसाने उध्वस्त केली आहेत. शेतकर्यांचे श्रम गुंतवणूक आणि आशा पाण्यात गेल्या आहेत. हवामान खात्याने अजूनही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे परिस्थिती अधिकच चिंताजनक बनण्याची शक्यता आहे. तरी सरकारने शेतकर्यांची कर्जमाफी तात्काळ करावी. तसेच अतिवृष्टीची हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी अमोल रिंढे पाटील यांनी केली आहे.