गणेशोत्सवात करा निर्माल्य व्यवस्थापन अन् टाळा प्रदूषण
चिखली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी सजगतेने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन काँग्रेस पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष विजय शेजोळ यांनी केले आहे. विशेषतः गणपती विसर्जनावेळी निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करून निसर्गाचा सन्मान राखावा, असेही ते म्हणाले.
विजय शेजोळ यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. मात्र श्रद्धेच्या नावाखाली जलाशयांमध्ये निर्माल्य टाकल्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढते आणि जैवविविधतेला धोका निर्माण होतो. त्यामुळे भाविकांनी निर्माल्य वेगळ्या पात्रात गोळा करून स्थानिक प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या निर्माल्य कलशात किंवा खड्ड्यात टाकावे. तसेच, त्यांनी युवक मंडळांनाही आवाहन केले की, उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषण, प्लास्टिकचा वापर आणि पाण्याचा अपव्यय टाळावा. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आपलीच आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने सजगपणे वागायला हवे.
शेजोळ यांनी प्रशासनालाही विनंती केली की, त्यांनी शहर व ग्रामीण भागात पुरेशी निर्माल्य संकलन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि जनजागृतीसाठी स्थानिक पातळीवर मोहिमा राबवाव्यात. गणेशोत्सव काळात सामाजिक भान ठेवून, पर्यावरणाचे संरक्षण करत उत्सव साजरा करण्याचे विजय शेजोळ यांचे सकारात्मक आवाहन नागरिकांमध्ये चांगली जागरूकता निर्माण करणारे ठरत आहे.