Namdev Payri written by Ravindra Ingale Chavrekar enters the final round
परीषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केला निकाल जाहीर
बुलढाणा न्यूज
अ. भा. नाट्य परिषदेच्या एकांकिका स्पर्धेत अकोला केंद्रावर पार पडलेल्या प्राथमिक फेरीत येथील नामदेव पायरी एकांकिकेची अंतीम फेरीसाठी निवड झाली आहे. परीषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी हा निकाल जाहीर केला. येथील अक्षरदेह नाट्यकला संस्थेतर्फे नामदेव पायरी नाट्यसंघातील कलावंत व तंत्रज्ञांचा सत्कार करण्यात आला. बुलढाणा येथील वसंतलक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेने सादर केलेल्या रवींद्र इंगळे चावरेकर लिखित व विजय सोनोने दिग्दर्शित नामदेव पायरी या एकांकिकेचा समावेश आहे.
अकोला येथील आर एल टी सायन्स महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी अ.भा.नाट्य परिषदेच्या एकांकिका स्पर्धेत प्राथमिक फेरीत १९ नाट्यसंघांनी सहभाग घेतला होता. नियमानुसार दोन एकांकिकांची अंतीम फेरीसाठी निवड करण्यात आली. यामध्ये बुलढाणा येथील वसंतलक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेने सादर केलेल्या रवींद्र इंगळे चावरेकर लिखित व विजय सोनोने दिग्दर्शित नामदेव पायरी या एकांकिकेचा समावेश आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध सिने व नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी हा निकाल जाहीर केला.
नामदेव पायरीमध्ये प्रसिद्ध अभिनेते गणेश देशमुख व प्रसाद दामले यांची प्रमुख भूमिका होती. यंदा जिल्ह्यातून सहा एकांकिका स्पर्धेत उतरल्या होत्या. मात्र नामदेव पायरीने बाजी मारली. या विजेत्या संघातील सर्व सहभागी सदस्यांचा सत्कार समारंभ अक्षरदेह नाट्यकला व बहुउद्देशीय संस्थेतर्फे २६ ऑगस्ट रोजी समर्थ एज्युकेशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे अध्यक्ष शशिकांत इंगळे, सचिव संतोष पाटील, उपाध्यक्ष शैलेश वारे, सहसचिव विलास मानवतकर यांनी नाटकाचे दिग्दर्शक विजय सोनोने, कलावंत सिने व नाट्य अभिनेते गणेश देशमुख, प्रसाद दामले, नेपथ्यकार पराग काचकुरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी अभिनव क्रीएटीव्ह गृपतर्फे जयंत दलाल व अर्चना जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन विजेत्याा संघाचा सत्कार केला. माणुसकी मल्टीपर्पज फाऊंडेशनतर्फे आनंद संचेती यांनीही विजेत्या संघाचा सत्कार केला. यावेळी जयंत दलाल, आनंद संचेती, संतोष पाटील, अर्चना जाधव व विजय सोनोने यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत इंगळे यांनी केले तर विलास मानवतकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शहरातील नाट्यकर्मी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. दुर्गासिंग जाधव, नाट्यकर्मी गणेश राणे, सौ. रुचिरा पाटील, सौ. सुरेखा इंगळे, मृणाल सावळे, सृजन इंगळे यांनी परीश्रम घेतले.