बुलढाणा न्यूज
ग्रंथालय कायदा होऊन ५८ वर्षे झाली, पण ग्रंथालय कर्मचारी हा किमान वेतनापासून वंचित राहिला आहे. आज महाराष्ट्रात ११ हजार १५० ग्रंथालयांत २० हजार ३२१ कर्मचारी काम करीत आहेत. ग्रंथालयाचे अ, ब, क, ड असे चार वर्ग असून, ड वर्गात काम करणार्या ग्रंथपालास दरमहा २ हजार २२३ रुपये वेतन व जिल्हा अ वर्ग ग्रंथपालास १६ हजार ८०० रुपये वेतन मिळते. शासन नियमानुसार ड वर्गाचा ग्रंथपाल तीन तास काम करतो. जिल्हा अ वर्ग ग्रंथपाल सहा तास काम करतो. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर ग्रंथालय कर्मचार्यांना किमान वेतन मिळण्याकरिता मोर्चा काढणार आहेत.
ग्रंथालय कर्मचार्यांना किमान वेतन मिळावे, यासाठी विधान भवनावर मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय कै. शांताबाई मुद्धेबिहाळ सार्वजनिक वाचनालय, मंत्री चंडक नगर, सोलापूर येथे झालेल्या सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
प्रारंभी मल्लिनाथ पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी धनंजय पवार यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजी नगर विभागीय उपाध्यक्ष विद्यासागर हणमंते होते. बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष सदाशिव बेडगे, सूर्यकांत जाधव उपस्थित होते.
यावेळी राज्य शासनाचा उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार धनंजय पवार व उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार सूर्यकांत जाधव यांना मिळाल्याबद्दल सदाशिव बेडगे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यासागर हणमंते, लातूर जिल्हा सचिव संतोष करमले, बाहुबली वाचनालयाचे सचिव पी. सी. भांबरे, सिद्राम मुद्देबिहाळ, सिद्धाराम हालकुडे, नरसिंह मिसालोलू, अरिहंत रत्नपारखे आदी उपस्थित होते. नरसिंह मिसालोलू यांनी आभार मानले.