ट्रम्प दररोज फोन करतात, पण मोदीजी फोन घेत नाहीत!
भाजप नेते राज पुरोहित यांच्या दाव्यावर बुलढाण्यातून आरटीआय दाखल
बुलढाणा- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील तीन महिन्यांपासून दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करत आहेत. मात्र, मोदीजी त्यांचे फोन उचलत नाहीत, त्यामुळे ट्रम्प जवळजवळ वेडे झालेत, असा धक्कादायक विधान भाजप नेते राज पुरोहित यांनी २६ जुलै रोजी मुंबई दादर येथे एका कार्यक्रमात केले. या विधानाच्या पार्श्वभूमिवर बुलढाणा जिल्ह्यातून आटीआय दाखल करण्यात आला असून चौकशीची मागणी केली आहे.
भाजप नेते राज पुरोहित यांच्या विधानाने राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, या वक्तव्यामागे कोणतेही अधिकृत पुरावे आहेत का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सिंदखेड ग्रामपंचायतीचे सरपंच तथा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रविण कदम यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे थेट माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत चौकशीची मागणी केली आहे. त्यात २६ एप्रिल २०२५ ते २६ जुलै २०२५ या कालावधीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्षात किती वेळा फोन केला?, पंतप्रधान कार्यालयाने या कॉल्सबाबत कोणतीही नोंद ठेवली आहे का? असल्यास, त्याचे तपशील, दिनांक व कॉल्सची संख्या, मोदींनी हे फोन कॉल्स स्वीकारले होते का?, भाजप नेते राज पुरोहित यांनी केलेले वरील विधान अधिकृत नोंदीनुसार खरे आहे का?, असे प्रश्न उपस्थित करून जर काही माहिती देशाच्या सार्वभौमत्व व सुरक्षिततेसाठी संवेदनशील असेल तर ती आरटीआय कायद्यातील कलम ८(१)(अ) अंतर्गत गोपनीय ठेवली जाऊ शकते. मात्र, अन्य कोणतीही सार्वजनिक माहिती खुली केली जावी, अशी मागणी केली आहे. आगामी काळात पंतप्रधान कार्यालयाकडून या अर्जावर काय उत्तर दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.