२४ जुलै: राहेरी मार्गे दुसरबिड येथून बिबी येथे मुक्कामी, २५ जुलै: लोणार, २६ जुलै: मेहकर, २७ जुलै: जानेफळ, २८ जुलै: शिर्लानेमाने, २९ जुलै: आवार, ३० जुलै: खामगाव, ३१ जुलै: पालखी शेगाव येथे पोहोचणार आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत सिंदखेडराजा शहर उद्या भक्तिरसाने न्हाऊन निघणार असून, आयोजकांनी भाविकांना दर्शन व सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
सिंदखेडराजा : शेगाव येथून पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी मार्गस्थ झालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्या, बुधवार दि. २३ जुलै रोजी दुपारी सिंदखेडराजा शहरात आगमन होणार आहे. गण गण गणात बोते च्या गजरात, भगव्या पताका, मंगल वाद्य, भजनी मंडळे आणि हजारो वारकर्यांसह येणार्या या पालखी सोहळ्याचे शहरात जोरदार स्वागताची तयारी करण्यात आली आहे.
श्री गजानन संस्थान, शेगाव यांच्या वतीने आयोजित या दिंडी सोहळ्यात तब्बल ७०० वारकरी सहभागी आहेत. ५६ व्या वर्षी आयोजित या पालखी सोहळ्याने ३३ दिवसांत ७५० किमीचा प्रवास करून ४ जुलै रोजी पंढरपूर येथे विठ्ठल-रुख्माईचे दर्शन घेतले. परतीच्या प्रवासाला १० जुलै रोजी निघालेली श्रींची पालखी आता विदर्भाच्या सीमेवर दाखल होत आहे. संपूर्ण प्रवासा दरम्यान वारकरी ६० दिवसांत सुमारे १३०० किमीचा पायी प्रवास पूर्ण करणार आहेत.
स्वागता साठी सिंदखेडराजा नगर परिषदेसह महसूल व पोलिस प्रशासनाने पालखी स्वागताची सर्व तयारी पूर्ण केली आहे.उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, नायब तहसीलदार डॉ. प्रविणकुमार वराडे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम, ठाणेदार इंगळे, दुय्यम ठाणेदार बालाजी सानप, गोपनीय विभागाचे अंमलदार श्रावण डोगरे आणि स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत श्रींच्या पालखीचे भव्य स्वागत विदर्भाच्या प्रवेशद्वारावर होणार आहे. वारकर्यांसाठी बुधवारी रात्री रामेश्वर संस्थानकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, दिंडीचा मुक्काम शहरातील जिजामाता विद्यालयात राहणार आहे. गुरुवार, २४ जुलै रोजी सकाळी पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.
आरोग्य विभागाने दिंडीसोबत तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली असून, वारकर्यांसाठी आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे. पोलिस प्रशासनाने मार्गावर सुरक्षेचा विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. पालखी ज्या-ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करेल, त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांचा विशेष ताफा दिंडीसोबत राहणार आहे.