सिंदखेडराजा
शेतकर्यांच्या गंभीर समस्यांकडे सरकार व कृषिमंत्र्यांचे दुर्लक्ष होत असताना, त्यावर आवाज उठवणार्या छावा संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्ष व शेतकरी नेते मा. विजय भैया घाडगे पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
या प्रकरणी हल्लेखोर सूरज चौहान (राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष व पार्टी प्रवक्ता) व त्याच्या साथीदारांवर भादंवि कलम ३०७ अंतर्गत गुन्हा नोंदवून तात्काळ अटक करावी, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने प्रांजळ पवार नायब तहसीलदार सिंदखेडराजा यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे केली आहे.
दि. २० जुलै रोजी लातूर येथे छावा संघटनेच्या पदाधिकार्यांनी शेतकर्यांच्या आत्महत्या, पिकविमा न मिळणे, आणि कृषिमंत्र्यांच्या उदासीनतेच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन दिले. या लोकशाही मार्गाच्या आंदोलनावेळी सूरज चौहान व त्याच्या साथीदारांनी अचानक छावा पदाधिकार्यांना बेदम मारहाण करून घाडगे पाटील यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या घटनेचा निषेध करत छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. अशोकराजे जाधव यांनी सांगितले,”शेतकर्यांसाठी आवाज उठवणार्यांना मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, ही लोकशाहीला काळिमा फासणारी आणि राज्यात हुकूमशाही निर्माण करण्याचा प्रकार आहे. दोषींवर तात्काळ ३०७ अंतर्गत गुन्हा नोंदवून कठोर कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
संघटनेने निवेदनाची प्रत सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास, छावा संघटना राज्यभर मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा दिला आहे.या निवेदनावर बालासाहेब शेळके, कृष्णा कोल्हे, शिवाजी गव्हाड, लक्ष्मण कव्हळे,शिवादादा पुरंदरे,अतिष राजे जाधव, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यांच्या स्वाक्षरी आहे.