Clerk and Talathi caught by Anti-Corruption Department while accepting bribe in Sindkhedraja Tehsil Office
आर्थिक देवाणघेवाणीवरून आईच्या नावे सातबारा उतारावर लावण्याचे प्रकरण प्रलंबित होते
बुलढाणा न्यूज टिम
किनगांव राजा
सिंदखेड राजा तहसील कार्यालयामध्ये लिपिक व तलाठी यांना ७ हजाराची लाच घेताना बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवार, दि.२४ जुन रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान रंगेहात पकडले आहे.
तालुक्यातील खामगाव, खापरखुटी येथील सज्जा तलाठी रावसाहेब काकडे यांचेकडे जमिनीचे आपसात वाटणी करून आईच्या नावे सातबारा उतारावर लावण्याचे प्रकरण प्रलंबित होते.अनेक दिवसांपासून तक्रारदार तथा जमीन मालक,तलाठी काकडे व तहसील कार्यालयातील वर्ग एक लिपिक मनोज झिने यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीवरून विषय प्रलंबित राहिला होता.जमिनी संदर्भात सर्व आवश्यक दस्त असतानाही केवळ आर्थिक लाभासाठी सदर प्रकरण निकाली निघत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
लिपिक आणि तलाठ्याने मिळून ७ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्याकडे तक्रारदाराने केली होती. तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपक प्रतिबंधक विभागांच्या पथकाने सापळा रचला तहसील कार्यालयाच्या मागे ठरलेल्या ७ हजार रुपयांची देवाण घेवाण सुरू असतानाच उपस्थित लाचलुचपत प्रतिबंधक विभागांच्या अधिकार्यांनी लिपीक मनोज झिने व तलाठी काकडे या दोघांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी,पंचनामा पूर्ण करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस उपाधीक्षक भागोजी चोरमले, पोलिस निरीक्षक रमेश पवार,एएसआय शाम भांगे, राजेंद्र क्षीरसागर, प्रवीण बैरागी,जगदीश पवार,विनोद लोखंडे, शैलेश सोनवणे, रणजीत व्यवहारे,नितीन शेटे, शेख अरशद यांनी केली आहे.