व-हाडी भाषा आजच्या प्रमाण मराठी भाषेची जननी

बुलढाणा न्यूज

व-हाडी भाषा आजच्या प्रमाण मराठी भाषेची जननी

Varhadi language is the mother of today’s standard Marathi language

महाराष्ट्राच्या एका मोठ्या भूभागात प्रचलित असलेल्या वऱ्हाडी या प्रादेशिक भाषेचे स्वरुप विशद करतांना, वऱ्हाडीचा इतिहास, वाटचाल, विकास व प्रभाव याची चर्चा करतांना अगदी १३ व्या शतकापासून वऱ्हाडीतील प्रारंभीच्या महानुभाव साहित्याच्या लेखक, कवींच्या वाड्:मयातून दिसणाऱ्या वऱ्हाडी बोलीभाषा, संकल्पना व तीच्या निर्मितीची कारणे आणि वैशिष्ट्यांबाबत चर्चा करुन प्रमाण मराठी भाषा व वऱ्हाडी बोली यांच्या परस्पर संबंधाची विस्ताराने चर्चा करता येईल. मराठी साहित्यात वऱ्हाडी भाषेचे योगदान या संबंधाने वऱ्हाडी बोलीचा इतिहास, स्वरुप, लक्षणे विस्ताराने कथन करुन वऱ्हाडी भाषेसंबंधी मांडणी करण्याचा प्रयास करणार आहे.
पारंपारीक मराठी साहित्य प्रांतात प्रारंभीच्या काळात संस्कृतचा नंतर प्रमाण भाषेच्या नावाखाली प्रादेशिक मराठी बोलीभाषेला काही काळ अवहेलना तर अनेकदा मस्करीला सामोरे जावे लागले आहे. म्हणून महाराष्ट्र प्रांतात सत्यशोधक जोतीराव फुले व नंतरच्या काळा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परीश्रमाने शोषीत, पिडीत, आदिवासी, भटक्या विमुक्त समाजात स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्योत्तर कालखंडात शिक्षणाचा प्रचार व प्रसार काही प्रमाणात झाला. यातून ग्रामिण भागातील नवशिक्षीत पीढ़ी लेखन करू लागली. ही पिढी आपल्या अवतीभवतीचे जीवनानुभव कथा, कादंबरी, कविता इ. माध्यमातून प्रकट होवू लागली. त्यांच्या लेखनात जे पाहिले, अनुभवले, सोसले, भोगले याच्या नोंदी वाड्:मयात चितारु लागले. त्या त्या परिसराचे प्रादेशिक वैशिष्ट्य जीवनाचे दर्शन प्रादेशिक वाड्:मयातून घडू लागले. त्याप्रमाणे त्या त्या प्रादेशिक बोलीभाषेचे प्रादेशिक साहित्य पुढे येऊ लागले. साधारतः १९६० च्या कालखंडात दलित व ग्रामिण साहित्याचे प्रवाह मराठी साहित्य प्रवाहात जोर धरु लागले. वास्तविकता ही गणना अकादमीक पातळीवर करण्यात येत असून यापूर्वीसुध्दा किमान १०० वर्षापासून दलित व ग्रामिण साहित्य आपआपल्या परिने साहित्य प्रवाहात कार्यरत होते. काल गणनेनुसार १९६० नंतरच्या कालखंडात विशेषत्वाने हे घडू लागले आणि ग्रामिण भागातील सामाजिक व पारंपारीक वैशिष्ट्यपूर्ण व विशिष्ट लक्ष वेधून घेणाऱ्या व्यक्तीरेखा प्रादेशिक बोलीभाषेतून मराठी साहित्यात सजीव होऊ लागल्या. वऱ्हाडी भाषेतील साहित्यातून तो परीसर, तिथली माणसं कथा, कादंबऱ्या नाट्यसंहिताचे नायक होऊ लागले. हे घडत असतांना प्रादेशिक बोली साहित्यात हे येणे अपरिहार्यही होते. ही माणसं, पात्रं त्यांच्या विशिष्ट लयीत, लकबीसह बोलू लागले. प्रादेशिक आणि ग्रामिण कथात्मक वाड्यातील संवादाच्या स्वरुपात त्या बोलीत लेखन होऊ लागले. त्यामुळे वाड्:मयाचा जीवंतपणा आणि प्रत्ययकारीता वाढण्यास मदत झाली. नंतरच्या काळात तर ग्रामिण भाषेत परीसराच्या बोली भाषेतूनच लेखन होऊ लागले. यातून वऱ्हाडी भाषेत लिहीलेल्या कथा कादंबऱ्या, कविता, ओव्या, लोकगितं प्रकाशीत होऊ लागले. साहित्य सम्मेलनात बोली भाषेतून कथा-कथन, परिसंवाद घडू लागले. प्रादेशिक साहित्य संमेलनातून बोली भाषेतील अविष्कारांना चालना मिळू लागली. इतकेच नव्हे तर, बोली भाषेची स्वतंत्र साहित्य संमेलन होऊ लागली. त्या निमित्ताने व्यक्तीच्या अस्मितेबरोबर प्रादेशिक बोलीच्या अस्मिताही प्रकट होऊ लागल्या लेखनाच्या आधारे प्रादेशिक बोलीचा अभ्यास होऊ लागला. वऱ्हाडी बोली भाषाही याला अपवाद करता येणार नाही.
समाजात बोलल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष जीवंत व प्रभावी बोलीच्या उच्चरांचा आणि रुपांचा अभ्यास करुन वऱ्हाडी बोली भाषेची स्वरुप लक्षणे पाहता येईल. भारत देशात विविध प्रांतात प्रचलित असलेल्या भाषेचे सव्र्व्हेक्षण सर्व प्रथम ग्रियर्सन यांनी केले. त्याद्वारे मराठी बोली भाषेसंबंधीचा तपशील १९०५ साली प्रसिध्द झालेल्या लिंगविस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया च्या ७ व्या भागात आहे. बोलीच्या संबंधी विचार करतांना सामान्यपणे प्रदेश बाचक व जाती वाचक संज्ञाचा उपयोग केला जातो. या या प्रदेशाची बोली, त्या-त्या जातीची बोली म्हणजे प्रदेशवाचक व जातीवाचक संज्ञा. बोलीचा अभ्यास करतांना प्रारंभी महाराष्ट्राच्या पातळीवर कोंकणी, मानदेशी, खान्देशी, अहिराणी, जमखंडी, वऱ्हाडी, गंगथडी, अशा प्रदेश विशिष्ट संज्ञा वापरल्या गेल्या आहे. भाषीक वर्णन, तेथील भाषेचे व्याकरण, बोलीचा क्षेत्र विस्तार, भाषेचे काही स्वरुप लक्षणे आदीबाबतही स्वतंत्र चर्चा करता येईल. एकाच भाषीक प्रदेशात स्थळपरत्वे वेगवेगळ्या बोली असतात. उदा. एकच एक वऱ्हाडी भाषा विदर्भातील सगळ्या जिल्ह्यात आणि या जिल्ह्यातील जाती-जमातीत प्रचलित असल्याचे दिसून येत नाही. त्यामध्ये सुध्दा झाडीपट्टीची बोली वेगळी, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील तेलगू भाषेच्या प्रभावाखालील बोली वेगळी. भंडारा-गोंदीया जिल्ह्यातील हिंदी प्रदेशा लगतची बोली वेगळी. तर नागपूरी बोली वेगळी. पश्चिम विदर्भातील बोली आणि पूर्व विदर्भातील डोंगराळ पट्टयातील बोलीभाषा वेगळी म्हणजे एकट्या विदर्भातच बल्हाडी बोली भाषेची निरनिराळी रूपे असल्याचे दिसून येते. असे असले तरी, भारतातील व्यक्तींना अनेक ओळखी परंपरेने चालत आलेल्या आहेत. येथील व्यक्ती कोणत्या तरी जातीची, वंशाची, प्रदेशाची, प्रांताची असते. असे असले तरी या सगळ्या ओळखीत एकात्मता असते. वऱ्हाडी बोलणारी व्यक्ती जरी असली तरी आधी ती या देशाची आणि नंतर महाराष्ट्राची, त्यानंतर बऱ्हाड ची असते. निरनिराळ्या बोली बोलणाऱ्या बोली भाषेमुळे समृध्दीच प्राप्त होईल. मात्र बोलीच्या अस्मितेच्या संदर्भात अभिनिवेश वाढता कामा नये. आणि जर का, भाषेचा अभिनिवेश वाढला तर मात्र प्रश्न निर्माण होतील हे होऊ नये म्हणून भाषा भगीणीभाव वाढीसाठी समाजाने व सुज्ञजनांनी सतत जानभान ठेवावी.
आपल्या देशातील महाराष्ट्राच्या काही प्रमुख भौगोलिक प्रदेशांमध्ये बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या रुपांच्या आधारे त्या-त्या प्रदेशाची ओळख भाषीकदृष्ट्या ठरविल्या गेली. अशीच ओळख विदर्भात बोलल्या जाणाऱ्या वऱ्हाडी भाषेच्या बोलीवरून काही जिल्ह्याची व त्याला लागून असलेल्या भूप्रदेशाची बन्हाड अशी होते. तसे पाहिले तर पूर्वीच्या मध्य वन्हाड प्रांत (सी.पी. अॅण्ड बेरार) चे वर्धा नदीमुळे दोन भागात विभागणी होत होती. ११ जिल्ह्याचा मिळून असलेला विदर्भ यातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम अशा ५ जिल्ह्यात व-हाडी भाषा बोलली जाते. म्हणून आज या भागाची ओळख विदर्भातील पश्चिम वऱ्हाड अशी आहे..
वऱ्हाडी भाषेचा संक्षिप्त इतिहास :
इतिहासकार या. मा. काळे यांच्यामते, ‘हा विदर्भ प्रदेश उत्तरेस नर्मदेपासून तो दक्षिणेस कुंतल पर्यंत होता. पश्चिम मर्यादा अजिठापर्यंत होती. पुढे वऱ्हाडचे दोन भाग झाले. उत्तरेस अमरावती, दक्षिणेस प्रतिष्ठान (पैठण) त्यानंतर त्यांचे केंद्र देवगीरी बनले. पूर्वी ते मध्यवर्ती राजधानीचे शहर होते व त्याची सीमा उत्तरेस सातपुड्यापर्यंत होती. सांप्रतच्या वन्हाडात मोडणाऱ्या प्रदेशाची सरहद वर्धा आहे. पश्चिमेस खान्देश व निजामाच्या राज्यांपैकी अजिंठा, भोकरदन वेगेरे भाग. दक्षिणेस निजामाचे राज्य पैकी बराचशा पैनगंगा नदीची सरहद व उत्तरेस नेमाड मध्य प्रांताचा जिल्हा व सातपुड्याचा डोंगर हा बर्तमान विस्तार असा कमी-कमी होत आलेला आहे. मोगल व मराठा कारकिर्दीत हल्ली पेक्षा पुष्कळ जास्त विस्तार होता.” विदर्भ हे बऱ्हाडचेच पर्यायी नाव आहे. त्याचा प्राचिन उल्लेख ऐतरेय ब्राम्हणात येतो. ‘विदर्भानंदी जेथे वाहते त्या भागाला बरदातट नामक महाराष्ट्र म्हणतात. वरदातट या शब्दातूनच वराड हा शब्द उत्पन्न झाला. असे डॉ. सुरेश डोळके अर्थ काढून त्याच्या पृष्ठीसाठी वररुचीच्या कागयजनपयन प्रायो लोप: व टोड या सुत्राचा हवाला देतात.’
महाभारत, रामायण, उपनिषद, ब्राम्हण ग्रंथ, मार्कडेय पुराण, रघुवंश, दशकुमार, चरित्र, बृहतसंहिता इ. प्राचिन ग्रंथातून विदर्भ प्रदेशाबाबतचे वेगवेगळे उल्लेख आलेले आहेत. त्यात विदर्भ, वेणावर दक्षिणायन, केशिक, कृतकशिक, भोज, भोजकट, वरदातट, महाराष्ट्र, दंडकारण्य, वन्हाड अशा विविध नावांनी या प्रांताला त्या-त्या काळात ओळखले गेले. ब्रिटीशांनी इंग्रज काळात बेरार हे एक आणखी नाव ठेवले.

     वऱ्हाडी भाषा ही समृध्द व लवचिक लोकभाषा आहे. भाषा सटिक, रंगिन, वेगवेगळ्या अर्थछटा व्यक्तवणारी पारिभाषोक जोरकस व रोचक असेल तर ती संपन्न भाषा असते. वऱ्हाडीला हे सर्वच गुण लागू पडतात. भौगोलिक परिस्थितीचा मनुष्याच्या सवयीवर शरीरावर व सामाजिक जीवनावर निश्चित परिणाम घडतो. केवळ बोलण्याच्या लकबीवरूनही माणूस कोणत्या प्रदेशातील आहे हे विचारात घेता येते. त्या त्या प्रदेशातील व्यक्तीच्या बोलण्यात काहीतरी वैशिष्टे असतात. पूर्णापट्टीची वऱ्हाडी पूर्णा नदी वन्हाडच्या उत्तरेस व उत्तरेकडून वाहणारी पूर्णा नदी वन्हाड़ी लोकांचे दैवत आहे. पूर्णला पयोष्णी असेही म्हणतात. पूर्णेच्या काठी वऱ्हाडी भाषा आहे. कारण खेड्यातील लोकच भाषा समृध्द करीत असतात. ‘भाषा समृध्दीचा हा व्यवहार खेड्यापाड्यातील जनता विना सायास सांभाळतात तेवढा तो शिक्षीत वर्गातील लोक करीत नाहीत. आधुनिक भाषा शास्त्रदेखील अशिक्षीत जनता ही नव्या भाषेचे जनक असल्याचे सांगते. पूर्णापट्टीची भाषा निखळ वऱ्हाडी आहे.

सिमावर्ती वऱ्हाडी भाषा :
पश्चिम वऱ्हाड प्रांताच्या दक्षिणेला काहीसा आंध्रप्रदेश व मराठवाड्याचा भाग येतो. त्यामुळे त्या भागातील वऱ्हाडीवर काहीसा द्रविडी भाषेचा प्रभाव जाणवतो. वन्हाडच्या या भागात कोमटी, वडार, तेलगू जातीही बऱ्याच आहेत. त्यामुळे या भागात तेलगू व वऱ्हाडी भाषा यवतमाळ जिल्ह्यातील दक्षिणेकडील भागात बोलल्या जाते. मराठवाडा लगतच्या वऱ्हाडी बोलीवर त्या बोलीचा थोडाफार परिणाम जाणवतो. प्रदेशाची सिमारेषा नकाशात तंतोतंत जरी काढता येत असली तरी, बोली भाषेची अशी सिमारेषा काढता येत नाही. बोली भाषा ही आदान प्रदानाचे मुख्य माध्यम आहे. त्यामुळे मराठवाड्या लगतच्या वऱ्हाडी बोलीत काही प्रमाणात फरक दिसतोच. ‘मेहकर क्षेत्रातील लोकगितांमधील वऱ्हाडी बोलीचे प्रमाण मराठीशी अधिक जवळचे नाते असल्याचे प्रत्ययाला येते. शब्दातील विशिष्ट वर्णावर आघात होऊन बोलण्याची त्यांची लकब वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे कारण भौगोलिकदृष्ट्या हा भाग उंच असल्याने संभवते.” असे डॉ. इंदुमती लहाने यांचे मत आहे. बुलडाणा व अमरावती ह्या जिल्ह्यांना उत्तरेस लागून मध्यप्रदेश आहे. त्यामुळे तिकडील हिंदीचा प्रभाव या भागातील बोली भाषेवर दिसून येतो. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर व मोताळा तालुक्याला लागूनच खान्देशची सिमा आहे. त्यामुळे त्या भागात वऱ्हाडी खान्देशी अशी परस्परांशी संपर्काने आलेली भाषा बोलली जाते. खान्देशच्या विदर्भालगतच्या भागात बोलली जाणारी बोली भाषा वऱ्हाडीच.

महानुभाव पंथ यांचे आद्य वाङ् मय लिळाचरित्र, गोविंदप्रभू चरित्र, दृष्टांतपाठ, महदंबेचे धवळे वैगेरे साहित्य मराठीच्या प्रारंभ काळात निर्माण झाले. मराठीच्या आद्य काळात वऱ्हाड हेच ग्रंथ निर्मितीचे केंद्र होते. अर्थात विदर्भातील मराठीला त्यावेळी केंद्रवर्तीत्व प्राप्त झाले होते. पुढे निरनिराळ्या कारणांनी विशेषतः राजकिय परिस्थितीनुसार हे केंद्र बदलत गेले त्यामुळे लोकराजा शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या काळात संस्कृत भाषेला उत्तेजन देऊन मराठीच्या पुरस्काराचे धोरण अवलंबिले. ब्रिटीशपूर्व काळात अखेरचे मराठी राज्य पुण्याच्या पेशव्यांचे म्हणून पुणेरी मराठी भाषेचा वरचष्मा वाढला. इंग्रज काळातही मराठीतले बहुतेक लेखन पुणेरीच असल्यामुळे पुण्याच्या मराठीला साहित्यात बाब मिळाला. पुढे ग्रंथप्रामाण्याबरोबर व्याकरण मान्यताही पुण्याच्या मराठीलाच मिळाली.

         वऱ्हाडी भाषा ही अंशतः प्राचीन व आद्य मराठी तर दुसरीकडून आधुनिक मराठी असून व व्याकरण मान्यतेपासून दूर असलेली अशी महाराष्ट्रातील प्रमुख बोली भाषा आहे. प्रारंभीच्या काळात तिच ग्रंथमान्य होती. साहित्य संस्कृतिचे केंद्र विदर्भातून सरकत सरकत जेव्हा पुण्याला स्थिरावले, ते पुण्याच्या मराठी ग्रंथ मान्यता व व्याकरण मान्यता मिळाली आणि वऱ्हाडी मराठी या दृष्टीने मागे राहिली.

         आजच्या काळात प्रमाण मराठी ही माय आणि इतर सर्व बोली ह्या तीच्या लेकी मानल्या जातात. परंतू भूतकाळातील पाऊल खुणांचा वेध घेतला असता चित्र वेगळेच दिसू लागते. मराठीत जेव्हढे म्हणून आद्य ग्रंथ व साहित्य आहे त्यातून आलेली भाषा पाहिली तर ती वऱ्हाडी बोलीच आहे. त्यामुळेच आज मराठी भाषेतील साहित्याचा महासागर कितीही अफाट, अनंत, व्यापक दिसत असला तरी, त्याची जन्मभूमी ही वऱ्हाडी मातीच हे विसरता येत नाही. महाराष्ट्राची राजधानी जशी बदलत गेली कौण्डिण्यपूर, भुवर्धन (भोकरदन), प्रतिष्ठान (पैठण), देवगीरी, पुणे तस तसे राजभाषेचे स्वरुपही बदलत गेले. ज्या प्रदेशात ही राजधानी गेली तेथील भाषाच राजभाषा म्हणून राजदरबारी भाषा म्हणून पुढे आली. “

वऱ्हाडी आणि महानुभव साहित्य :
लोकभाषेचा स्वीकार हा महानुभाव साहित्य ग्रंथ लेखनाचे एक विशेष लक्षण म्हटले जाते. लीळाचरित्र, गोविंदप्रभु चरित्र, स्मृतीस्थळ, दृष्टांतपाठ, सुत्रपाठ या गद्य ग्रंथातून वास्तवातील बोलीभाषेद्वारे तत्वविचार स्पष्ट केला. त्यात सहजता, स्वाभाविकता आणि उत्स्फुर्तता दिसून येते. या साहित्यकृतींच्या प्रकृत्तीशी धवळ्यांची प्रकृती सुसंवादी आहे. लोकभाषा, लोक वाङ् मय बोली भाषेची लावण्ये, लोक जीवनाची वळणे व लोकछेद घेऊन उत्स्फुर्तपणे प्रकटलेल्या धवळ्यांची रुपसिध्दी झाली आहे. या समग्र लेखन साहित्याचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीच्या गद्य ग्रंथ वऱ्हाडी बोलीतच आलेली आहे. “

देवगीरीचे राजे रामदेवराय यादव यांचा काळ महानुभाव साहित्य निर्मितीचा समकाळ समजण्यात येतो (इ.स. ९७५ ते १९९०) हा काळ मराठी गद्य निर्मितीचा सुवर्णकाळ मानण्यात येतो. चक्रधर स्वामींच्या काळातही यादवांचीच राजसत्ता महाराष्ट्रात होती. यादव राजाच्या दरबारात हेमाद्री पंडीत आग्रहाने वैदिक संस्कृतीचे व संस्कृत भाषेचा आग्रही होता. यादव राजे वैदिक संस्कृती, कला व विद्येचा पुरस्कार करीत असले तरी, चक्रधर स्वामींनी आपल्या महानुभव तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी तत्कालीन लोकभाषेचाच पुरस्कार केल्याचा आपणास दिसतो. म्हाइंभटांनी लीळाचरित्र हा ग्रंथ इ.स. १२७८ मध्ये सामान्यांच्या मराठी भाषेत लिहिला या ग्रंथाकडे लोकभाषेचा आदर्श नमूना म्हणून बघण्यात येते. भाषेचे वैभव गद्यातील तथ्य वास्तव आणि बोली भाषेतील माणसाच्या उक्तीतील सळसळता जीवंतपणा त्यामुळे मराठी भाषेचे आणि साहित्याचेही एक अहेवाचं लेणं म्हणून लीळाचरित्राचे स्थान अनन्य साधारण ठरते.” अशारितीने डॉ. उषा म. देशमुख यांनी लीळाचरित्रातील भाषेवर प्रकाश टाकतांना लीळाचरित्राचे लोकवाङ्मयातील अढळ स्थान स्पष्ट केले आहे. वऱ्हाडी भाषा आणि महानुभावीय ग्रंथाचे परस्परांशी जवळचे नाते आहे. लीळाचरित्रानंतर आलेल्या या सर्वच ग्रंथातून ते प्रामुख्याने जाणवत राहते. दृष्टांत हा केसोबासांनी सिद्ध केलेला ग्रंथ लीळाचरित्रातील महत्त्वाच्या ११४ दृष्टांत कथांचे खरे पाहता तर संपादन आहे. वऱ्हाडी मराठी उद्गम आणि विकास या ग्रंथात डॉ. शोभा नाफडे यांनी ‘दृष्टांत पाठाची भाषा ही लोकभाषा असल्यामुळे आणि विविध व्यवसायीकांचा समाजातील सर्वस्तरातील लोकांचा आढळ त्यात असल्यामुळे दृष्टांत पाठात तत्कालीन बोली भाषेतील अनेक उच्चार तथा वाक्यप्रचार आलेले आहेत. त्यावरुन आपल्याला वऱ्हाडीचे अंतरंग कळते.” वरील विवेचनावरुन तत्कालीन समाजाच्या भाषा व्यवहारात वऱ्हाडीचे स्थान किती महत्वाचे होते हे दिसून येते. नंतर पुढे म्हाइंभटांनी इ.स. १२८८ मध्ये ऋदिपूर लीळा लिहले हा ग्रंथ म्हणजे चक्रधर स्वामीचे गुरु गोविंदप्रभूचे चरित्र होय. वऱ्हाडी बोली व लोक जीवनाचा अस्सल नमूना म्हणून गोविंदप्रभू चरित्र या ग्रंथाकडे पाहण्यात येते. डॉ. वि. भि. कोलते ऋध्दिपूर लीळा या ग्रंथाबाबत म्हणतात, ‘प्राचीन मराठी गद्याचा नमूना म्हणून तर भाषा अभ्यासकांना हा ग्रंथ नव्हाळीचा वाटेल. तत्कालीन वऱ्हाडी भाषेचे स्वरुप समजण्यासाठी या ग्रंथासारखे दुसरे महत्वाचे साधन नाही. ११ म्हणून डॉ. वि. भि. कोलते यांचा अभिप्राय विचारात घेतला तर, गोविंदप्रभू चरित्र वऱ्हाडी भाषेतील महत्वाचा ग्रंथ ठरतो.
गोविंदप्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. त्यांचे वास्तव्य बहुतांश है बन्हाडातच होते. त्यांच्या सहवासात नागदेवाचार्याची चुलत बहिण महदंबा ऊर्फ महदाइसा आल्याचे दिसून येते. महदंबेने गोविंदप्रभूच्या आज्ञेनेच धवळे गायनासाठी सिध्द असल्यामुळे १३ व्या शतकात जन्मलेले मराठी काव्य कथा म्हणून महत्वपूर्ण स्थान मराठी साहित्यात आहे. या धवळ्यांचा वऱ्हाडी भाषेशी संबंध जोडता येतो. सुत्रपाठ हा आणखी एक ग्रंथ लीळा चरित्रावर आधारीत आहे. चक्रधराच्या तोंडी आलेल्या १२५५ सुत्राचे क्रमवार केसोबासांनी इ.स. १२९० दरम्यान केलेले खरं तर हे संपादन आहे. या संपादीत ग्रंथातूनही वऱ्हाडी लोक भाषेचा परिचय ठळकपणे होतो. सन १३१३ च्या सुमारास परशुराम लिखीत स्मृतिस्थळ हा ग्रंथही चरित्र ग्रंथापैकी महत्वाचा ग्रंथ असून या ग्रंथात यादवकालीन वऱ्हाडी भाषेचे वैशिष्टपूर्ण स्वरुप कळते. यावरुन असे लक्षात येते की, चक्रधर स्वामी स्थापीत महानुभव पंथाचे साहित्य निर्मितीचा अवकाश आणि त्या साहित्यातून आलेली वऱ्हाडी भाषा याचा विचार करता मराठी भाषेची जन्मभूमी हा बन्हाड प्रांत म्हणजेच वऱ्हाडी भाषा ठरते.

 स्वातंत्रपूर्व काळातील वऱ्हाडी साहित्य :
स्वातंत्रपूर्व काळातील वऱ्हाडी वाङ्मयाचा धांडोळा घेतला असता यवतमाळ येथील पां. श्री. गोरे यांनी १९३२ मध्ये वऱ्हाडी जानपद गिते लिहून बोबडे बोल आणि सुगी या शिर्षकाचे संपादन केल्याचे दिसून येते. ‘जानपद गिते लिहीण्याचे पेव ज्या काळात फुटले. त्या काळात पा. श्री. गोरेंनी वन्हाडच्या मातीचा सुगंध असणारी जानपद गिते लिहीली. असे डॉ. अक्षयकुमार काळे यांनी म्हटले आहे. याच काळात वामनराव चोरघडे यांची अम्मा ही कथा प्रसिध्द झाली होती. वामनराव चोरघड्यांचे जवळपास १९ कथासंग्रह प्रसिद्ध असून, चोरघडे यांनी त्यांच्या कथा लेखनाला वऱ्हाडी भाषेची जोड दिली. प्रा. डॉ. व्ही. बी. कोलते यांचा लव्हाळी नामक कविता संग्रह १९३३ साली प्रसिध्द इ आला. या कथा संग्रहाची भाषा वऱ्हाडी असल्याने ‘आधुनिक वऱ्हाडी कवितेचे जनक असे डॉ. व्ही. बी. कोलत्यांना म्हटल्यास अतिशोयोक्ती ठरणार नाही, असे यवतमाळ स्थित डॉ. रमाकांत कोलते यांनी मत मांडले आहे. तसेच वन्हाडच्या मातीचा सुगंध माणिक बंडु इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबांनी चौफेर पसरविला. राष्ट्रसंतांच्या नावे विपुल साहित्य उपलब्ध असून ग्रामगिता हा त्यांचा महत्वाचा ग्रंथ आहे. ते म्हणतात की, तुम्हें गावंच न्हाय का तिर्थ रं, दादा कशाला पंढरी करतं ? तसेच मनी न्हाई भाव म्हणे देवा मला मला पाव, देव बाजारचा भाजी पाला न्हाय रं, देव अश्यानं पावायचा न्हाय तथा ग्रामगितेतूनही अनेकदा तुकडोजींनी आपल्या वऱ्हाडी शब्दकळांचे दर्शन वारंवार केले आहे. त्यानी ग्रामिण जीवनाला समृध्द करण्याच्या भूमिकेतून ग्रामगिता साकारली आहे.. संत गाडगे बाबांनीही वऱ्हाडी भाषेची आपल्या किर्तनातून मायेच्या ममतेची अन् समाजातील अनिष्ठांवर आघात करण्यासाठी सकारात्मक उपयोग केलेला आपणास दिसून येतो. गाडगेबाबा म्हणजे चालते बोलते विद्यापीठ असल्याने त्यांचे किर्तन हे स्वयंस्फूर्त संकल्पनेतून येत असल्याने लिखित स्वरुपात गाडगे बाबांचे साहित्य फारच कमी हाती लागते. परंतू गाडगेबाबा यांच्या किर्तनातील महत्त्वाचे वेचे आजही बऱ्हाडातील अनेकांच्या मुखद्गत आहेत. गाडगेबाबांची किर्तन म्हणजे मौखिक वाड्:मयांचा आदर्श पाठशाळाच म्हणावी लागेल.

स्वातंत्र्योतर वऱ्हाडी साहित्य :
भारतीय स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील साहित्य प्रांतातही परिवर्तनाचे प्रवाह उदयास आले. साधारत: १९६० नंतरच्या काळात बऱ्हाडातील या चळवळींनी आपला प्रभाव साहित्याद्वारे सिध्द केला. वऱ्हाडी माती या कविता संग्रहाद्वारे शरदचंद्र सिन्हा यांनी वऱ्हाडी बोलीचा काव्यसंग्रह लिहीला तर चिखलगांवचे बाजीराव पाटील यांनी भंडारवाडी या कादंबरीतून वऱ्हाडी लोकजीवन चितारले. उध्दव शेळके यांनी धग कादंबरीतून बळी व कातीक या पात्राद्वारे वन्हाड प्रांतातील लोकजीवनाला उजागर करतांना संवादाद्वारे वऱ्हाडीकडे मराठी साहित्य विश्वाचे लक्ष वेधले. गो. नी. दांडेकर व प्रा. केशव मेश्राम यांनीही वऱ्हाडी भाषेत लेखन केले आहे. १९६३ साली हिन्दी मिश्रीत वऱ्हाडी भाषेची भेट मनोहर तल्हारांनी माणूस कादंबरीत घडवून आणली, तर केशव मेश्राम, देविदास सोटे यांनी विविध वाङ् मय प्रकारातून वऱ्हाडी भाषेचे आगळेवेगळे रूप दाखवून दिले. दिनबंधू गुरुजी शेगोकार, मधुकर वाकोडे, चित्रकार श्रीधर अंभोरे, प्रतिमा इंगोले, डॉ. विठ्ठल वाघ, सतिष तराळ, बाबाराव मुसळे, जगन वंजारी, शालीग्राम धनभर, ल.बा.गोळे, कवी जानराव हंबर्डे, प्रा.स.ग. पाचपोळ, सदानंद सिनगारे, पुरुषोत्तम बोरकर, आ. कि. सोनोने, तुळशीराम बोबडे, प्रा. डॉ. आशा थोरात, मीरा ठाकरे, शंकर विठोबा पाटील, डॉ. सदानंद देशमुख, राजा धर्माधिकारी, विनय मिरासे, हिम्मत शेगोकार, देविदास ओइम्बे, सुरेश पाचकवडे, नरेंद्र इंगळे, मिर्झा रफी अहमद बेग, भगवंत तायडे, विठ्ठल कुलट, नामदेव कांबळे, अनिल पाटील, रमेश अंधारे, रामदादा मोहिते, राजेश महल्ले, प्रा.गोविंद गायकी, मधुकर वडोदे, प्रमोद काकडे, भाऊ भोजने, अरविंद शिंगाडे, किशोर बळी, नंदू वानखडे, शिवाजी जवरे, रमेश सरकाटे, विमल वाघमारे, अरविंद भोंडे, नितीन देशमुख, उषा अंभोरे, शालीग्राम वाढे, रामेश्वर ताठे, शेख बिस्मिल्ला, विजयालक्ष्मी वानखेडे, पुष्कराज गावंडे, सुप्रिया अव्यर, गो.या. सावजी, रमेश इंगळे उतरातकर, शैलजा गावंडे, धम्मज्योती कांबळे, डॉ. रावसाहेब काळे, शोभा रोकडे, किरण डोंगरदिवे इ.नी वऱ्हाडी भाषेची वाङ् मयीन सेवा करतांना आपआपल्या वकुबानुसार विविध साहित्य प्रकारातून लेखन केले आहे. त्या प्रामुख्याने डॉ. विठ्ठल वाघ, प्रतिमा इंगोले आणि प्रा. डॉ. शोभा नाफडे यांनी वऱ्हाडी भाषेसंबंधी वेगवेगळ्या अंगाने संशोधन प्रकल्प सादर करून आपले स्वतंत्र साहित्य निर्मिले आहे. प्रा. केशव मेश्राम यांचे मुळ जन्मगांव अकोला चित्रा टॉकीजच्या पाठीमागच्या परिसरात त्यांचे बालपण गेले, त्यांच्या हकिकत आणि जटायू या कादंबरीसह इतरही साहित्य प्रकारात वऱ्हाडी भाषेचा लहेजा वाचक रसिकांच्या नजरेतून सुटत नाही. साधारतः १९७४ साला पासून वऱ्हाडी भाषेतून लेखन करणारे आ. कि. सोनोने हे अकोल्यातीलच त्यांचे आतापर्यंत २१ २२ छोटे मोठी ग्रंथसंपदा आली असून काव्यलेखन प्रकारात त्यांनी वैशिष्टपूर्ण वऱ्हाडी भाषेद्वारे आपला ठसा उमटविला आहे. वऱ्हाड परिसरातील कृषी जीवन, लोक व्यवहार, सामाजीक सांस्कृतिक परंपरा व दैनंदिन जीवन साहित्यात वरील लेखक, कवी, कथाकार, नाट्यलेखक तथा गितकार यांच्या लेखनातून दिसून येतो. विलास अंभोरे यांनी कथा, कादंबरी, नाटक तथा कवितेद्वारा वऱ्हाडी साहित्य क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख दिली आहे. तर सदानंद देशमुख आणि नामदेव कांबळे यांच्या वऱ्हाड प्रांतातील कादंबन्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला असून या निमित्ताने वऱ्हाडी साहित्य, मातीचा सन्मान वाढला आहे. एकूणच मराठी साहित्याच्या प्रांरभ अवस्थेपासून वऱ्हाडीने महत्वाची भूमिका निभावत माय मराठीचा सन्मानच वाढविला आहे. ‘वऱ्हाडीने कविता, कथा, गितं, कादंबरी इतकेच नव्हेतर संशोधनातही महत्वपूर्ण कामगीरी केलेली अभ्यासाअंती दिसून येईल. मराठीत बोलली जाणारी बोलीभाषा तिच्या खास वैशिष्ट्यांमुळे संपन्न आहे. किंबहुना मराठी बोलीभाषेची वऱ्हाडी हीच पहिली बोलीभाषा आहे. कारण वऱ्हाडी भाषा प्राचिन व समृध्द आहे याचे पुरावे इतिहासात अनेक ठिकाणी दिसून येतात. म्हणूनच प्राचिन साहित्य, महानुभव साहित्य, स्वातंत्र्यपूर्व
स्वातंत्र्यत्तोर साहित्य, दलित व ग्रामिण साहित्य तसेच मौखिकांमधूनही वऱ्हाडीचा वावर सर्वदूर दिसून येतो.

वरील प्रमाणे वऱ्हाडी भाषेची चर्चा करतांना वऱ्हाडीचा सन्मान व्हावा म्हणून शालीग्राम धनभर यांनी वऱ्हाडी ही संस्कृती जपणारी भाषा आहे असे निवेदन करतांना म्हटले आहे की, संस्कृती जपणारी भाषा आहे असे निवेदन करतांना म्हटले आहे की,

माही वऱ्हाडीची बोली- हाये अस्सी सकवारं !
कोनं नजर टाकता – होत्ये नजरीचा भार..
माही वऱ्हाडीची बोली माय जिजाऊ बोलली !
संत तुकडोजीची वाणी ग्रामगीतेत फुलली..
माही वऱ्हाडीची बोली- गाडगेबाबाच्या ते तोंडी !
इले घेऊन नाचे किर्तनात अंदी-मंदी.

संदर्भ सूची :
१. काळे या. मा. वऱ्हाडचा इतिहास प्रकाशन, या. मा. काळे वकील, बुलढाणे, वऱ्हाडी १९२४
२.नलचम्पू ६: ६६, ६:६६
३. प्रा. डॉ. शोभा नाफडे : वऱ्हाडी मराठी उद्गम आणि विकास, स्वरुप प्रकाश औ.बाद प्र. आ. ऑक्टो २००७
४. शास्त्री भा. शा. लोहीयांचे भाषाविषयक विचार, युगवाणी, विदर्भ साहित्य संघ, नागपूर. ए मे जून १९९०
५. डॉ. इंदुमती लहाने : मेहकराच्या परिसरातील लोकगीतांचा चिकित्कस अभ्यास, (प्रबंध १९८९)
६. डॉ. विठ्ठल वाघ : पारंपारीक वऱ्हाडी म्हणींचा सर्वांगीण अभ्यास (प्रबंध, पृष्ठ ३५१)
७. अरुण जाखडे : भारतीय भाषांचे लोक सव्र्हेक्षण महाराष्ट्र संपादन, पद्मगंधा प्रकाशन पुणे ३० प्र. आ. ऑगस्ट २०१३
८. सोटे दे.ग. वैदर्भी बोलीचा शब्दकोष, सोटे साहित्य प्रकाशन संस्था वर्धा, प्र. आ. १९७४ (पृष्ठ ४८ )
९. डॉ. उषा मा.देशमुख : मराठी साहित्याचे आदिबंध, लोकवाङ् मयगृह, मुंबई प्र. आ. १९९० (पृष्ठ ५१)
१०. प्रा. डॉ. शोभा नाफडे : व-हाडी मराठी उद्गम आणि विकास, स्वरुप प्रकाश औ.बाद प्र. आ. ऑक्टो २००७ (पृष्ठ १६८)
११. डॉ. वि. भि. कोलते : गोविंदप्रभू चरित्र, अरुण प्रकाशन मलकापूर, दु.आ. १९६० ( पृष्ठ क्र. ०४ )
१२. डॉ. अक्षयकुमार काळे : अर्वाचिन मराठी साहित्य दर्शन, पा. ना. बनहट्टी प्रकाशन, नागपूर प्र. आ. १९९९ (पृष्ठ २७४)
१३. डॉ. रमाकांत कोलते : डॉ. वि. भि. कोलते यांच्या साहित्याचा विवेचक अभ्यास, प्रबंध पृष्ठ ७३
१४. अरुण जाखडे : भारतीय भाषांचे लोक सर्व्हेक्षण महाराष्ट्र संपादन, पद्मगंधा प्रकाशन पुणे-३० प्र.आ. ऑगस्ट २०१३

सुरेश साबळे

“संदेश निवास” चिखली रोड, आनंद नगर,
बुलडाणा-४४३००१. मोबा. ९८५०३८०५९८

बी.ए.एम.एस डॉक्टर आता कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून होणार रुजु : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

 

 

आदिवासीनो उठा..  जागे व्हा.. जागे व्हावेच लागेल..!!!      : आदिवासी साहित्यिक रामराजे आत्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें