आ. संजय गायकवाड यांच्याशी चर्चा : युवा विद्यार्थी असोसिएशनची मागणी
बुलढाणा ; १० टक्के पद कपातसह रिक्त, अपात्र, गैरहजरसह दुसरा टप्पा पूर्ण क्षमतेसह प्रलंबित शिक्षक भरती तत्काळ करा, अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील युवा शिक्षक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषद सीईओ, प्राथमिक शिक्षणाधिकारीसह विविध अधिकाऱ्यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.
मागील काही वर्षांपासून प्रचंड दिरंगाईने शिक्षक भरती सुरू असून राज्याच्या वित्त विभागाने ८० टक्के पद भरतीची मान्यता दिलेली असताना देखील जिल्हा परिषद बिंदू नामावली वरील आक्षेपामुळे १० टक्के पदे कपात करण्यात आली. शासनाने त्या बाबत चौकशी समिती नेमून संबंधित आक्षेपांची चौकशी होऊन त्याचा अहवाल देखील शासनास प्राप्त झाला आहे. त्यामुळे सदर पद कपात भरती तत्काळ करण्यास कोणतीही अडचण नाही. तसेच राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते आहे. एका बाजुला जिल्हा परिषदेची अशी अवस्था असताना, अनेक नपा, मनपा आणि खाजगी संस्था यांना रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी चालू शिक्षक भरती प्रक्रियेत पुरेसा अवधी दिला गेला नाही. एकीकडे शाळांना शिक्षक नाहीत आणि दुसरीकडे पात्र उमेदवारांना नोकऱ्या नाहीत. अनेक वर्ष शिक्षणासाठी खर्च करून भरमसाठ पदव्या घेऊन देखील बेरोजगार शिक्षक तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. डी. एड., बी.एड., टीईटी, सीटीईट, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी अशा अनेक पात्रता परीक्षांमध्ये चांगले गुण घेऊन देखील केवळ शिक्षक भरती ही शासनाने दिलेल्या आश्वासना नुसार होत नसल्यामुळे या उमेदवारांची वयोमर्यादा देखील संपत चालली आहे. त्यामुळे १० टक्के पद कपातसह रिक्त, अपात्र, गैरहजर जागा पूर्ण क्षमतेसह प्रलंबित शिक्षक भरती तत्काळ करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रत्यक्षात १४ हजार शिक्षकांची भरती
शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर यांनी पहिल्या टप्प्यात ३० व दुसऱ्या टप्प्यात २० अशा प्रकारे एकूण ५० हजार शिक्षकांची भरती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पहिल्या टप्प्यात २१ हजार शिक्षक भरतीची जाहिरात काढून प्रत्यक्षात १४ हजार शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरतीची अपूर्ण राहिलेली प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी यासाठी पुणे येथे १४ दिवसांचे उपोषण आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षण आयुक्तांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत दुसऱ्या टप्प्याची जाहिरात प्रसिध्द करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी तत्काळ करण्याची मागणी होत आहे.
शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करणार : आ. गायकवाड
विधानसभा आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरतीची अपूर्ण राहिलेली प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, यासाठी अखेरचा उपाय म्हणून १० टक्के पदकपात, रिक्त अपात्र, गैरहजर, नपा/मनपा, खाजगी संस्था पदभरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याच्या जाहिराती काढण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, अशी मागणी यावेळी आ.संजय गायकवाड यांच्याशी चर्चा करताना बुलढाणा जिल्ह्यातील युवा विद्यार्थी असोसिएशनचे पदाधिकारी सचिन देशमुख, अनिल खांदोडे, नीलेश पवार, सुनिता वाघ, संध्या पाटील, राजू तायडे, अनिल लांडे, जोहान खान, गौरव अजबे, मुजाहीद सर, शहजाद खान, जरूसोबा खान, हुशेन अमेरा, हुमा शेख, नुर सबा खान आदी अभियोग्याताधारकांनी केली. या मागणीची दखल घेत आग़ायकवाड यांनी शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.