भारताचे माजी राष्ट्रपती व थोर विचारवंत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे ५ सप्टेंबर..! त्यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन. “गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानविण जगी न मिळे सन्मान,जीवन भवसागर तराया,चला वंदूया गुरुराया” समाजामध्ये आज अनेक जण शिक्षक म्हणून विद्यादान करीत आहेत. प्राचीन काळापासून जर आपण बघितले तर सुरुवातीला गुरुकुल पद्धती आपल्या भारतामध्ये प्रचलित होती ज्यामध्ये शिष्याला गुरूच्या आश्रमामध्ये राहून विद्या शिकावी लागत असे परंतु कालांतराने परिस्थिती बदलत गेलेली आहे आज आपण ज्या शाळा बघतो ज्या शाळांमध्ये आपण शिकतो ती तर खरी महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तींकडून समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाजातील दुर्लक्षित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न होय
“अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा, जगण्यातून जीवन घडविणारा, तत्त्वातून मूल्ये फुलविणा-या , ज्ञानरूपी गुरुंना शिक्षक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा…! आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शाळा डिजिटल(Digital) करुन व विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जाणे आवश्यक आहे जेणेकरुन या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारेल व विद्यार्थ्याची पटसंख्या वाढेल. कारण आज मराठी शाळा व सरकारी शाळा यांच्यावर विद्यार्थी पटसंख्या टिकवण्याची नामुष्की येत आहे, अर्थात यासाठी अनेक कारणे आहेत केवळ “कॉन्व्हेंट कल्चर”ला दोष देऊन काही फायदा नाही कारण कॉन्व्हेंट कल्चर ही काळाची गरज असली तरी आपल्या सरकारी व मराठी शाळांमध्ये कॉन्व्हेंटच्या दर्जाचे शिक्षण देऊन पालकांना या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्यासाठी जर आपण भाग पाडले तर मला नाही वाटत की कॉन्व्हेंट कल्चर हे आपल्या शाळा बंद पडण्याचे कारण होऊ शकेल. त्यामुळे एक शिक्षक म्हणून आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोबत सांगड घालणे आवश्यक आहे कारण आजचा विद्यार्थी हा मोबाईल आणि कॉम्प्युटर हे खेळणे खेळणारा विद्यार्थी आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसमोर आपल्याला जर ज्ञानदान करायचं असेल तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांची कुवत ओळखून व आवड ओळखून अशा विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या सोबत शिकविणे आवश्यक आहे. पुन्हा एकदा आजच्या शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षक बंधू-भगिनींना खूप खूप शुभेच्छा…!
प्रा. शरद सितारामजी नागरे
तक्षशिला माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, चिखली