आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे : राहुल बोंद्रे

बदलापुर, कोलकाताच्या घटनेचे जिल्ह्यात पडसाद ; मविआचा बुलढाण्यात महानिषेध

 बुलढाणा : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत सफाई कर्मचाऱ्यानी, चार वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले तसेच पश्चिम बंगालच्या कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 31 वर्षांच्या डॉक्टर तरुणीची बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली, या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. बुधवार २१ ऑगस्ट रोजी बुलढाण्यातही महाविकास आघाडीकडून जयस्तंभ चौकात महानिषेध आंदोलन करण्यात आले. महायुती सरकार लाडक्या बहिण योजनेच्या प्रचारात व्यस्त असून त्यांना बहिणीची सुरक्षा करायला वेळ नाही. अत्यंत असंवेदनशीलता दाखवून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना बोलायला सात दिवस लागले. या सरकारने राजीमामा दिला पाहिजे तसेच बलात्कार करणाऱ्या दोषींना फास्टट्रॅक मध्ये फाशिची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केली.

          या आंदोलनात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करत पैशांची भीक नको, महिला सुरक्षितता हवी, गृहमंत्री तथा राज्य सरकरारने राजीनामा द्यावा, आरोपींना फाशी झालीच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. तसेच सरकार विरोधात आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न वाऱ्यावर असल्याचा आरोप करीत सुरक्षेबाबत सरकार अपयशी ठरले असून दरवेळी जनतेच्या आंदोलनानंतर आणि माध्यमांनी दखल घेतल्यानंतरच यंत्रणा हलणार असले तर ही गंभीर चूक आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी दिल्या.

         यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे, राज्य उपाध्यक्ष संजय राठोड, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, अनुसूचित जाती विभागाचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे, काँग्रेस महिला पदाधिकारी नंदिनी ठारपे, अल्का खंडारे , राष्ट्रवादीचे नरेश शेळके, तसेच आघाडीचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

मविआची शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक : राहुल भाऊ बोंद्रे

महायुतीचे सरकार जनतेसाठी आता डोकेदुखी झाले आहे, महाराष्ट्रात इतके गुन्हे वाढले आहेत तरीही कारवाई नाही, उलट गुन्हेगारांना मोकाट सोडले जाते आणि पीडितांना वेठीस धरले जाते; त्यांच्यावर अन्याय होतो. महायुतीचे सरकार देशातील जनतेसाठी आणि देशाच्या भविष्यासाठी फार घातक ठरणार आहे. म्हणूनच या सरकारला आता हद्दपार करायची वेळ आली आहे. मविआकडून शनिवारी २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला समाजातील सर्वज घटकांनी पाठिंबा देवून निषेध व्यक्त करावा, असे आवाहन जिल्हा काँग्रेसकमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केले आहे.

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या : जालींधर बुधवत

बदलापुर येथील घटना अतिशय संतापजनक असून, महिला सुरक्षतेबाबत राज्य सरकारचे लक्ष आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे. महिला सुरक्षतेबाबत सरकार अपयशी ठरले आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच महाराष्ट्रातील अनेक लोकांना कुठल्याही पदावर नसतांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. ते काढून राज्यातील महिलांना सुरक्षा द्यावी, असे उबाठाचे जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांनी सांगितले.

https://buldhananews.com/2023/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें