बुलढाणा न्यूज : 26 जुलै हा दिवस देशात कारगील विजय दिन म्हणुन दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावर्षी हा दिवस बुलडाणा अर्बन परिवार व बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा यांनी संयुक्तपणे साजरा करण्याचे ठरविले असुन सदर कार्यक्रम शुक्रवार, दि.26 जुलै 2024 रोजी सहकार विद्या मंदीराचे सांस्कृतिक हॉलमध्ये साजरा करण्यात येत आहे.
दि.26 जुलै 1999 रोजी आपल्या देशाच्या सैन्याने कारगील युध्दात विजय मिळविला होता. तेव्हापासुन 26 जुलै हा दिवस कारगील विजय दिन म्हणुन आपल्या देशात मोठया प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी 26 जुलै 2024 रोजी या विजयी दिनाला पंचवीस वर्ष पुर्ण होत आहेत,. त्यामुळे पंचविसव्या वर्षाचे औचित्य साधुन यावर्षी हा दिवस मोठया प्रमाणात संयुक्तपणे साजरा करण्याचे बुलडाणा अर्बन परिवार व बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा यांनी ठरविले आहे. 26 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता हुतात्मा गोरे स्मारक येथे हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली जाणार आहे. त्यानंतर तेथुनच शहीद सन्मान बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही रॅली तहसिल चौक, संगम चौक, जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, कारंजा चौक, एडेड चौक व चिखली रोडने सहकार विद्या मंदीरचे सांस्कृतिक हॉल येथे रॅलीचे समापन होईल. सहकार विद्या मंदीराचे प्रांगणात बसविण्यात आलेल्या व कारगील युध्दात कामगिरी बजावलेल्या मिग-21 विमान, रणगाडा व अँकरला मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल, तसेच याच कार्यक्रमाचे निमित्ताने युध्दातील विविध शस्त्रांच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. सामान्य नागरीकांना पहावयाचे असल्यास त्याच दिवशी सकाळी 10.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पहाता येणार आहे.
या दिनाचे औचित्य साधुन जिल्हयातील वीरनारी व वीर योध्दयांचा उचित सन्मान करण्यात येणार असुन या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन बुलडाण्याचे आमदार श्री.संजय गायकवाड, आ.धिरज लिंगाडे हे राहणार असुन कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.सुनिल कडासने, कर्नल सुहास जतकर माजी संचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य, स्क्वाड्रन लिडर रुपाली सरोदे, बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलडाणा, डॉ.सुकेश झंवर चिफ मॅनेजिंग डायरेक्टर, बुलडाणा अर्बन व सौ.कोमल सुकेश झंवर, अध्यक्षा, बुलडाणा अर्बन चॅरीटेबल सोसायटी, बुलडाणा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या विजयी दिनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बुलडाणा अर्बन परिवार व बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तीन महिन्याच्या कालावधीत 101 जणांचा मृत्यू (101 people died in a period of three months)