बुलढाणा न्यूज : महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची पेरणी करत पिंप्री गवळी येथील उबाळे कुटुंबियांनी आईच्या मृत्यूनंतर अस्थिंचे विसर्जन शेतात करत त्यावर वृक्षारोपण करीत कृती मधून सामाजिक संदेश दिला आहे.
पिंप्री गवळी येथील मारोती कडुजी उबाळे यांच्या आई सुशीलाबाई कडुजी उबाळे (वय 84) यांचे शुक्रवार, दिनांक 5 जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. दरम्यान रविवार, 7 जुलै रोजी त्यांच्या अस्थिंचे नदीत विसर्जित न करता शेतात खड्डा करून त्यामध्ये अस्थी विसर्जन करण्यात आले. त्या जागेवर वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. या वटवृक्षाच्या रुपाने आईच्या स्मृती चिरंतर राहतील, अशी उबाळे परिवाराची व आप्त परिवाराची धारणा आहे. यावेळी वृक्षारोपण दलित मित्र माधवराव हुडेकर, बाबुराव शहाणे, सखाराम क्षीरसागर, शिवसेना तालुकाप्रमुख रामदास चौथनकर, संजय हुडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने शिवशंकर गोरे, गजानन हुडेकर, अनिल खराटे, मधुकर चौथे, चांगो सरोदे, सुधाकर बोरसे, अमोल धनेश्वर यांचे सह आप्तपरिवार व उबाळे कुटुंबीय उपस्थित होते.

सन 2019 मध्ये वडीलांच्या अस्थी देखील केल्या होत्या विसर्जित
सन 2019 मध्ये वडील कडुजी नारायण उबाळे यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थि देखील उबाळे कुटुंबियांनी शेतामध्ये विसर्जित करत तेथे वटवृक्ष व इतर 100 वृक्ष लागवड केली होती. तसेच आज पर्यंत त्यांचे संवर्धन करण्यात येत आहे. आपल्या प्रियजनांच्या स्मृती निरंतर जोपासण्यासाठी उबाळे कुटुंबीयांनी कृती मधून दिलेला सामाजिक संदेश वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा असून इतरांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे.