बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचा मार्ग मोकळा
बुलढाणा न्यूज : बुलढाणा जिल्ह्यात शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अधिवेशनात केली. केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी 19 जून रोजी ना. अजित पवार यांची भेट घेतली होती. यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाला अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी देऊन प्रस्ताव पाठवा, मी त्याला केंद्रात तत्काळ मान्यता मिळवून देतो, असा शब्द दिला होता. त्या दृष्टीने ना. जाधव यांच्या सुचनेचा मान राखत ना. पवार यांनी राज्य सरकारतर्फे पावले उचलून अधिवेशनात तशी घोषणा केली.
या निर्णयाने आता आयुर्वेद महाविद्यालय होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसह पालकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शिवसेनेचे आ. संजय गायकवाड व आ. संजय रायमूलकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय सुरू करण्याबाबत मागणी केली होती. याबाबत पाठपुरावा करण्यासाठी आमदारद्वयांनी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे विनंती केली होती. या मागणीच्या अनुषंगाने जाधव यांच्यासह दोन्ही आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतली होती.
अंबाबरवा / ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आयुर्वेदिक वनस्पती अस्तित्वात
जिल्ह्यातील अंबाबरवा व ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आयुर्वेदिक वनस्पती अस्तित्वात आहे. त्याचाही उपयोग आयुर्वेदासाठी होऊ शकतो. त्याचप्रमाणे जळगाव जामोद, संग्रामपूर आणि मेहकर या तालुक्यात आदिवासी बांधव हे आयुर्वेदिक चिकित्सेवर विश्वास ठेवणारे असल्याने जिल्ह्यातील लोकांना अतिप्राचीन आयुर्वेदिक उपचार सुविधा मिळण्याच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे शिक्षण येथेच उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली.
आजच्या अधिवेशनात मान्यता मिळाली
बुलढाणा येथे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू करण्यास आजच्या अधिवेशनात मान्यता मिळाली आता राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविल्या जाणार आहे. या प्रस्तावाला केंद्राने मंजुरात दिल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय सुरू होईल. या प्रस्तावाला मान्यता मिळवून घेणार आहेत. त्यांच्याच विभागाकडे या संदर्भाचा प्रस्ताव पाठविल्या जाणार असल्याने महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
– राज्यमंत्री खा.प्रतापराव जाधव, केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण.