अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना लागू  

बालविवाह केल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद Provision of punishment and penalty for child marriage

      बुलढाणा न्यूज : राज्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 लागू करण्यात आला आहे. शुक्रवार, दि. 10 मे रोजी अक्षय तृतीया असल्याने या दिवशी बाल विवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बालविवाह केल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.

        बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 लागू असून याचे नियम महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2022 देखील लागू आहेत. या अधिनियमानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार बालविकास प्रकल्प अधिकारी यांना शहरी, तर ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच ग्रामीण भागाकरीता अंगणवाडी सेविका, तसेच शहरी भागाकरिता पर्यवेक्षिकांना सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

        अक्षयतृतीया या दिवशी जिल्ह्यात बालविवाह होऊ शकतात. यास प्रतिबंधक म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास सदर पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणार्‍यास, सोहळा पार पाडणार्‍यास किंवा प्रोत्साहन देणार्‍यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बालविवाह झाल्यास, संबंधित वर-वधूंचे आई-वडिल किंवा पालक व अन्य नातेवाईक, मित्र परिवार, मंदिरातील विश्वस्त, फोटोग्राफर, प्रिंटिंग प्रेस, वाजंत्री, सभागृह व्यवस्थापक, कॅटरिंग अशा सर्वांनी बालविवाह घडविण्यास प्रत्यक्ष मदत केली किंवा तो रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, जे अशा विवाहात सामील झाले होते, अशा सर्वांना दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. सोबत ग्रामसेवकांनी जन्म दाखल्याची खोटी नोंद केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे.

         दि. 10 मे 2024 रोजीच्या अक्षयतृतीयेला संभावित बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी बालविवाह प्रतिबंधात्मक अधिनियमातील तरतुदीनुसार बालविवाह रोखण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें