बुलढाणा – शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने व गारपिटीने हिरावून घेतला आहे. 26 फेब्रुवारी 2024 रोजी बुलढाणा तालुक्यात बर्याच ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामध्ये हरभरा, गहु, कांदा, मका, फळबागा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचा सर्व्हे करून शेतकर्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी. यासाठी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी बुलढाणा तहसीलदार यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन नुकसानीचा आढावा घेण्यासाठी निर्देश दिले.
त्याअनुषंगाने आज 27 फेब्रुवारी रोजी सकाळी तहसीलदार बुलढाणा मंडळ अधिकारी तलाठी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री देविदास पाटील, जिल्हा सचिव अॅड.सुनील देशमुख, तालुकाध्यक्ष मोहन पवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सतीश भाकरे, धाड शहराचे अध्यक्ष विशाल विसपुते यांच्यासह मासरूळ, धामणगाव, डोमरुळ, गुम्मी, तराडखेड गावातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व नुकसानग्रस्त शेतकरी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार बुलढाणा कुमरे यांनी घटनास्थळी पाहणी करून मंडळ अधिकारी, तलाठी व कृषी सहाय्यक कृषी अधिकारी यांना तात्काळ सर्व पाचही गावातील नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
यावेळी मासरूळ सर्कलच्या वतीने अॅड.सुनील देशमुख यांनी आमदार श्वेता महाले पाटील यांनी मतदारसंघातील शेतकर्यांच्या मदतीला धावून आल्याबद्दल धन्यवाद मानले.