किसान कामगार संयुक्त औद्योगिक संपाला सीटूचा पाठिंबा
बुलढाणा न्यूज – देशातील कामगार, कष्टकरी, शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी-कामगारांच्या संयुक्त कृती समितीने शुक्रवार, दि.16 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभर एक दिवशीय औद्योगिक संप पुकारला होता. या संपाला बुलढाणा जिल्हा सीआयटीयूच्या वतीने सिटूचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि शालेय पोषण आहार कामगारांच्या महिला कार्यकर्त्यांनी सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शने केली. या आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.
आज देशात भाजप प्रणित मोदी सरकार आणि राज्यातील महायुतीचे शिंदे सरकार मोठ्या प्रमाणात शेतकरी व कामगार विरोधी धोरणे राबवून मुठभर भांडवलदारांच्या हिताचे धोरणे राबवित आहे. देशात मोठ्या प्रमाणात महागाई आणि बेरोजगारी वाढत असताना सरकार जाती जातीमध्ये आणि धर्मा धर्मामध्ये आरक्षणाच्या नावावर फोडाफोडीचे राजकारण करीत आहे. मूळ प्रश्नांना बगल देऊन परस्परांमध्ये विद्वेश निर्माण करून निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मताची पोळी भाजत आहे. जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडलेले आहेत, शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च सर्वसामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेलेला आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, दुष्काळग्रस्त शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, वीज विधेयक 2020 रद्द करण्यात यावे यासाठी देशातील शेतकरी गेल्या काही दिवसापासून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करीत आहे. तसेच देशातील सार्वजनिक उद्योग विक्रीला काढून त्याचे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण केल्या जात आहे. जूने कामगार हिताचे कायदे रद्द करून चार श्रमसंहिता मंजूर करून कामगारांवर मोठा अन्याय केला जात आहे.राज्यातील आशा आणि अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कामगार आपल्या मानधन वाढीसाठी संप करीत आहेत. सरकार त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करायला सुद्धा तयार नाही. या जनविरोधी धरणाच्या विरोधात हा औद्योगिक संप करण्यात आला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आज सिटूच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभाताई पाटील, आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या विजया ठाकरे, मंदा डोंगरदिवे, रेखा इंगळे, लिना इंगळे, सुप्रदा जाधव, मनीषा चव्हाण, सुरेखा डोंगरे प्रीतम शाहीन बी खान, लता थुट्टे, दिपाली लहाने, प्रिती वाघ, अश्विनी घेवंदे, पूनम अवसरमोल, सुरेखा गायकवाड, गवळी, लीना इंगळे, प्रितम झीने यांच्यासह बहुसंख्येने आशा व गटप्रवर्तक सहभागी होत्या हे विशेष !