जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक; मुख्याध्यापकांच्या हस्ते अभिनंदन
देऊळगाव राजा : येथील देऊळगाव राजा हायस्कूलच्या विद्यार्थिनी कुमारी विश्वजा विलास काळुंके हिने जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी व सीलबम क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले असून तिची विभागस्तरावर निवड झाली आहे.
दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी व सीलबम क्रीडा स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये १४ वर्षांखालील वयोगटात कुमारी विश्वजा विलास काळुंके हिने तलवारबाजी व सीलबम या क्रीडाप्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून आपल्या कौशल्याची चमक दाखविली. या यशाच्या जोरावर तिची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विश्वजाने मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. बी. कोल्हे व उपमुख्याध्यापक श्री. डी. व्ही. जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले व आगामी विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या यशासाठी मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक श्री. एस. व्ही. मुळे यांचाही मुख्याध्यापक श्री. आर. बी. कोल्हे यांनी पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
विश्वजाच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






