एसटी चालक तेजराव तेजनकर यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक

SHARE:

छातीत तीव्र वेदना होत असतानाही एसटी चालकाने प्रवाशांना सुखरूप पोहोचविले

लोणार (प्रतिनिधी) : छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्यानंतरही कर्तव्याला प्राधान्य देत एसटी बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बसस्थानकावर पोहोचविण्याची घटना समोर आली आहे. मेहकर आगारात गेल्या १६ वर्षांपासून चालक म्हणून सेवा देणारे तेजराव संपतराव तेजनकर यांनी प्रसंगावधान राखत दाखविलेल्या धैर्याचे प्रवाशांकडून कौतुक होत आहे.

ही घटना २० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली. तेजनकर हे वझर आघाव ते लोणार या मार्गावरील फेरी पूर्ण करून परत येत असताना त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. काही वेळातच वेदना असह्य होऊ लागल्या. मात्र, बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचविण्याची जबाबदारी लक्षात घेऊन त्यांनी धीर न सोडता बस लोणार बसस्थानकापर्यंत आणली.

प्रवाशांच्या सुरक्षेला दिले प्राधान्य

स्वतःला तीव्र वेदना होत असतानाही तेजनकर यांनी बसवरील नियंत्रण कायम ठेवले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप लोणार बसस्थानकावर पोहोचविले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही तसेच बसचेही नुकसान झाले नाही.

लोणार बसस्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांची प्रकृती पाहून बसमधील प्रवासी आणि बसस्थानकावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत केली. त्यांना पुढील उपचारांसाठी मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक

तेजराव संपतराव तेजनकर हे मेहकर आगारात गेल्या १६ वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत असून, ते सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे आगार अध्यक्षही आहेत.

स्वतःच्या वेदनांपेक्षा प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनी दाखविलेली कर्तव्यनिष्ठा आणि प्रसंगावधान यामुळे त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. एसटी चालकाच्या जबाबदारीचे आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबतच्या बांधिलकीचे दर्शन या घटनेतून घडले आहे.

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Comment