उधना-अमरावती सुपरफास्ट विशेष रेल्वे सुरू
शेगाव (प्रतिनिधी) : सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उधना ते अमरावतीदरम्यान सुपरफास्ट विशेष रेल्वे चालविण्यात येणार असून, या सेवेमुळे विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ही विशेष रेल्वे 26 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दर सोमवारी धावणार आहे. या गाडीला शेगाव, अकोला, मलकापूर, नांदुरा, मूर्तिजापूर आणि बडनेरा यांसह विदर्भातील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
अनेक प्रमुख स्थानकांवर थांबे
उधना-अमरावती विशेष रेल्वेला व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ आणि बोदवड या स्थानकांवरही थांबे असणार आहेत. त्यामुळे गुजरात, खान्देश आणि विदर्भातील प्रवाशांना या रेल्वेचा लाभ घेता येणार आहे.
जाण्या-येण्याचे वेळापत्रक
रेल्वे क्रमांक 09013 (उधना-अमरावती) दर सोमवारी सकाळी 11.30 वाजता उधना स्थानकावरून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9.20 वाजता अमरावती येथे पोहोचेल.
तर रेल्वे क्रमांक 09014 (अमरावती-उधना) दर सोमवारी रात्री 11.30 वाजता अमरावती येथून रवाना होईल. ही गाडी मंगळवारी सकाळी 9.35 वाजता उधना स्थानकावर पोहोचेल.
आरक्षणाची सुविधा सुरू
या विशेष रेल्वेचे आरक्षण 24 ऑक्टोबरपासून सुरू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ किंवा आरक्षण प्रणालीवरून अद्ययावत वेळापत्रक, उपलब्धता आणि थांब्यांची माहिती तपासून तिकिटांचे आरक्षण करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या विशेष रेल्वेमुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.






