best news portal development company in india

मनमानी धान्य पुरवणारा पुरवठा विभाग प्रशासनाचा जावई आहे का?

SHARE:

रेशन धान्याचा निकृष्ट पुरवठा, जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना युवासेनेने दिले निवेदन


बुलढाणा न्यूज
मनमानी धान्य पुरवणारा पुरवठा विभाग प्रशासनाचा जावई आहे का? असा संतप्त सवाल करीत. आंधळ दळतं कुत्र पीठ खातं, या म्हणीप्रमाणे वर्षभरात विशेषत: या नोव्हेंबर महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये राशन धान्य वाटप झालं, त्यामध्ये तांदूळ आणि ज्वारीचे वाटप करण्यात आले.सदर ज्वारी व तांदूळ हे एवढे निकृष्ट दर्जाचे होते की, ते जनावरांना सुद्धा खाण्यायोग्य नव्हते आणि तेच धान्य यंत्रणेने चक्क माणसांना खाण्यासाठी दिले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी यासाठी सदर निकृष्ट धान्यासह दि.३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भूतेकर व विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख ओमराजे गायकवाड यांनी निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये अनेक कुटुंब असे आहेत की ज्यांना राशनचं धान्य खाल्ल्याशिवाय पर्याय नाही त्या गोरगरिबांना हेच आळ्या, किडे, भूंग व जाळं असलेलं खाण्यासाठी आपण दिलं हे गोरगरिबांची थट्टा असून हे धान्य देत असताना आपल्या यंत्रणेला किंवा अधिकार्‍यांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती. याच वेळी नाही तर अनेकदा असे निकृष्ट धान्य देऊन आपल्या विभागामार्फत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला जातो आहे हे आता उघड झाले आहे. हे धान्य पुरवणारी यंत्रणा कोणती व त्या यंत्रणेला खपवून घेणार्‍या चालवणारा अधिकारी कोण तो शासनाचा व प्रशासनाचा जावई आहे काय? या यंत्रणेवर व अधिकार्‍यांवर तातडीने कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे, यांच्यावर रीतसर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही भूमिका घेतली.  तसेच गेल्या दोन-तीन  वर्षापासून आपल्या विभागाने अनेक गोरगरीब कुटुंबाकडून धान्य नाही तर आपल्याला पैसे मिळतील असे म्हणून फॉर्म भरून घेतले होते. त्या लोकांना अजून पैसेही मिळाले नाही व धान्य सुद्धा मिळत नाही ते वारंवार आपल्या पुरवठा विभागाकडे चकरा मारत असतात परंतु पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांकडून त्यांना समाधानकारक उत्तरे सुद्धा मिळत नाही. त्यांचा प्रश्न तातडीने निकाली लावावा एक तर धान्य द्यावे किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे द्यावे आणि नेमकं घोडं कुठे अडलंय ते कधी मार्गी लागणार याचा तरी किमान खुलासा करावा जेणेकरून लोकांना तुमच्या दारात चकरा मारण्याच काम पडणार नाही.

कार्यवाही न झाल्यास २३ डिसेंबर रोजी आंदोलन छेडणार

 सदर मुद्यांची आपण सखोल चौकशी करून तातडीने कारवाई न केल्यास  प्रशासनाच्या विरोधात मंगळवार, दि.२३ डिसेंबर २०२५ रोजी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.
– युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भूतेकर 

Leave a Comment

best news portal development company in india
और देखें