पेंशनधारकांच्या मागण्या संदर्भात तातडीने निर्णय न झाल्यास परिणाम गंभीर- कमांडर अशोक राऊत

सरकारने तातडीने इपीएस 95 पेंशनधारकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे Serious attention should be paid to the issue of pensioners, अन्यथा त्यांचे गंभीर परिणाम होतील असा इशारा कमांडर अशोक राऊत यांनी दिला आहे ते  रविवार, दि.15 ऑक्टोंबर रोजी शेगांव येथील कुणबी समाज मंगल कार्यालयात झालेल्या इपीएस 95 पेंशनधारकांचे मेळाव्यात बोलत होते.

               या जिल्हा मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्षा सौ.शकुंतला बुच, भाजपा नेते पांडूरंग बूच, माजी जि.प सदस्य दयाराम वानखेडे, माजी पं.स.सदस्य संजय कलोरे यांची उपस्थिती होती. मेळाव्याची सुरुवात दिप प्रज्वलन करुन तसेच सौ रजनी ताई जाधव व त्यांचे सहकारी यांचे स्वागत गीताने झाली.

         देशातील औद्योगिक, सार्वजनिक, सहकारी, खाजगी क्षेत्रातील सेवानिवृत्त ज्यात प्रामुख्याने रस्ते वाहतूक महामंडळ, वीज मंडळ, सहकारी बँका, पतसंस्था, साखर उद्योग, विना अनुदानित शाळा महाविद्यालये, बियाणे महामंडळ, वन विकास महामंडळ, कृषी उद्योग विकास महामंडळ, वस्त्रोद्योग महामंडळ, कॉटन फेडरेशन बजाज, टाटा मोटर्स सारखे असंख्य 186 उद्योगात काम केलेल्या इपीएस 95 पेंशन धारकांची संख्या 70 लाख आहे. या कामगारांनी दरमहा 417 रुपये, 541 रुपये, 1250 रुपये अंशदान पेंशन फंडात दिले आहे आणि देश निर्मिती मध्ये ऐन तारुण्यातील 30ते 35 वर्ष खर्ची घातले आहेत. आपले रक्त अन घाम गाळून देश समृद्ध बनविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्यांना आज सरासरी पेंशन 1 हजार 171 रुपये आहे. कितीही महागाई वाढली तरी त्यात कवडीची हि वाढ होत नाही. त्यामुळे इपीएस 95 पेंशनर्सची दयनीय व मरणासुन्न अवस्थेत जीवन जगत आहेत. सन्मानजनक पेंशन व वैद्यकीय सुविधा अभावी दररोज सरासरी 200 पेंशनधारक मरत आहेत. त्यामुळे आज जरी देशाची प्रगती होत असली तरी इपीएस 95 पेंशनधारकांची अधोगती होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. ज्यांनी पेंशन फंडात अंशदान दिलेले नाही त्यांचासाठी सरकारचे विविध पेंशन योजना आहेत. मात्र ज्यांनी पूर्ण सेवा काळात दरमहा अंशदान दिले त्यांना तुटपुंजी पेंशन? हे सावत्र व्यवहार का? म्हणून पती पत्नी ला जीवन जगण्यासाठी किमान मासिक पेंशन 7 हजार 500 रुपये व त्याला महागाई भत्ता, माननिय सुप्रीम कोर्टाचे निर्णयानुसार पेन्शनर मध्ये कोणताही भेदभाव न करता वास्तविक वेतनावर अंशदान घेऊन उच्च पेंशन, वृद्धापकाळात मोफत वैद्यकीय सुविधा.,या योजने पासून वंचित ठेवलेल्या कामगारांचा समावेश करुन त्यांना किमान मासिक रु 5 हजार रुपये या प्रमुख मागण्यासाठी गेल्या 5/6 वर्षांपासून सातत्याने सर्व आंदोलने केलीत, अधिकारी पदाधिकारी मंत्री यांच्या सह पंतप्रधानां पर्यंत भेटी, चर्चा, निवेदने झालीत. त्यांच्याकडून आश्वासने मिळालीत, मात्र सकारात्मक निर्णय अद्यापही नाही. संघटना देशातली 27 राज्यांत कार्यरत असून या संघटनेचे मुख्यालय बुलढाणा आहे. या ठिकाणीं गेल्या 1 हजार 757 दिवसापासून साखळी उपोषण सुरु आहे. उन, वारा, पाऊस याची कुठलीही पर्वा न करता हे वृद्ध पेंशनधारक साखळी उपोषण करीत आहे. अगदी कोरोना कालावधीत सुद्धा हे उपोषण सुरु होते. दररोज मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत पंतप्रधान महोदया पर्यंत निवेदन दिले जाते. दोनदा प्रधानमंत्री यांनी व अनेकदा श्रममंत्री यांनी आश्वासने दिलीत नंतर सुध्दा मागण्या मंजूर न झाल्यामुळे पेंशनधारकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. कारण हा त्यांचें जीवन मरणाचा प्रश्न आहे. शासन/प्रशासनाने या वृध्द पेंशनधारकांचा प्रश्न तातडीने निकाली काढावा म्हणून अशा प्रकारे जिल्हा मेळावे आयोजित करून सरकारचे लक्ष वेधण्याचा हे पेंशनधारक प्रयत्न करीत आहेत.

           श्री संजय कलोरे म्हणाले की, तुमची समस्या मी तातडीने भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे मांडतो असे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्या राष्ट्रीय तसेच राज्य व जिल्हा पातळीवरील नेत्यांची देखील समोयोचीत भाषणे झालीत. यामध्ये विरेंद्र सिंग राजावत, पी.एन.पाटील, सुभाष पोखरकर, कमलाकर पांगारकर, एजाज उर रहेमान यांचेसह जळगाव, अकोला, वाशिम, हिंगोली, संभाजीनगर, अहमदनगर, लातूर येथील जिल्हाध्यक्ष यांनी आपले विचार व्यक्त केले.
          बुलडाणा जिल्हा अध्यक्ष प्रकाश मिरगे यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. मेळाव्याचे संचलन जिल्हा सचिव पी.आर. गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.हिम्मतराव देशमुख यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें