माहिती अधिकार सप्ताह दि. 6 ते 12 ऑक्टोबर 2023 या कालावधीत साजरा होणार
बुलढाणा न्यूज- जिल्ह्यात दि. 6 ते 12 ऑक्टोबर 2023 या दरम्यान माहिती अधिकार सप्ताह साजरा करावा, यात पथनाट्ये, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे, व्याख्याने, कार्यशाळांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
माहिती अधिकार अधिनियम 2005 कायद्याची अंमलबजावणी देशभरात दि. 12 ऑक्टोबर 2005 पासून करण्यात आली आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रशासनामध्ये पारदर्शकता व जनतेप्रती उत्तरदायित्व निर्माण होण्यास हातभार लागत आहे. त्यामुळे शासन व्यवस्थेत नागरिकांचा सहभाग वाढण्यासाठी दि. 6 ते 12 ऑक्टोबर 2023 या कालावधीत माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
या सप्ताहात जाणीव जागृती करण्याशी संबंधीत उपक्रमात माहिती अधिकार कायद्याच्या अधिकार क्षेत्रात येणार्या शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहितीचा अधिकार विषयी पथनाट्ये, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे, व्याख्यान, कार्यशाळांचे आयोजन करावे. तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, महामंडळ, सार्वजनिक उपक्रम, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये माहितीचा अधिकार या विषयाबाबत प्रबोधनपर व्याख्याने, कार्यशाळेचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.