बुलढाणा न्यूज- बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई-सैलानी रस्त्यावरील मारुती मंदिराच्या समोर राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे सामान वाहून येणार्या मिक्सर टिप्परने मोटर सायकलला जोरदार धडक दिली आहे. यामध्ये मोटार सायकल चालक जागीच ठार झाला असून महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. हया जखमी महिलेस बुलढाणा येथे उपचरार्थ हलविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाशिम जिल्हयातील रिसोड तालुक्यातील मोहगाव हाडे येथील रहिवाशी पती-पत्नी सैलानी येथे दर्शन घेण्याकरिता आले होते.
यावेळी भरधाव येणार्या मिक्सर टिप्परने संजय तुकाजी हाडे वय 50 यांच्या मोटार सायकला जबर धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी रंजना संजय हाडे वय 45 या गंभीर जखमी झाल्या आहेत. हे पती पत्नी वाशिम जिल्हयातील रिसोड तालुक्यातील मोहगाव हाडे येथील रहिवाशी असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सावळे,ऋषिकेश पालवे, अरुण झाल्टे यांनी भेट देऊन जखमी महिला रंजना हिस बुलढाणा जिल्हा रुग्णालय उपचारासाठी हलविले आहे.
सदर अपघात एवढा गंभीर होता की, मिक्सर टिप्पर खाली मोटरसायकल संपूर्ण चुरा झाली आहे मोटर सायकल व मिक्सर टिप्पर रायपूर पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे. वृत्तलिहेेपर्यंत रायपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
पुलावरुन पाणी वाहत असल्याने चार तास वाहतूक ठप्प
पिंपळगाव सराई रायपूर परिसरामध्ये शुक्रवार, दि.29 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेपासून ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे एका तासात नदी नाल्यांना पूर आला होता. यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. बुलढाणा तालुक्यात रायपूर सर्कलमध्ये आजपर्यंत सुद्धा नदी नाल्यांना पूर गेलेला नव्हता. सकाळी कडक ऊन पडलेले होते. परंतु अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन या परिसरामध्ये एक तास जोरदार पाऊस पडला. या जोरदार पावसामुळे नदी नाले भरून गेले होते. संपूर्ण पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस पडला नव्हता. यामुळे या परिसरात पिकांना पावसाची आवश्यकता होती. दरम्यान आज पिंपळगाव सराई रायपूर नदीच्या वरून पाणी वाहत असल्यामुळे जवळपास या रस्त्यावरील चार तास वाहतूक ठप्प झाली होती.