पुरग्रस्तांसाठी श्री गजानन महाराज संस्थान सरसावले…
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल १ कोटी ११ लाखांची मदत
साधना प्रवीण थोरात / शेगाव
राज्याला काही दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: मराठवाड्यात धो धो पाऊस बरसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा जिल्ह्यात पावसाची बॅटिंग सुरुच आहे. तसेच वाशिम, नाशिक, ठाणे, रायगडसह मुंबईतही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. याशिवाय अनेक धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आल्याने पुन्हा एकदा धाकधूक वाढली आहे. अनेक जिल्ह्यांत नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले, गावे जलमय झाली, शेतकर्यांच्या पिकांचे व जनावरांचे मोठे नुकसान झाले. जनजीवन विस्कळीत झाले असून शासनाकडून सर्वत्र मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. अशा कठीण प्रसंगी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानने पुन्हा एकदा समाजकार्यातील आपली बांधिलकी सिद्ध केली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी ११ लाखांचा धनादेश पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी श्री गजानन महाराज संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. हा धनादेश दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट हस्तांतरित करण्यात आला. या मदतनिधीच्या सुपूर्दते वेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थानच्या कार्याचे कौतुक केले.
श्री गजानन महाराज संस्थानने दिलेली मदत इतर संस्था व व्यक्तींना समाजकार्यासाठी प्रेरित करेल – मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रसंगी म्हटले की, श्री गजानन महाराज संस्थानने दिलेली मदत ही पुरग्रस्तांसाठी दिलासा ठरणारी असून, धार्मिक संस्था
समाजाच्या कठीण काळात पुढे कशा येऊ शकतात, याचा हा आदर्श आहे. पूरस्थितीचे भीषण चित्र गेल्या काही आठवड्यांत सततच्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागांना फटका बसला आहे. शेतजमिनीतील पिके पाण्याखाली गेली, शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ग्रामीण भागातील घरे कोसळली, जनावरांचा जीव गेला. या परिस्थितीत शासनासोबत अनेक स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था आणि सामाजिक मंडळी मदतीसाठी पुढे सरसावली आहेत. त्यामध्ये शेगाव संस्थानची मदत ही सर्वाधिक ठळक व भरीव ठरली आहे. संस्थानची सेवाभावी परंपरा श्री गजानन महाराज संस्थान ही केवळ धार्मिक कार्यापुरती मर्यादित नसनू सामाजिक कार्यातही आघाडीवर आहे. शिक्षण, आरोग्यसेवा, पाणीपुरवठा, आपत्तीग्रस्तांना मदत अशा विविध क्षेत्रांत संस्थानने महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. याआधीही भूकंप , दुष्काळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात संस्थानने मदतीचा हात दिला होता. त्यामुळेच आज पुन्हा एकदा संस्थानने दिलेला १ कोटी ११ लाखांचा निधी ही परंपरा कायम ठेवणारा आणि सेवाकार्याला नवा आयाम देणारा ठरला आहे.
संकटसमयी पुरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देणे ही आमची जबाबदारी
विश्वस्त मंडळाची प्रतिक्रिया या संदर्भात संस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले की, गजानन महाराजांच्या शिकवणुकीनुसार सेवाभाव हीच खरी उपासना आहे. महाराष्ट्रावर आलेल्या या संकटसमयी पुरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देणे ही आमची जबाबदारी आहे. संस्थान सदैव समाजहितासाठी तत्पर राहील. समाजासाठी प्रेरणादायी योगदान श्री गजानन महाराज संस्थानच्या या योगदानामुळे केवळ पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळणार नाही, तर समाजात एकोप्याचा संदेश पोहोचणार आहे. धार्मिक व सामाजिक संस्था समाजाच्या विकासात कशी मोलाची भूमिका बजावू शकतात याचे उत्तम उदाहरण संस्थानने पुन्हा एकदा घालून दिले आहे. श्री गजानन महाराज संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आलेली १ कोटी ११ लाखांची मदत ही केवळ आर्थिक मदत नसून सेवाभावाचे जिवंत उदाहरण आहे. अध्यात्म आणि सेवा यांचा सुंदर संगम म्हणजेच गजानन महाराज संस्थान. संकटसमयी दिलेली ही मदत निश्चितच पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाला हातभार लावेल आणि इतर संस्था व व्यक्तींना
समाजकार्यासाठी प्रेरित करेल.