मुख्यमंत्री निवडणुकीपूर्वी म्हणाले होते सातबारा कोरा करू – शेतकरी नेते रविकांत तुपकर

Before the Chief Ministerial election, he had said that he would make Satbara Kora – Farmer leader Ravikant Tupkar

ओला दुष्काळ, कर्जमुक्ती, नुकसान भरपाईसाठी शेतकरी रस्त्यावर
किरण ठाकरे यांच्या पुढाकारातून या आक्रोश मोर्चाचे आयोजन

 


वर्धा / प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर थेट हल्लाबोल करतांना म्हटले, शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. पिके वाहून गेली आहेत, जमीन खरडली आहे, शेतकर्‍यांची अवस्था दयनीय आहे. मुख्यमंत्री निवडणुकीपूर्वी म्हणाले होते सातबारा कोरा करू,पण आता म्हणतात योग्य वेळ आली की कर्जमाफी करू. हीच खरी वेळ आहे, यापेक्षा खरी वेळ कोणती?

वर्धा शहरात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. बजाज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेल्या या मोर्चात शेतकर्‍यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत हक्कासाठी लढा सुरू केला. ओला दुष्काळ जाहिर करून पूर्ण भरपाई द्या,हक्काची कर्जमुक्ती, सोयाबीन कापसाला रास्त भाव,यासह शेतकर्‍यांच्या अनेक मागण्या घेऊन हा प्रचंड आक्रोश मोर्चाने वर्धा शहर दाणाणून सोडले. तुपकरांनी आंदोलकांना उद्देशून सांगितले की, सरकारच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्येच्या खाईत ढकलला गेला आहे. दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो, मुला-मुलींची लग्न जमत नाही, म्हातार्या बापाला दवाखान्यात नेण्यासाठी पैशांची सोय नाही. हे दृश्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.

आम्ही भिकारी नाही, आमच्या घामाचे दाम मागायला आलो आहोत

मोर्चात भांडवलदार धार्जिण्या धोरणावर विशेष संताप व्यक्त करण्यात आला. लाखो कोटींचे भांडवलदारांचे कर्ज माफ होते, पण शेतकर्‍यांना न्याय मिळत नाही. कुंभमेळ्यासाठी १४ हजार कोटी, पण शेतकर्‍यांसाठी केवळ २२१५ कोटी हे अन्यायकारक आहे. आम्ही भिकारी नाही, आमच्या घामाचे दाम मागायला आलो आहोत, असे तुपकर म्हणाले. यावेळी सोयाबीनला भाव मिळावा म्हणून सोयापेंड निर्यात करण्याचा निर्णय घ्यावा, पोल्ट्री लॉबीचा दबाव झुगारावा, कापसावर पुन्हा आयात शुल्क लावावे, दोन हेक्टरची अट हटवून सर्व शेतकर्‍यांना शंभर टक्के मदत द्यावी, अशा ठोस मागण्या मांडण्यात आल्या.

पुढे तुपकर म्हणाले की गांधीजींनी जसं इंग्रजांना चले जाव म्हटलं तसं या सरकारला चलेजाव म्हणण्याची वेळ आली आहे नेपाळ सारखी परिस्थिती उद्भवू शकते असं मी अकोला येथील सभेत म्हटलं तर माझ्या वर सरकार वॉच ठेवत आहे माझे फोन टॅप केले जात आहेत. मी शेतकर्‍यांसाठी जेल मध्ये जायला घाबरत नाही सरकार ने काय करायचे ते करावे मी घाबरत नाही.

पंधरा दिवसांत ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा … आंदोलन अधिक तीव्र करू

तुपकरांनी सरकारला इशारा देताना सांगितले की, पंधरा दिवसांत ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू. वर्धा आंदोलनाचे केंद्र राहील. पोलीसांच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील, पण शेतकर्‍यांच्या छात्या कमी पडणार नाही. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही शेतकर्‍यांनी शांततेत आपली भूमिका मांडली. वर्ध्यातील या मोर्चामुळे राज्य सरकारवर शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याचा दबाव वाढला असून पुढील काही दिवसांत क्रांतिकारी शेतकरी संघटना व सरकार यांच्यातील संघर्ष आणखी उग्र होण्याची चिन्हे आहेत. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख किरण ठाकरे यांच्या पुढाकारातून या आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें