कोरोनाचा काळ वगळता आजतगायत महाप्रसाद वितरण
गिरीश पळसोदकर / खामगाव
स्वर्गीय रामभाऊ महाराज चोपडे यांनी सन १९८५ सालापासून नवरात्राच्या उत्सव काळात सुरू केलेला खिचडी रूपाने महाप्रसाद वितरणाचा उपक्रम कोरोनाचा काळ वगळता आजतगायत सुरू आहे. सदग़ूरु श्रीधर महाराज संस्थान घाटपुरीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे त्यांची चिरंजीव अंबादास महाराज चोपडे व विश्वस्त मंडळातील लोक हा उपक्रम राबवीत आहे हे विशेष..!
स्वर्गीय रामभाऊ महाराज चोपडे यांना अशी सुचली कल्पना
रामभाऊ महाराज चोपडे हे हयात असतानां व जुन्या काळात वाहनांची व्यवस्था नसल्याने शिरजगाव देशमुख, हिवरखेड, किन्ही महादेव, जनूना, जळकातेली, अंत्रज, निळेगाव, शेलोडी, जवळा, गोंधनापूर, कंझारा, धापटी, खुटपुरी, मांडका, आदी गावातील ग्रामस्थ हे बैलगाडीने येणे जाणे करीत होते. बैलगाडी उभी करण्यासाठी चोपडे यांच्या मळ्यात जागा व बैलांना चारा मिळत असल्याने त्या ठिकाणी बैलगाडी सोडून देत घाटपुरीच्या देवीच्या दर्शनासाठी निघून जायचे. काही लोकांना दर्शन करून घरी जाण्यास रात्र होत असल्याने ते चोपडे यांच्या मळ्यात मुक्काम करायचे. लोकांजवळ रात्रीच्या जेवणासाठी लागणारे अन्न नसायचे ही बाब स्वर्गीय रामभाऊ चोपडे यांच्या लक्षात आली. त्यांनी १९८१ साला पासून अन्नदानाचे कार्य सुरू केले. या मध्ये उडदाचे वरण, भाकरी, मिरचीचा ठेचा व कांदा याचा समावेश राहायचा. हा उपक्रम १९८४ सालापर्यंत चालविण्यात आला. त्यानंतर १९८५ सालापासून रामभाऊ महाराज चोपडे यांनी त्यात बदल करून उपवास असणार्या व्यक्तींसाठी साबुदाण्याची खिचडी तर ज्यांना उपवास नाही अशांसाठी मूग,तुरीची डाळ व तांदूळ एकत्र करून त्यात मसाला टाकून खिचडी तयार करण्यास सुरुवात केली आणि महाप्रसाद रूपाने त्याच्या वितरणास आरंभ केला. हा उपक्रम आजही राबविण्यात येत आहे याचे वितरण सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात येते. विशेष म्हणजे ही खिचडी पोटभर देण्यात येते. श्री सद्गुरु श्रीधर महाराज संस्थान परिसरात ही खिचडी रुपी महाप्रसाद खाण्यासाठी व्यवस्था करण्यात येते महाप्रसादा बरोबरच शुद्ध आरो पाण्याची व्यवस्था असते.
१६ हजार लोकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
गतवर्षी म्हणजे २०२४ साली ९ दिवसाच्या कालावधीत १६ हजार लोकांनी या खिचडी रुपी महाप्रसादाचा लाभ घेतला. ही खिचडी बनविण्यासाठी ९ क्विंटल तांदूळ, ४० किलो मुगाची डाळ,एक क्विंटल तुरीची डाळ,१५० किलो तेल व मसाला या वस्तु लागल्यात तर साबुदाण्याचे खिचडी बनविण्यासाठी ८० किलो साबुदाणा,४० किलो शेंगदाणे, १ क्विंटल बटाटे लागले.यांचा आहे सहभाग
पुष्पा चोपडे, अनिता पळसकर, उमा चोपडे, ज्योती देशमुख, युवराज भेरडे, निवृत्ती चोपडे, हरिभक्त पारायण बळीराम महाराज भगत यांनी ही खिचडी तयार केली होती. या महाप्रसादासाठी कोणी धान्य स्वरूपात, कोणी देणगी स्वरूपात रक्कम तर कोणी पत्रावळी तर कोणी द्रोण आणून देल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अंबादास महाराज चोपडे यांनी दिली. वितरणाच्या कार्यात श्याम चोपडे, गोविंदा खारोडे, नामदेव चोपडे, हरिभक्त पारायण मधुकर बेलोकार, तुकाराम चोपडे, गोपाल फेरण, उद्धव महाराज डिक्कर, गोपाळराव खेडकर यांच्यासह विश्वस्त मंडळातील लोकांचा सहभाग असतो.हे आहे संस्थेचे विश्वस्त मंडळ
अध्यक्ष अंबादास महाराज चोपडे, उपाध्यक्ष बळीराम महाराज भगत , सचिव गोकुळ महाराज चोपडे, कोषाध्यक्ष निवृत्ती चोपडे, सहकोषाध्यक्ष सोपान चोपडे, सदस्य पुष्पा चोपडे, उद्धव महाराज डिक्कर, श्रीकृष्णा खेडकर, गोपाळ खेडकर यांचा समावेश आहे.